Mark Zuckerberg turned 5 of 11 Crescent Park homes into a compound angering neighbors over noise and security
Mark Zuckerberg compound Crescent Park : फेसबुकचे सहसंस्थापक व मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांची मालमत्ता गुंतवणूक सध्या कॅलिफोर्नियातील क्रेसेंट पार्क परिसरात प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. कारण फक्त त्यांच्या अब्जावधींच्या संपत्तीमुळे नव्हे, तर त्यांच्या नव्या आलिशान कंपाऊंडमुळे शेजाऱ्यांची झोप उडाली आहे. ९०० कोटी रुपयांहून अधिक किंमतीचा हा प्रकल्प परिसरातील वातावरणच बदलून टाकत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.
झुकरबर्ग १४ वर्षांपूर्वी पत्नी प्रिसिला चॅन आणि तीन मुलींसह क्रेसेंट पार्कमध्ये आले. तेव्हापासून त्यांनी एकामागोमाग ११ घरे विकत घेतली. यापैकी पाच घरे तोडून किंवा रूपांतरित करून एक भव्य कंपाऊंड उभारला. या कंपाऊंडमध्ये मुख्य निवासस्थान, गेस्ट हाऊस, हिरवीगार बाग, ‘हायड्रोफ्लोअर’ने झाकलेला स्विमिंग पूल, पिकलबॉल कोर्ट आणि सर्वात लक्षवेधी सात फूट उंचीचा प्रिसिला चॅन यांचा चांदीने मढवलेला पुतळा – अशी आलिशान सुविधा आहे.
स्थानिक महापालिकेच्या नोंदींनुसार, झुकरबर्ग यांनी सुमारे ७,००० चौरस फूट भूमिगत बांधकाम केले आहे. काही शेजारी याला ‘बंकर’ किंवा ‘बॅट केव्ह’ असे संबोधतात. या जागेवर उच्च दर्जाची सुरक्षा यंत्रणा उभारली असून, जागोजागी सुरक्षा रक्षक, कॅमेरे आणि गेटेड प्रवेशद्वार दिसतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानात पुन्हा रक्तरंजित मोहीम! खैबर पख्तूनख्वात लष्कराची मोठी कारवाई; 55 हजार विस्थापित, लाखो लोक कर्फ्यूमध्ये कैद
झुकरबर्ग यांच्या सतत सुरू असलेल्या बांधकामामुळे परिसरातील शांतता भंग होत असल्याची रहिवाशांची तक्रार आहे. जड यंत्रसामग्री, वाढलेली रहदारी आणि सततचा आवाज या सर्वांमुळे स्थानिक त्रस्त झाले आहेत. रहिवासी मायकेल किस्निक यांचे मत स्पष्ट आहे “कोणालाही आपला संपूर्ण परिसर व्यापला जावा असे वाटत नाही. पण इथे तेच घडत आहे.” स्थानिक कौन्सिल सदस्य ग्रीर स्टोन यांनी तर सरळ आरोपच केला “तो आमच्या कायद्यांमधील पळवाटा शोधतोय. आपण कधीही असे गेटेड, सोनेरी शहर उभारू नये, जिथे लोकांना स्वतःच्या शेजाऱ्यांची ओळखही उरत नाही.”
क्रेसेंट पार्क पूर्वी स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक, डॉक्टर आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी यांचा निवास होता. इथे ब्लॉक पार्ट्या, रस्त्यावर खेळणारी मुलं आणि एकमेकांशी जोडलेला समाज हे सर्व रोजचे दृश्य होते. आता मात्र रहिवाशांना वाटते की त्या ‘समुदायभावने’चा अंत झाला आहे. “अब्जाधीश आपले स्वतःचे नियम बनवतात, आणि आम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतात,” किस्निक म्हणतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अजब शोध! पृथ्वीखाली दडलेल्या जीवसृष्टीचे सापडले पुरावे, चिनी- कॅनेडियन शास्त्रज्ञांचा अनोखा दावा
झुकरबर्ग यांचे हे नवे ‘सोन्याचे राज्य’ काही जणांच्या मते फक्त एक आलिशान गुंतवणूक नसून सत्तेचे आणि खासगीपणाचे प्रदर्शन आहे. पण स्थानिकांना प्रश्न पडला आहे या अब्जाधीशाच्या महालाने त्यांचे घर, त्यांची शांतता आणि त्यांच्या समाजाची ओळख हिरावून घेतली तर त्याची किंमत कोण मोजणार?