Putin invited Trump to Moscow leaving the US President shocked
Trump Putin Meeting : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्कामध्ये झालेल्या ऐतिहासिक भेटीकडे जगभराचे लक्ष लागले होते. युक्रेन युद्ध, आंतरराष्ट्रीय संबंध, गुंतवणूक आणि भविष्यातील सहकार्य या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. भेटीनंतर झालेली पत्रकार परिषद अवघी १२ मिनिटे चालली; मात्र या थोडक्या वेळेतही दोन्ही देशांच्या भविष्यातील संबंधांबाबत ठोस संदेश देण्यात आला.
पत्रकार परिषदेच्या अखेरीस ट्रम्प म्हणाले “लवकरच पुन्हा भेटू.” यावर हसत पुतिन इंग्रजीत उत्तरले “पुढच्या वेळी मॉस्कोमध्ये.” हा संवाद ऐकून ट्रम्प क्षणभर थबकले, हसत प्रतिक्रिया दिली “अरे वा, ते तर खूपच मनोरंजक आहे.” हा छोटासा संवाद अमेरिकन माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला असून, ट्रम्प यांना रशियाला प्रत्यक्ष भेट देण्याचे निमंत्रण देणे हे अनेकांच्या दृष्टीने आश्चर्यकारक पाऊल ठरले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘युक्रेन युद्ध संपवले तर Trump…’ नोबेल स्वप्नाकडे ट्रम्पचे पाऊल? हिलरींच्या विधानाने वाढली उत्सुकता
पुतिन यांनी आपल्या भाषणात अलास्काच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख केला. त्यांनी आठवण करून दिली की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिका आणि रशिया खांद्याला खांदा लावून लढले होते. त्यांनी मान्य केले की गेल्या काही वर्षांत संबंध तणावपूर्ण राहिले, परंतु ही समोरासमोरची भेट “खूप काळापासून गरजेची” होती.
या बैठकीत युक्रेन युद्ध हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला. पुतिन यांनी स्पष्ट केले की रशियाला युद्ध संपवायचे आहे, परंतु युरोप आणि युक्रेनमुळे चर्चेत अडथळे निर्माण होतात. त्यांनी ट्रम्प यांच्या संघर्षाचे खरे कारण समजून घेण्याच्या प्रयत्नाचे कौतुक केले. पुतिन म्हणाले “झालेल्या सहमतीमुळे युक्रेनमध्ये शांततेची नवी दिशा मिळेल, ही आमची अपेक्षा आहे.”
चर्चेदरम्यान पुतिन यांनी एक मोठा दावा केला “जर ट्रम्प २०२२ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष असते, तर हे युद्ध सुरूच झाले नसते.” पुतिन यांनी ट्रम्प यांच्या “मैत्रीपूर्ण आणि विश्वासार्ह” स्वभावाचे कौतुक केले. तसेच आर्क्टिक प्रदेशात गुंतवणूक आणि सहकार्यासाठी प्रचंड संधी असल्याचे सांगितले.
ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की ते लवकरच नाटो आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करतील. त्यांनी ठाम भूमिका घेतली की “पूर्ण करार होईपर्यंत कोणताही करार मान्य नाही.” ट्रम्प यांनी पुतिन युद्ध संपविण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला, मात्र अजून काही मुद्द्यांवर तोडगा निघणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump-Putin Alaska Meeting : पुतिन-ट्रम्प भेटीत भारतच ‘गुप्त घटक’? जाणून घ्या अलास्का चर्चेचं सत्य
भेट सकारात्मक पद्धतीने संपली. पुतिन यांच्या “पुढच्या वेळी मॉस्कोमध्ये” या वाक्याने केवळ पत्रकार परिषदच नव्हे, तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेची नवी लाट उठवली आहे. ट्रम्प यांनीही पुन्हा भेट होण्याचे संकेत दिले आहेत. आता खऱ्या अर्थाने जगाचे लक्ष पुढील भेटीवर खिळले आहे.