वॉश्गिंटन: सध्या रशिया-युक्रेन संघर्ष वाढत चालला आहे. यामुळे जागतिक स्तरावर हे युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत मोठे वक्तव्य करत युद्ध संपवण्यासाठी तात्काळ युद्धविरामाचे आवाहन केले आहे. ट्रम्प यांनी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे युक्रेनचे अध्यक्ष व्लोडिमिर झेलेन्स्की आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर या मुद्द्यावर आपले विचार मांडले.
युद्ध तातडीने थांबले पाहिजे
डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, हे युद्ध विनाकारण लाखो सैनिकांचे प्राण घेत आहे आणि त्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्टद्वारे म्हटले आहे की, ” हे युद्ध तातडीने थांबले पाहिजे आणि चर्चेसाठी पुढाकार घेतला पाहिजे.” त्यांनी दावा केला की रशिया आणि युक्रेन दोन्ही देश हे विनाशकारी युद्ध थांबवण्यास तयार आहेत. यासाठी त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना थेट आवाहन केले की युद्धविरामाची प्रक्रिया सुरू करावी. ट्रम्प यांनी हेही स्पष्ट केले की, शांततेसाठी दोन्ही बाजूंनी सकारात्मक पावले उचलली गेली पाहिजेत.
काय म्हणाले झेलेन्स्की?
युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही याच बैठकीत शांतता प्रक्रियेविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही शांतता कराराला न्याय्य आणि दीर्घकालीन शांततेचा पाया असणे गरजेचे आहे. झेलेन्स्की यांनी सांगितले की, “प्रभावी शांततेबद्दल बोलायचे असल्यास, आम्हाला प्रथम ती शांतता दीर्घकालीन कशी राहील याची हमी मिळाली पाहिजे.” त्यांनी युक्रेनच्या लोकांना शांतता हवी असल्याचे ठामपणे सांगितले.
युक्रेनच युद्धात मोठे नुकसान
युद्धामुळे युक्रेनला आतापर्यंत मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने सुरू केलेल्या या सर्वांगीण आक्रमणात युक्रेनने 43,000 सैनिक गमावले आहेत, तर 370,000 सैनिक जखमी झाले आहेत. त्यामुळे युक्रेनला शांततेची गरज आहे, असे झेलेन्स्की यांनी ठामपणे सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेले वक्तव्य जागतिक पातळीवर चर्चेचा विषय बनले आहे. त्यांचे युद्ध थांबवण्याचे आवाहन आणि शांतता प्रक्रियेचा प्रस्ताव रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी निर्णायक ठरतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी राजकीय आणि कूटनीतिक पातळीवर पुढील वाटचाल कशी होईल, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.