Myanmar Earthquake Ground Shifted 20 Feet in Shocking Event
नायपीडॉ (म्यानमार) : म्यानमारमधील मंडाले परिसरात २८ मार्च रोजी आलेल्या भीषण भूकंपानंतर आता शास्त्रज्ञांनी दिलेल्या एका धक्कादायक माहितीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे सागाईंग फॉल्टजवळील जमीन जवळपास २० फूट (सुमारे ६ मीटर) सरकली आहे, असा निष्कर्ष संशोधनातून समोर आला आहे. या नैसर्गिक आपत्तीत सुमारे ३,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, हजारो लोक जखमी झाले आहेत.
युरोपियन स्पेस एजन्सीचे सेंटिनेल-१ए आणि सेंटिनेल-२बी/सी उपग्रह, नासाची जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी, तसेच क्लोटेक सिस्मोलॉजिकल लॅबोरेटरी यांनी मिळून दिलेल्या उपग्रह प्रतिमांवरून हे स्पष्ट झाले आहे की, हा इतिहासातील सर्वात मोठ्या स्ट्राइक-स्लिप भूकंपांपैकी एक होता.
ॲडव्हान्स्ड रॅपिड इमेजिंग अँड ॲनालिसिस (ARIA) टीमने भूकंपाआधी आणि नंतरचे उपग्रह चित्रांचे विश्लेषण केले. त्यात काही ठिकाणी जमीन सुमारे ९ फूट (३ मीटर) तर काही भागांत २० फूटांपर्यंत सरकल्याचे स्पष्ट झाले. हा भूकंप भारतीय आणि युरेशियन प्लेट्सच्या संयोगस्थळी घडला, जो एक प्रमुख भूकंपीय फॉल्ट झोन मानला जातो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘जिना हाऊस’ बनणार डिप्लोमॅटिक एन्क्लेव्ह; परराष्ट्र मंत्रालयाने दिली मंजुरी, हैदराबाद हाऊससारखे काम करणार
मंडालेमध्ये झालेल्या या भूकंपामुळे हजारो इमारती जमीनदोस्त झाल्या. यामुळे सुमारे ३,००० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू, ४,००० हून अधिक लोक जखमी, तर अनेक लोक बेपत्ता झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या भूकंपाचे धक्के फक्त म्यानमारपुरते मर्यादित न राहता थायलंडमधील बँकॉकपर्यंत जाणवले, यावरून भूकंपाची तीव्रता आणि व्याप स्पष्ट होते. या भयानक हादऱ्यांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उत्तराखंड आपत्ती निवारण व व्यवस्थापन केंद्राचे माजी संचालक आणि ज्येष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. पियुष रौटेल यांनी या घटनेवर भाष्य करताना सांगितले की, “भूकंपानंतर जमिनीवरून घसरणे किंवा पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात भेगा पडणे हे सामान्य आहे. मात्र २० फूट जमिनीचा सरकाव यासारखी घटना अत्यंत दुर्मीळ आणि चिंताजनक आहे.” त्यांच्या मते, सागाईंग फॉल्टसारखी सक्रिय फॉल्ट लाईन भविष्यातही मोठ्या भूकंपांची शक्यता दर्शवते, आणि यावर सखोल निरीक्षण गरजेचे आहे.
या वर्षात म्यानमारमध्ये अनेकदा भूकंप झाले आहेत. १३ एप्रिल रोजी ५.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला होता, परंतु त्या वेळी कोणतेही मोठे नुकसान झाल्याचे नोंदले गेले नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (NCS) ने याची नोंद केली, मात्र कोणत्याही यंत्रणेकडून मोठी प्रतिक्रिया मिळाली नव्हती.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भगवान बुद्धांच्या पवित्र दाताचा फोटो व्हायरल; श्रीलंकेत सुरक्षेचा भंग, पोलिस तपासात गुंतले
म्यानमारसारख्या भूगर्भीयदृष्ट्या संवेदनशील भागात अशी भूकंपाची तिव्रता आणि परिणाम भविष्यात आणखी गंभीर असू शकतात. वैज्ञानिकांचे स्पष्ट मत आहे की, अशा भागांमध्ये पूर्वतयारी, भूकंप प्रतिकारक्षम बांधकाम, आणि आपत्ती व्यवस्थापन यावर भर देणं अत्यंत आवश्यक आहे. म्यानमारच्या मंडालेमध्ये झालेला हा भूकंप मानवजातीला भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या संभाव्य परिणामांची तीव्र जाणीव करून देणारा आहे, ज्यातून भविष्यातील धोके टाळण्यासाठी वेळीच जागरूकता आणि उपाययोजना करणं आवश्यक आहे.