Myanmar's earthquake has claimed 694 lives injured thousands, and the number of casualties is expected to rise
नेपिता : म्यानमारमध्ये शुक्रवारी (२८ मार्च) विनाशकारी भूकंपाने हाहाकार माजवला असून आतापर्यंत ६९४ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. तसेच १६७० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) च्या अंदाजानुसार, म्यानमारमध्ये या भूकंपामुळे १०,००० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. या भूकंपाचे धक्के भारत, चीन, थायलंड आणि बांगलादेशमध्येही जाणवले.
म्यानमारमध्ये शुक्रवारी सकाळी ११.५० वाजता ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. हा भूकंप म्यानमारच्या इतिहासातील सर्वात मोठा भूकंप असल्याचे सांगितले जात आहे. केवळ १२ मिनिटांनी ६.४ रिश्टर स्केलचा दुसरा भूकंप झाला, ज्यामुळे विध्वंस अधिक वाढला. यानंतर म्यानमारमध्ये १० तासांत तब्बल १५ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. त्यापैकी एक भूकंप ६.७ रिश्टर स्केलचा होता. थायलंडमध्येही या भूकंपाचा मोठा फटका बसला असून १० जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे, तर १०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : म्यानमार आणि बँकॉकमध्ये भूकंपामुळे अत्यंत भयावह स्थिती; पाहा ‘हे’ अंगावर शहारे आणणारे VIDEO
या भूकंपानंतर समोर आलेले व्हिडिओ आणि छायाचित्रे हृदय पिळवटून टाकणारी आहेत. अनेक ठिकाणी इमारती कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नागरिक घाबरून रस्त्यांवर धावत सुटले, तर काही ठिकाणी लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याचे भयावह दृश्य दिसून आले. थायलंडची राजधानी बँकॉकमध्येही या भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. अनेक उंच इमारती हलताना दिसल्या, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. म्यानमारमधील अनेक भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून हजारो कुटुंब बेघर झाली आहेत.
या भीषण आपत्तीमुळे म्यानमार सरकार आणि लष्कराने जगभरातील देशांना मदतीचे आवाहन केले आहे. सध्या मदत आणि बचाव कार्य जोरात सुरू असून अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. बचावकार्य करणाऱ्या पथकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, कारण अनेक भागांमध्ये रस्ते आणि पूल कोसळल्यामुळे संपर्क तुटला आहे.
म्यानमारच्या या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने तत्काळ मदतीचा हात पुढे केला आहे. भारत सरकारने म्यानमारसाठी १५ टन मदत सामग्री पाठवली असून यामध्ये तंबू, ब्लँकेट, झोपण्याच्या पिशव्या, सौर दिवे, खाण्यासाठी तयार अन्न आणि आवश्यक औषधांचा समावेश आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीनमध्ये 7.9 तीव्रतेचा विनाशकारी भूकंप; नागरिकांमध्ये भीती, मोठ्या नुकसानाची शक्यता
USGS आणि भूकंपतज्ज्ञांच्या मते, म्यानमारमध्ये यापुढेही काही दिवस भूकंपाचे धक्के जाणवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि सुरक्षित स्थळी आसरा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. म्यानमारमधील ही आपत्ती अत्यंत भयानक आहे आणि मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय पातळीवरून अधिक मदतीची गरज भासेल.