
PoK protests LoC march Awami Action Committee PoK
पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK Protests) गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळापासून सुरू असलेला असंतोष आता एका अत्यंत गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे. ९ जूनपासून सुरू असलेल्या बंडखोरीच्या ११० व्या दिवशी मंधोल गावात आवामी ॲक्शन कमिटीने (AAC) एका महासभेचे आयोजन केले होते. नियंत्रण रेषेपासून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर झालेल्या या धरणे आंदोलनात तब्बल २५,००० हून अधिक महिला व पुरुषांनी सहभाग घेतला. या ऐतिहासिक सभेत आवामी ॲक्शन कमिटीचे प्रमुख नेते सरदार अमन खान यांनी पाकिस्तानी लष्कर आणि तिथल्या प्रशासनाविरुद्ध थेट रणशिंग फुंकले. गेल्या तीन महिन्यांपासून पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेचा रेशन पुरवठा पूर्णपणे रोखल्याचा आरोप करत, त्यांनी नियंत्रण रेषा (LoC) कायमची हटवून भारतीय जम्मू-काश्मीरमधील पूंछ आणि मेंढर भागात जाण्याची तयारी दर्शवली.
या आंदोलनादरम्यान सरदार अमन खान यांनी मंचावरून जमावाला विचारलेल्या सर्व प्रश्नांना २५,००० हून अधिक लोकांनी एकमुखाने आणि अत्यंत जोरदार घोषणाबाजीत ‘हो’ असे उत्तर दिले. नियंत्रण रेषा रद्द करून भारतीय हद्दीतील पूंछ आणि मेंढरमध्ये धरणे आंदोलन करण्याच्या आवाहनाला नागरिकांनी उस्फूर्त पाठिंबा दिला. पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेचा असा आक्रमक पवित्रा पाहून पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयच्या (ISI) वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पाकिस्तान सरकारने गेल्या तीन महिन्यांपासून पाकव्याप्त काश्मीरमध्ये घृणास्पद कृत्य करत रेशन पुरवठा पूर्णपणे ठप्प केला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या या भागातील जनतेचे पूर्वज भारतीय जम्मू-काश्मीरमधील मेंढर बाजारातून रेशन व इतर आवश्यक वस्तू खरेदी करत असत. मात्र, पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर कुंपण घालून इथल्या लोकांना जबरदस्तीने इस्लामाबादच्या बाजारपेठेशी जोडले. आज जेव्हा स्थानिक लोक शिधा खरेदी करण्यासाठी जातात, तेव्हा त्यांना सीमेवर रोखून आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले जाते. या जुलमी धोरणामुळे संतप्त झालेल्या जनतेने आता थेट पाकिस्तानच्या ७८ वर्षांच्या बेकायदेशीर ताब्याविरुद्धच एल्गार पुकारला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : NASA : नासाने अंतराळात 6 वर्षे ठेवल्या टोमॅटोच्या 12.5 दशलक्ष बिया; जगभरातील शाळांमध्ये पेरणीनंतर समोर आले थक्क करणारे निष्कर्ष
अमन खान यांनी मंचावरून पाकिस्तानी लष्कराच्या भ्याडपणाची आणि गेल्या ८० वर्षांतील लुटीची पोलखोल केली. पूर्वी जेव्हा नियंत्रण रेषेवर गोळीबार व्हायचा, तेव्हा पाकिस्तानी सैनिक लपून बसायचे आणि स्थानिक नागरिक त्यांचे संरक्षण करायचे. परंतु, या संरक्षणाच्या बदल्यात पाकिस्तानी राजवटीने तिथल्या जनतेला फक्त बेरोजगारी, रुग्णालये व शाळांचा अभाव आणि हिंसाचार दिला. आपल्या मूलभूत हक्कांची मागणी करणाऱ्या निष्पाप नागरिकांवर गोळीबार करून १०० हून अधिक लोकांची हत्या करण्यात आली, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.
पाकव्याप्त काश्मीरमधील राजकीय परिस्थिती अधिकच चिघळली आहे. अलीकडेच तेथील ४५ विधानसभा जागांसाठी निवडणुका नियोजित होत्या. परंतु, पूंछ आणि सुधनोटी जिल्ह्यांतील व्यापक आंदोलनामुळे आणि जनतेच्या तीव्र विरोधामुळे ७ जागांवर मतदान होऊ शकले नाही. उर्वरित ३८ जागांवर मतदान उरकून पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या पीएमएल-एन (PML-N) पक्षाला २५ जागांवर विजयी घोषित करण्यात आले. हा विजय म्हणजे निव्वळ हेराफेरी आणि फसवणूक असल्याचे सांगत, जनतेच्या संमतीशिवाय पाकिस्तान उरलेल्या जागांवर निवडणूक घेऊच शकत नाही, असे आव्हान अमन खान यांनी दिले.
त्याचबरोबर, मुझफ्फराबादमध्ये बसलेल्या तथाकथित सरकारला ‘कठपुतळी सरकार’ असे संबोधित करत त्यांनी टीका केली. हे सरकार पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात मारल्या गेलेल्या १०० हून अधिक नागरिकांच्या मृत्यूबद्दल साधी चर्चाही करू शकत नाही. जे सरकार स्वतःच्या लोकांचे रक्षण करू शकत नाही, ते नियंत्रण रेषेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर काय बोलणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Eco Friendly: सिगारेटच्या थोटकांपासून बनणार मजबूत रस्ते; ऑस्ट्रेलियन संशोधकांनी शोधला शहरातील उष्णता कमी करण्याचा अफलातून उपाय
गुलामगिरीचा अंत आणि स्वातंत्र्याची नवी पहाट
पाकव्याप्त काश्मीरच्या अनेक पिढ्या आजपर्यंत पाकिस्तानी लष्कराच्या जुलमी आणि अनियंत्रित राजवटीखाली गुलामगिरीचे जीवन जगत आल्या आहेत. परंतु, आता तिथल्या जनतेला हे कळून चुकले आहे की, जोपर्यंत ते पाकिस्तानच्या बेकायदेशीर ताब्याविरुद्ध उभे राहत नाहीत, तोपर्यंत त्यांना समृद्धी आणि शांतता मिळणार नाही. पाकिस्तानने गेल्या तीन महिन्यांपासून तिथल्या निष्पाप नागरिकांवर एक प्रकारे युद्धच लादले आहे. त्यामुळे आता पाकव्याप्त काश्मीरमधील प्रत्येक नागरिक या अन्यायाविरुद्ध आणि गुलामगिरीविरुद्ध शेवटपर्यंत लढण्यास तयार झाला आहे.