Pakistan Army attacks Balochistan again within 24 hours injuring many soldiers
क्वेटा : बलुचिस्तानमध्ये २४ तासांत दुसऱ्यांदा दहशतवादी हल्ला झाल्याने परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. केच जिल्ह्यात झालेल्या या हल्ल्यात अनेक पाकिस्तानी जवान जखमी झाले असून, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने हा हल्ला घडवून आणल्याचा संशय आहे. पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर बॉम्बने हल्ला करण्यात आला, ज्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे समजते.
बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर संघर्ष सुरू केला आहे. शुक्रवारी त्यांनी पाकिस्तानने ओलीस ठेवलेल्या सर्व 214 सैनिकांना ठार केले होते. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी लष्कराला कैद्यांच्या अदलाबदलीसाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, शाहबाज शरीफ सरकार आणि पाकिस्तानी लष्कराने कोणतीही कारवाई केली नाही. परिणामी, 214 सैनिकांना प्राण गमवावे लागले. या घटनेने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ग्रीन कार्डचे प्रकरण पुन्हा पेटले; अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी केला खळबळजनक दावा
पाकिस्तानी लष्कराने आपल्या निवेदनात सांगितले की, बलुचिस्तान ट्रेन हल्ल्यात ठार झालेल्या 26 ओलीसांपैकी 18 जण सुरक्षा कर्मचारी होते. इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी लष्करी कारवाई सुरू होण्यापूर्वीच 26 ओलीसांची हत्या केली होती. या मृतांमध्ये १८ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह तीन सरकारी अधिकारी आणि पाच नागरिकांचा समावेश होता.
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, काही दिवसांपूर्वी बलुच लिबरेशन आर्मीने जाफर एक्स्प्रेसवर हल्ला केला होता. बोलान भागात झालेल्या या हल्ल्यात 400 हून अधिक प्रवासी अडकले होते. मात्र, पाकिस्तानी लष्कराने ३३ सैनिकांना ठार केल्याचा दावा केला आहे आणि ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका केल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, 37 जखमी प्रवाशांसह एकूण 354 ओलीसांची सुटका करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
11 मार्च रोजी जाफर एक्स्प्रेस क्वेटाहून पेशावरसाठी रवाना झाली होती. या ट्रेनमध्ये 400 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. ट्रेन बोलानच्या टेकड्यांमधून जात असताना, एका बोगद्यात घात लावून बसलेल्या बलुच लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी ट्रेनवर जोरदार हल्ला केला. या भयंकर हल्ल्यात 58 जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये 21 प्रवाशांचाही समावेश आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : सुनीता विल्यम्सच्या परतीच काउंटडाउन सुरु; NASA-SpaceX मिशनने घेतली गती
बलुचिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानविरोधी कारवाया सातत्याने वाढत आहेत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि अन्य स्थानिक संघटनांनी पाकिस्तानविरोधात संघर्ष उभा केला आहे. पाकिस्तानी लष्करावर सातत्याने हल्ले होत असून, बलुच लिबरेशन आर्मीच्या या हालचालींमुळे पाकिस्तान सरकार अडचणीत आले आहे. पाकिस्तानी लष्कर आणि सरकार या परिस्थितीला कसे हाताळतील, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. मात्र, बलुचिस्तानमधील वाढता संघर्ष आणि हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे पाकिस्तानच्या सुरक्षेवर मोठे संकट निर्माण झाले आहे.