
russia denies iran ukraine intelligence deal us meeting truth
Russia Iran Intelligence Deal Fake News : जागतिक महासत्तांमधील ‘इंटेलिजन्स वॉर’ आता एका नव्या वळणावर आले आहे. रशिया (Russia) आणि अमेरिका (America) यांच्यात पडद्यामागे काहीतरी शिजत असल्याच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. रशियाने अमेरिकेसमोर एक अत्यंत धक्कादायक प्रस्ताव ठेवला होता, अशा बातम्या पाश्चात्य माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या. मात्र, क्रेमलिनने (रशियाचे राष्ट्राध्यक्ष कार्यालय) या सर्व बातम्यांचा कडाडून निषेध केला असून हे रशियाला बदनाम करण्याचे कारस्थान असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकन मीडिया कंपनी ‘पॉलिटिको’ने नुकताच एक खळबळजनक दावा केला. त्यांच्या अहवालानुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे विश्वासू दूत किरिल दिमित्रीव्ह यांनी गेल्या आठवड्यात मियामीमध्ये ट्रम्प प्रशासनाचे दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांची भेट घेतली. या भेटीत रशियाने एक ‘डिल’ सुचवली होती: जर अमेरिकेने युक्रेनला रशियाच्या हालचालींबद्दल गुप्त माहिती (Intelligence) देणे थांबवले, तर रशिया देखील इराणला अमेरिकन युद्धनौका आणि विमानांची माहिती देणे बंद करेल. मात्र, अमेरिकेने हा प्रस्ताव फेटाळून लावल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran-US War: नाटोच्या शेकडो सैनिकांनी रातोरात सोडला इराक; थांबवले ‘Advisory Mission’, पाहा काय आहे कारण?
या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्यानंतर किरिल दिमित्रीव्ह यांनी स्वतः समोर येत सोशल मीडियावर याला ‘बनावट’ (Fake) म्हटले आहे. रशियाच्या मते, अमेरिका आणि रशियामधील तणाव वाढवण्यासाठी आणि शांतता चर्चेत अडथळे आणण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात आहेत. रिपब्लिकन काँग्रेसवुमन ॲना पॉलिना लुना यांनीही ‘पॉलिटिको’वर टीका करत त्यांना ‘युद्ध समर्थक यंत्रणेचे मुखपत्र’ म्हटले आहे. त्यांच्या मते, रशियासोबतच्या कोणत्याही अंतर्गत चर्चेची माहिती बाहेर येणे शक्य नाही, त्यामुळे या केवळ वावड्या आहेत.
Moscow proposed a quid pro quo to the US under which the Kremlin would stop sharing intelligence information with Iran – such as the precise coordinates of US military assets in the Middle East – if the US ceased supplying Ukraine with intel about Russia.https://t.co/rpN0x8XqOZ — POLITICOEurope (@POLITICOEurope) March 20, 2026
credit – social media and Twitter
युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून इराण हा रशियाचा सर्वात मोठा लष्करी मित्र म्हणून समोर आला आहे. युद्धाच्या सुरुवातीलाच इराणने रशियाला घातक ‘शहेद’ ड्रोन पुरवले होते, ज्यांनी युक्रेनच्या शहरांमध्ये मोठी पडझड घडवून आणली. या बदल्यात रशियाने इराणला आधुनिक लष्करी तंत्रज्ञान आणि मध्य-पूर्वेतील अमेरिकन हालचालींची गुप्त माहिती पुरवल्याचा दावा ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने केला होता. रशियाने मानवतावादी मदत पाठवल्याचे कबूल केले असले तरी, लष्करी मदतीवर नेहमीच मौन पाळले आहे.
फेब्रुवारी २०२२ पासून अमेरिका युक्रेनला ‘रिअल-टाइम’ गुप्त माहिती पुरवत आहे. रशियाचे क्षेपणास्त्र कोठे डागले जाणार आहे किंवा रशियन सैन्य कोठे तैनात आहे, याची अचूक माहिती अमेरिकेमुळेच युक्रेनला मिळते. जर रशियाने हा प्रस्ताव खरोखरच दिला असेल, तर याचा अर्थ पुतिन यांना युक्रेनची ही माहितीची रसद तोडायची आहे. मात्र, अमेरिकेने हा प्रस्ताव नाकारल्याने युक्रेनला दिलासा मिळाला असला तरी, पडद्यामागच्या या हालचालींनी युरोपमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Diego Garcia : महासागरातील अमेरिकेच्या सर्वात ‘सुपर बेस’वर इराणच्या ‘SM-3’चा हल्ला; संरक्षण यंत्रणेचे काढले धिंडवडे
रशियाने जरी हे वृत्त फेटाळले असले तरी, आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘धूर निघतोय म्हणजे कुठेतरी आग लागली आहे’ असे मानले जाते. अमेरिका आणि रशियामधील ही गुप्त माहितीची लढाई येणाऱ्या काळात जागतिक युद्धाचे स्वरूप घेते की शांततेचा मार्ग शोधते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सध्या तरी, रशियाने आपला इराणसोबतचा मित्रधर्म पाळण्याचे संकेत दिले आहेत.
Ans: अमेरिकेने युक्रेनला गुप्त माहिती देणे थांबवावे, त्या बदल्यात रशिया इराणला अमेरिकन हालचालींची माहिती देणे बंद करेल, असा दावा केला गेला आहे.
Ans: किरिल दिमित्रीव्ह हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे दूत आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे प्रमुख आहेत.
Ans: इराणने रशियाला 'शहेद' सारखे आत्मघाती ड्रोन आणि लष्करी उपकरणे पुरवून युक्रेन युद्धाच्या सुरुवातीच्या काळात मोठी मदत केली आहे.