Russia attacks Ukraine 48 drones downed Trump-Zelensky meeting sparks controversy
मॉस्को / वॉशिंग्टन : रशिया-युक्रेन युद्धाचा अंत कधी होणार, याचे उत्तर अद्याप अज्ञात आहे. शुक्रवारी, युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, मात्र त्याच वेळी रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला चढवला. रशियन संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, रशियन सैन्याने युक्रेनकडून पाठवलेले 48 ड्रोन पाडले. तसेच, गेल्या दोन दिवसांत एकूण 70 युक्रेनियन ड्रोन नष्ट केल्याचा दावा करण्यात आला आहे.
रशियाचा आक्रमक पवित्रा कायम
रशियाने युक्रेनवर हल्ले करण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. ओरिओल, कुर्स्क, ब्रायन्स्क, स्मोलेन्स्क आणि क्रास्नोडार या भागांमध्ये युक्रेनकडून ड्रोन हल्ले करण्यात आले होते, मात्र रशियन हवाई संरक्षण यंत्रणेने ते हल्ले निष्फळ ठरवले. विशेषतः कुर्स्क आणि ओरिओल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रोन नष्ट करण्यात आले. रशियन सैन्याच्या या कारवाईमुळे युक्रेनची लष्करी ताकद कमजोर होत चालली आहे. रशियाने गेल्या तीन वर्षांत युक्रेनच्या ११% भूभागावर ताबा मिळवला असून, हा संघर्ष दिवसेंदिवस अधिक उग्र होत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘तुम्ही एकटे नाही आहात… ‘,झेलेन्स्की-ट्रम्प संघर्षानंतर युरोपियन नेत्यांचा युक्रेनला ठाम पाठिंबा, मेलोनींचीही मागणी
तीन वर्षे पूर्ण, हजारो सैनिक मृत्यूमुखी
रशिया-युक्रेन युद्धाला तीन वर्षे पूर्ण झाली असून, युक्रेनचे कमांडर-इन-चीफ कर्नल जनरल ऑलेक्झांडर सिर्स्की यांच्या माहितीनुसार, २०२४ पर्यंत ४,२७,००० रशियन सैनिक मृत अथवा जखमी झाले आहेत. या युद्धामुळे लाखो लोक बेघर झाले असून, दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेसाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत, मात्र अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.
व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प-झेलेन्स्की यांच्यात वाद
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची व्हाईट हाऊसमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत युद्ध समाप्त करण्यावर चर्चा होण्याची अपेक्षा होती, मात्र ती एका मोठ्या वादात रूपांतरित झाली. सुमारे ९ मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये गरमागरम चर्चा झाली आणि शेवटी ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊसमधून बाहेर काढले. ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना ठणकावून सांगितले की, शांतता कराराच्या आधारे युक्रेनने गमावलेली जमीन परत मिळवण्याचा प्रयत्न करावा. मात्र, झेलेन्स्की यांना हा प्रस्ताव मान्य नव्हता, त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आजपासून तुमचे वाईट दिवस सुरू झाले आहेत.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Viral Video : ‘आजपासून तुमचे वाईट दिवस सुरू… ‘, ट्रम्प झेलेन्स्कीमध्ये जोरदार वादावादी, धमकीचा सूर
युद्धाचा शेवट अद्याप अनिश्चित
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला अंत कधी लागणार, हे सांगणे कठीण आहे. दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू आहेत. अमेरिकेच्या मध्यस्थीच्या प्रयत्नांनंतरही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यातील वादामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू असले, तरी दोन्ही बाजूंनी माघार घ्यायची तयारी दिसत नाही. अशा परिस्थितीत, पुढील काळात रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.