nato invokes article4 after russian drone entry in poland europe tensions rise
पोलंडच्या हवाई हद्दीत रशियन ड्रोन घुसखोरी झाल्यानंतर नाटोने कलम ४ सक्रिय केले.
पोलंडसह नाटो देशांनी रशियावर आक्रमकतेचा आरोप करत तीव्र निषेध नोंदवला.
या घटनेमुळे युरोपातील तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून भविष्यातील संघर्षाचे संकेतही मिळत आहेत.
Urgent NATO consultations Article 4 : युरोपच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पोलंडच्या हवाई हद्दीत रशियन ड्रोन घुसल्याची घटना नुकतीच समोर आली आणि त्यानंतर नाटोने आपल्या कलम ४ चा वापर करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताच पोलंडमध्ये नाटो सैन्याची हालचाल वाढली असून, रशियाच्या या कारवाईवर अनेक देशांनी टीका केली आहे. परिणामी, युरोपातील तणाव पुन्हा एकदा भडकण्याची भीती व्यक्त होत आहे.
वॉर्सामधील पत्रकार परिषदेत पोलंड सरकारचे प्रवक्ते ॲडम स्झ्लापका यांनी सांगितले की, युक्रेन युद्धादरम्यान प्रथमच पोलंडने रशियन ड्रोन पाडला आहे. यानंतर पोलिश पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी संसदेत स्पष्ट केले की वॉर्साने औपचारिकरित्या कलम ४ अंतर्गत सल्लामसलतीसाठी विनंती केली आहे. टस्क यांनी संसदेत म्हटले, “ही घटना फक्त सुरुवात आहे. आम्ही मित्र राष्ट्रांशी सल्लामसलत करून पुढील पावले ठरवू.” त्यांनी यासोबतच सांगितले की एका रात्रीत तब्बल १९ वेळा हवाई हद्द उल्लंघन झाले असून पोलिश आणि सहयोगी दलांनी ३ ते ४ ड्रोन पाडले आहेत. शेवटचा ड्रोन पहाटे ६:४५ वाजता पाडण्यात आला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : नाटोच्या दाराशी युद्ध? पुतीन यांनी फुंकले तिसऱ्या महायुद्धाचे रणशिंग; पोलंडवर रशियाचा 19 ड्रोनने हल्ला
नाटोच्या प्रवक्त्या अॅलिसन हार्ट यांनी सांगितले की, युती वॉर्सासोबत सतत सल्लामसलत करत आहे. मात्र एका अज्ञात सूत्राने नमूद केले की, नाटोने या घुसखोरीला अधिकृतपणे ‘हल्ला’ मानलेले नाही. तरीदेखील, नाटोचे सरचिटणीस मार्क रुट यांनी या प्रसंगाला “नाटो आणि सहयोगींचा यशस्वी प्रतिसाद” असे संबोधले. रुट पुढे म्हणाले, “ही घुसखोरी जाणूनबुजून झाली की निष्काळजीपणामुळे, हे स्पष्ट नाही. पण एवढे नक्की की ती अत्यंत धोकादायक होती. तरीसुद्धा, काल रात्री आपण सिद्ध केले की नाटो आपल्या प्रत्येक इंच भूमीचे आणि हवाई क्षेत्राचे रक्षण करण्यास समर्थ आहे.”
युक्रेननेही पोलंडला मदत करण्याचा हात पुढे केला आहे. “आम्ही सतर्कता यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम बनवण्यासाठी पोलंडला मदत करू शकतो,” असे युक्रेन सरकारने जाहीर केले.
१९४९ मध्ये स्थापन झालेल्या नाटो करारातील कलम ४ हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते. जेव्हा एखाद्या सदस्य देशाला आपल्या सुरक्षिततेवर किंवा प्रादेशिक अखंडतेवर धोका जाणवतो, तेव्हा ते इतर सदस्यांसोबत बैठक बोलावू शकते. या बैठकीत सामूहिक चर्चा करून पुढील रणनीती ठरवली जाते. म्हणजेच, हे कलम प्रत्यक्ष युद्धाची घोषणा नसून, सामूहिक सुरक्षा चर्चेचा मार्ग आहे.
१९४९ पासून आतापर्यंत फक्त सात वेळा कलम ४ चा वापर करण्यात आला आहे. पोलंडने यापूर्वी २०१४ मध्ये (क्रिमियाच्या कब्जादरम्यान) आणि २०२२ मध्ये (युक्रेनवरील रशियन आक्रमणावेळी) हे कलम सक्रिय केले होते. आता पुन्हा एकदा त्याचा वापर झाल्याने परिस्थिती किती गंभीर आहे हे दिसून येते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : WeAreFire : ‘उत्कटतेच्या ज्वाला…’ ‘या’ नेपाळी विद्यार्थ्यांचे आक्रमक शब्द बनले जनतेचा गगनभेदी आवाज, प्रचंड VIRAL
तज्ज्ञांच्या मते, रशियन ड्रोन घुसखोरी आणि त्यानंतरची राजकीय हालचाल ही केवळ तात्पुरती घटना नाही. यामुळे युरोपात तणावाची पातळी आणखी वाढू शकते. नाटोच्या सैन्य हालचाली वाढत असल्याने रशियाकडून आणखी प्रत्युत्तराची शक्यता आहे. सध्या हे स्पष्ट आहे की, ही घटना नाटो आणि रशिया यांच्यातील संबंध आणखी ताणून धरणारी ठरणार आहे. त्यामुळे जगाचे डोळे पुन्हा एकदा पूर्व युरोपकडे लागले आहेत.