पाक-तालिबान संघर्षाला धोकादायक वळण; अफगाणिस्तानने TTP सोबत आखली हल्ला करण्याची योजना
काबूल: तालिबान आणि पाकिस्तान संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. नुकत्याच झालेल्या हल्ल्यांमुळे हा तणाव अधिक धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. पाकिस्तानने तालिबानवरील केलेल्या हवाई हल्ल्यांत 50 तालिबानी लोकांचा मृत्यू झाला, यामुळे संतापून तालिबानने पाकिस्तानच्या 20 जवानांना टार केल्याचा दावा केला आहे. यानंतर दोन दिवसांतच तहरीक-ए-तालिबान (TTP) दहशतवाद्यांनी पाकिस्तान सैन्याचे चौक्यांवर ताबा मिळवला. यामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका होत आहे.
अफगाणिस्तान आणि TTP चा एकत्रित हल्ल्याचा कट
दरम्यान अफगाणिस्तानच्या तालिबानी आणि दहशतवादी संघटना TTP यांनी पाकिस्तानविरोधात संयुक्तपणे हल्ला करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. तालिबानच्या सर्वोच्च नेत्याने TTP सोबत हल्ल्याला मान्यता दिली आहे. या एकत्रित आघाडीमुळे पाकिस्तानसाठी मोठ्या समस्यांचा उगम होऊ शकतो. तालिबानच्या उप-विदेश मंत्र्यांनीही पाकिस्तानला इशारा दिला आहे की अफगाण सैनिक “परमाणु अस्त्रासारखे” आहेत आणि पाकिस्तानला मोठा धक्का देऊ शकतात.
ISI ची योजना
दुसरीकडे, पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI तालिबानला दबावात आणण्यासाठी विविध गटांना एकत्र करत असल्याची माहिती मिळाली आहे. ताजिकिस्तानसह तालिबान विरोधी शक्तींना मजबूत करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न सुरु आहेत. पाकिस्तान वखान कॉरिडॉरवर नियंत्रण मिळवून ताजिकिस्तानपर्यंत पोहोचण्याचे स्वप्न पाहत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आले आहे. यामुळे आता पाकिस्तान आणि तालिबान मध्ये तीव्र युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहे डूरंड लाइनचा वाद?
तालिबानने डूरंड लाइनला मान्यता देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या डूरंड रेषेला तालिबान अवैध म्हटले आगे. मिळालेल्या माहितीनुसार, डूरंड लाइन ब्रिटिश राजवटीच्या काळात आखण्यात आली होती. दुसरीकडे, पाकिस्ताननेही आपला रोख कायम ठेवत वखान कॉरिडॉरवरील अफगाणिस्तानचा दावा नाकारण्याची भूमिका घेतली आहे. वखान कॉरिडॉर हा चीन आणि अफगाणिस्तान यांना जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग असून, तो प्रचंड सामरिक महत्त्वाचा आहे.
चीनची भूमिका
या प्रकरणामध्ये चीन देखील महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र, चीनने अद्याप यावर कोणतेही अधिकृत विधान केले नाही. वखान कॉरिडॉमुळे चीनची तालिबान आणि पाकिस्तानच्या संघर्षात गुंतलेले आहे. हा तणाव संबंधांना अधिक गुतांगुंतिचा बनवत असून दोन्ही देशांमध्ये मोठा संघर्ष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण प्रदेशाच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.हा संघर्ष फक्त दोन्ही देशांपुरता मर्यादित राहील की आंतरराष्ट्रीय राजकारणात नवीन समीकरणे निर्माण करेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.