Air Strike : पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केला 'एअर स्ट्राईक'; 3 क्रिकेटपट्टूंसह दहा जणांचा मृत्यू
इस्लामाबाद : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांतील संबंध दिवसेंदिवस ताणत असल्याचे दिसत आहेत. या दोन्ही देशांत युद्धासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. असे असताना आता पाकिस्तानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या भूमीवर हवाई हल्ला केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी हवाई दलाने क्रिकेटपट्टूंवर हवेतून बॉम्बहल्ला केला, ज्यामध्ये तीन अफगाण खेळाडू मृत्युमुखी पडले आणि अनेक जण जखमी झाल्याची माहिती दिली जात आहे.
पाकिस्तानने एअर स्ट्राईक केल्याचे अधिकृत दुजोराही देण्यात आला. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने स्वतः पाकिस्तानी हल्ल्याला दुजोला दिला. सामना संपल्यानंतर खेळाडू घरी परतण्याच्या तयारीत असताना पाकिस्तानने त्यांच्यावर बॉम्बहल्ला केला. तालिबानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले आणि पक्तिका प्रांतातील तीन ठिकाणी बॉम्बहल्ला केला. अफगाणिस्तान आता याचा बदला घेईल. या हल्ल्यात दहा नागरिक ठार झाले आणि 12 जण जखमी झाले, ज्यात दोन मुलांचा समावेश आहे.
हेदेखील वाचा : सीमा संघर्षात पाकड्यांचा ‘खेळ खल्लास’; अफगाणिस्तानच्या एअर स्ट्राईकने ५८ सैनिक ठार, अनेक पाकिस्तानी चौक्यांवर ताबा!
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एएफपीला सांगितले की, एका मॅचसाठी या प्रदेशात असलेले तीन क्रिकेटपटू कबीर, सिबगतुल्ला आणि हारून या हल्ल्यात ठार झाले. पुढील महिन्यात पाकिस्तानसोबत होणाऱ्या टी २० मालिकेतून ते माघार घेत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानने का केला हवाई हल्ला?
सैन्याने अफगाण सीमावर्ती भागात हवाई हल्ले केले, ज्यामध्ये तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) – पाकिस्तानी तालिबानशी संबंधित स्थानिक गट असलेल्या हाफिज गुल बहादूर गटाला लक्ष्य केले गेले. अफगाणिस्तानच्या सीमेवरील उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यातील लष्करी छावणीवर आत्मघातकी बॉम्बस्फोट आणि गोळीबारात हाच गट सहभागी होता, ज्यामध्ये सात पाकिस्तानी निमलष्करी सैनिक ठार झाले होते.
दोन्ही देशांमधील वाद नेमका काय?
पाकिस्तान अफगाणिस्तानवर पाकिस्तानी तालिबानच्या नेतृत्वाखालील दहशतवादी गटांना त्यांच्या भूभागावर आश्रय देत असल्याचा आरोप करत आहे, परंतु काबुलने हा दावा फेटाळून लावला आहे. शनिवारी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर आले, तेव्हा सीमापार हिंसाचारात नाट्यमय वाढ झाली. त्यांच्या आगमनानंतर अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये स्फोट झाले. त्यानंतर तालिबानने पाकिस्तानला लागून असलेल्या दक्षिण सीमेच्या काही भागात हल्ले सुरू केले, ज्याला इस्लामाबादकडून तीव्र प्रतिसाद मिळाला.