Nepal Gen-Z rebellion and suspicion on rapper mayor Balen Shah
सोशल मीडिया बंदीमुळे नेपाळ पेटला
हिंसाचाराचा उद्रेक
बलेन शाहवर संशय
Kathmandu mayor controversy : नेपाळ आज भीषण राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेच्या गर्तेत सापडला आहे. फेसबुक, इंस्टाग्रामसह तब्बल २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सरकारने बंदी घातल्यामुळे विद्यार्थ्यांचा विशेषत: जनरेशन-झेड तरुणांचा प्रचंड रोष उसळला. या निर्णयाच्या निषेधार्थ देशभरात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून हिंसक निदर्शने केली आहेत.
नेपाळच्या अनेक जिल्ह्यांत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. रस्त्यांवर विद्यार्थ्यांनी पोलिसांना भिडत टायर जाळले, सरकारी इमारतींवर दगडफेक केली. संसद भवनापर्यंत निदर्शक पोहोचले, ज्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली. हिंसाचार इतका तीव्र झाला की आतापर्यंत १८ नागरिकांचा बळी गेला असून, २०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे प्रशासनाने हल्लेखोर निदर्शकांना “दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश” दिले आहेत.
सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, हा विद्यार्थी विद्रोह नेमका स्वतःहून पेटला की यामागे एखाद्या व्यक्तीचे नेतृत्व आहे? सोशल मीडिया बंदीने जरी ठिणगी पडली असली, तरी या निषेधामागे कोणाचे राजकीय गणित आहे का, यावर चर्चा रंगली आहे. संशयाची सुई थेट काठमांडू महानगरपालिकेचे महापौर आणि रॅपर बलेन शाह यांच्या दिशेने वळली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Crap Note Navarro : भारताविरुद्ध विष ओकणाऱ्या नवारोला एलोन मस्कने दिले चोख प्रत्युत्तर म्हणाले, ‘एक्सवर प्रत्येकाचे…’
२७ एप्रिल १९९० रोजी नरदेवी, काठमांडू येथे जन्मलेले बलेन शाह मूळचे सिव्हिल इंजिनिअर आहेत. त्यांनी भारतातील विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. संगीताची आवड असल्याने ते रॅप गायक आणि संगीत निर्माते म्हणून लोकप्रिय झाले. २०२२ च्या महापौर निवडणुकीत त्यांनी प्रस्थापित पक्षांना नेपाळी काँग्रेस आणि सीपीएन (यूएमएल) पराभूत करून इतिहास रचला. २०२३ मध्ये टाईम मासिकाने त्यांना “टॉप १००” प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान दिले.
बलेन शाह यांचा पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्याशी अनेक मुद्द्यांवर उघड संघर्ष राहिला आहे. महानगरपालिकेतील ३५०० कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार न मिळाल्याबद्दल बलेन यांनी थेट सरकारला जबाबदार धरले होते. त्यावेळी त्यांनी कठोर इशारा दिला होता “जर आमच्या कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही, तर आम्ही तुमच्या व्यवस्थेचा सामना करू”. याच संघर्षामुळे आता या सोशल मीडिया आंदोलनात बलेन शाह यांचा गुप्त हात असल्याची चर्चा रंगत आहे. स्वतः बलेन यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना इशारा दिला “हे आंदोलन २८ वर्षांखालील तरुणांसाठी आहे, याचा वापर कोणत्याही राजकीय पक्षाने स्वतःच्या फायद्यासाठी करू नये.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Data Leak : 500 रुपयांना लोकेशन, 2000 रुपयांना मोबाईल रेकॉर्ड! पाकिस्तानात भीषण डेटा लीक; मंत्र्यांपर्यंत माहिती विक्रीला
नेपाळमध्ये सध्या प्रश्न विचारला जातोय हा विद्यार्थी विद्रोह नैसर्गिक आहे की कुणीतरी आखलेले षड्यंत्र? सरकारचे बोट बलेन शाह यांच्याकडे वळते आहे. त्यांच्या लोकप्रियतेमुळे विद्यार्थी त्यांच्याकडे आकर्षित झाले असावेत, असा आरोप विरोधक करीत आहेत. पण दुसरीकडे अनेक तरुण मानतात की, बलेन फक्त “जनरेशन-झेड” चा आवाज बनले आहेत. सोशल मीडिया बंदी हा थेट तरुणांच्या स्वातंत्र्यावर गदा घालणारा निर्णय आहे, आणि बलेन शाह यांनी फक्त त्या भावना उचलून धरल्या आहेत. नेपाळ सध्या भीषण राजकीय व सामाजिक तणावातून जात आहे. सरकार, विद्यार्थी आणि बलेन शाह यांच्यातील हा संघर्ष नेपाळच्या भविष्याला कुठे नेईल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.