भगवान बुद्धांच्या दुर्मिळ दाताचा फोटो कसा व्हायरल झाला, श्रीलंकेचे पोलिस तपासात गुंतले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
कॅंडी (श्रीलंका) : श्रीलंकेतील कॅंडी शहरातील जगप्रसिद्ध दंत मंदिरात ठेवलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र दाताचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. याठिकाणी मोबाईल फोन आणि कॅमेरे नेण्यास सक्त मनाई असूनही, पवित्र दाताचा फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आहे. यामुळे मंदिर प्रशासन, भाविक आणि सुरक्षा यंत्रणा यांच्यामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
श्रीलंकेच्या पोलिसांनी या प्रकाराचा गंभीर दखल घेतला असून सखोल चौकशी सुरू केली आहे. श्रीलंकेचे कार्यवाहक पोलिस प्रमुख प्रियंथा वीरसुरिया यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, “हा फोटो नेमका कधी आणि कसा काढण्यात आला, हे तपासण्यासाठी प्राथमिक चौकशी सुरू आहे. गरज पडल्यास गुन्हे अन्वेषण विभागाची (CID) मदत घेण्यात येईल.”
विशेष म्हणजे, भगवान बुद्धांच्या या पवित्र दाताचे दर्शन १६ वर्षांनंतर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांच्या विनंतीनंतर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. २७ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात हजारो भाविक सहभागी होत आहेत. श्रीलंकेच्या एकूण लोकसंख्येपैकी ७४ टक्के सिंहली बौद्ध लोक आहेत, ज्यांच्यासाठी हे दंत अवशेष अत्यंत श्रद्धेचे आणि धार्मिक महत्त्वाचे आहेत. इतिहासानुसार, इ.स. १५९० साली हा दात कॅंडी येथे आणण्यात आला आणि त्यानंतर तो बौद्ध श्रद्धेचे प्रतीक आणि श्रीलंकेतील एक अत्यंत मौल्यवान वारसा मानला गेला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : व्यापार संरक्षणवादात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर दबाव; अरब देशांच्या गैर-तेल निर्यातीला धोका
Sri Lanka, the country of Buddhist replicas
The tooth relic of Buddha is protected and can be seen by everyone who visits Sri Lanka. It has been opened.
May all beings on earth be happy pic.twitter.com/j1TzdOg7Im— Pranta Barua (Ven Dharmaratna Bhikkhu) (@PrantaB00498058) April 20, 2025
credit : social media
दंत मंदिरात प्रवेश करताना सर्व भाविकांची सुरक्षा तपासणी काटेकोरपणे केली जाते. मोबाईल, कॅमेरे आणि इतर इलेक्ट्रॉनिक साधनांवर बंदी आहे. त्यामुळे असा फोटो बाहेर कसा गेला, यावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकारामुळे मंदिर प्रशासनाची सुरक्षा व्यवस्था ढासळल्याचा आरोप होत आहे. पोलिस तपासात मंदिरातील कर्मचाऱ्यांपासून ते सुरक्षारक्षकांपर्यंत सर्वांची चौकशी होण्याची शक्यता आहे. फोटो योग्य परवानगीशिवाय घेतला गेला असल्यास संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई होणार आहे, असेही पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
या धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या प्रसंगी दररोज हजारो बौद्ध भाविक दर्शनासाठी कॅंडी येथील दंत मंदिरात येत आहेत. मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लागत असून, श्रद्धेच्या भरात लोक तासन्तास रांगेत उभे राहून दर्शन घेत आहेत. ६५ वर्षीय गीतानी मेंडिस यांनी सांगितले, “हा प्रसंग आमच्यासाठी अत्यंत खास आहे. कितीही वेळ वाट पाहावी लागली तरी आम्ही भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषाचे दर्शन घेण्यास तयार आहोत.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : मंगळावरील ‘सोन्याची खाण’! नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरचा अद्भुत शोध; अब्जावधी वर्षे जुने खडक आणि सूक्ष्मजीवनाचे संकेत
भगवान बुद्धांचे हे पवित्र दंत अवशेष केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नाहीत, तर ते श्रीलंकेच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीचे केंद्र आहेत. त्यामुळे अशा पवित्र जागेवर सुरक्षेचा भंग होणे हे अत्यंत गंभीर मानले जात आहे. या प्रकारानंतर, शासन आणि मंदिर प्रशासनाला सुरक्षा उपाय अधिक कठोर करण्याची गरज भासणार आहे, जेणेकरून अशा घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत. श्रद्धा आणि सुरक्षेच्या या दोन्ही बाबी एकत्र ठेवून कार्य करणे हीच काळाची गरज बनली आहे.