दक्षिण कोरियात राजकीय उलथापालथ; 13 दिवसांत 2 राष्ट्रपतींना महाभियोगातून हटवले, काय आहे संपूर्ण प्रकरण
सियोल: सध्या दक्षिण कोरियामध्ये राजकीय परिस्थिती अत्यंत अस्थिर बनली आहे. काल संसदेत कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष हान डक-सू यांच्यावर महाभियोग आणून त्यांना पदावरून हटविण्यात आले. या प्रस्तावाला 192 मतांचा पाठिंबा मिळाला. हा पाठिंबा लागणाऱ्या 151 मतांपेक्षा अधिक होता. मात्र, या प्रक्रियेमुळे संसदेत प्रचंड गोंधळ झाला आणि काही खासदारांनी एकमेकांचे कॉलर पकडले आहेत. यामुळे दक्षिण कोरियात सध्या रजकीय उलथापालथ सुरु आहे.
महाभियोगाचा प्रस्ताव आणि राजकीय अस्थिरता
मिळालेल्या माहितीनुसार, सत्ताधारी पक्षाने या महाभियोगाची मतदान प्रक्रिया बहिष्कृत केली होती. मात्र, विरोधकांकडे 192 जागा असल्याने प्रस्ताव मंजूर करण्यात आला. हान डक-सू यांना हटवल्यानंतर आता देशाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षपदी वित्तमंत्री चोई सांग-मोक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चोई सांग यांनी 3 डिसेंबरला लागू करण्यात आलेल्या मार्शल लॉला देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी विनाशकारी ठरू शकतो असे जाहीरपणे म्हटले होते.
मार्शल लॉ लागून केल्यानंतर राजकीय वातावरण चिघळले
3 डिसेंबर रोजी राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांनी देशात आपत्कालीन परिस्थिती जाहीर करत मार्शल लॉ लागू केला होता. मात्र, विरोधी पक्षांच्या दबावामुळे हा कायदा केवळ 6 तासांत रद्द करण्यात आला. संसदेत बहुमताने हा प्रस्ताव अवैध ठरवण्यात आला आणि युन सुक-योल यांना पदावरुन हटवण्यात आले. त्यानंतर 14 डिसेंबरला हान डक-सू यांना कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष नेमण्यात आले. परंतु, केवळ 13 दिवसांतच त्यांनाही पद सोडावे लागले.
संसदेत प्रचंड वाद आणि विरोधकांचा विजय
महाभियोगादरम्यान संसदेत वादाचे उग्र रूप दिसून आले. सभापतींनी स्पष्टपणे जाहीर केले की, कार्यवाहक राष्ट्राध्यक्षांना हटवण्यासाठी 50% म्हणजे 151 खासदारांचे समर्थन आवश्यक आहे. विरोधी पक्षाकडे बहुमत असल्याने हे काम सोपे झाले. सत्ताधारी पक्षाकडे फक्त 108 जागा असल्याने त्यांचा विरोध निष्फळ ठरला. मात्र, हान डक-सू यांना हटविण्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांना हटवण्यामागील कारणे
राष्ट्राध्यक्ष यून यांची लोकप्रियता सतत घसरत चालली आहे. त्यांच्या पत्नीच्या वादग्रस्त प्रकरणांमुळे आणि विरोधी पक्षांच्या दबावामुळे ते योग्य निर्णय घेऊ शकत नव्हते असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले. यामुळे त्यांनी मार्शल लॉ लागू करून विरोधकांवर राष्ट्रविरोधी कारवायांचे आरोप केले. परंतु, संविधानानुसार संसद बहुमताने मार्शल लॉला अवैध ठरवू शकते, आणि विरोधकांनी हे साध्य केले. अवघ्या 6 तासांत लॉ हटवण्यात आला आण यून सुक योल यांना देखील पद सोडावे लागले. दक्षिण कोरियामधील ही घटना राजकीय अस्थिरतेचे आणि लोकशाहीच्या संघर्षाचे उदाहरण आहे.