Russia-China warn Trump Wrong path on Israel-Iran war
Russia China warning Trump : जागतिक स्तरावर वाढत चाललेल्या इस्रायल-इराण संघर्षावर आता जागतिक महासत्ता रशिया आणि चीननेही चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या सर्वोच्च नेत्यांना धमकी दिल्यानंतर, या प्रकरणावर रशिया आणि चीनने अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यात झालेल्या फोन संवादात, या दोन्ही नेत्यांनी ‘युद्ध हा योग्य मार्ग नाही’ असा स्पष्ट संदेश दिला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच इराणच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्याबाबत तीव्र वक्तव्य करत म्हटले होते की, “आम्हाला माहित आहे खामेनी कुठे लपले आहेत. पण आम्ही त्यांना मारण्याची इच्छा बाळगत नाही.” ट्रम्पच्या या वक्तव्यानंतर मध्यपूर्वेतील वातावरण आणखीनच तापले आहे. ही थेट धमकी इस्रायलच्या ‘ऑपरेशन रायझिंग लायन’नंतर दिली गेली, ज्यात इराणच्या अणु आणि लष्करी ठिकाणांवर हल्ले करण्यात आले होते.
गुरुवारी झालेल्या फोन संवादात शी जिनपिंग यांनी व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करत म्हटले की, “पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे संपूर्ण जागतिक शांततेवर परिणाम होऊ शकतो. यासाठी युद्धबंदी ही तात्काळ प्राथमिकता असायला हवी.” ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय वाद शांततेच्या मार्गाने सोडवले जावेत. बळाचा वापर हा योग्य मार्ग नाही. या प्रतिक्रियेला रशियानेही दुजोरा दिला आहे. क्रेमलिनने जाहीर केले की, “दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी युद्धाशी संबंधित संवेदनशील माहिती शेअर करण्याचे मान्य केले आहे. त्यांच्या संबंधित गुप्तचर यंत्रणांना यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘हे’ आहेत जगातील टॉप 5 सर्वात घातक ड्रोन; 50 हजार फूट उंचीवरून शत्रूला करतात नेस्तनाबूत
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी याच विषयावर युएईचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशीही फोनवर चर्चा केली. दोघांनीही इस्रायल-इराण युद्ध त्वरित थांबवण्याचे आणि इराणच्या अणु कार्यक्रमावर राजकीय उपाय शोधण्याचे समर्थन केले.
गेल्या आठवड्यात इस्रायलने ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ अंतर्गत इराणच्या अणु, क्षेपणास्त्र आणि लष्करी पायाभूत सुविधांवर हल्ले केले. या हल्ल्यानंतर इराणनेही इस्रायलच्या काही लष्करी तळांवर प्रत्युत्तरात्मक हल्ले केले. दोन्ही देशांमध्ये युद्धाचे संकेत अधिक स्पष्ट होत आहेत. या पार्श्वभूमीवर रशिया आणि चीनसारख्या शक्तीशाली राष्ट्रांनी दिलेल्या प्रतिक्रियेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bermuda Triangle Mystery : आत्तापर्यंत किती विमाने झाली बेपत्ता अन् किती जणांना गमावला जीव, जाणून घ्या यामागील रंजक तथ्य
जसे रशिया आणि चीन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे, तसेच युद्ध हा कोणत्याही आंतरराष्ट्रीय समस्येचे समाधान नाही. पश्चिम आशियातील हा संघर्ष तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने नेऊ शकतो, अशी भीती विश्लेषक व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता अंतरराष्ट्रीय पातळीवर संयम, संवाद आणि राजनैतिक हस्तक्षेपाच्या प्रयत्नांना गती देण्याची गरज असल्याचे स्पष्ट होते. इस्रायल-इराण संघर्ष जरी त्या देशांपुरता मर्यादित असला, तरी त्याचे पडसाद संपूर्ण जगावर उमटत आहेत. त्यामुळे या परिस्थितीवर जागतिक नेत्यांनी शांततामूलक हस्तक्षेप करणे हेच काळाची गरज ठरत आहे.