फोटो सौजन्य: सोशल मीडिया
दमास्का: सीरियामध्ये गेल्या काही दिवसांपासून बंडखोर गटांचा विद्रोह सुरू आहे. बंडखोरांनी हामा, होम्स, दारा, ही महत्त्वाची शहरे ताब्यात घेतल्यानंतर आता दमास्कामध्ये विद्रोही गटांनी कब्जा केला आहे. यामुळे संघर्ष एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचले आहे. विद्रोही गटांनी सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांना सत्तेतून हाकूलन लावले. त्यांना आणि त्यांच्या कुटूंबीयांना मॉस्कोमध्ये आश्रय देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
विद्रोही गटांचे नेता आणि त्यांचे समर्थक आता सत्तास्थापनेसाठी प्रयत्नशील आहेत, मात्र हा मार्ग अनेक आव्हानांनी भरलेला आहे. तसेच अमेरिका, रशियासमोर देखील अनेक आव्हाने उभी आहेत.
विद्रोही गटांसमोरील आव्हाने
विद्रोही गटांच्या यशानंतरही देशातील स्थिरता प्रस्थापित करणे एक मोठे आव्हान बंडखोरांसाठी आहे. विद्रोही गटांना जिहादी संघटनांसारखी ओळख मिळाली, तर त्यांना जागतिक पातळीवर मान्यता मिळणे कठीण होईल. विद्रोही गटांच्या नेत्यांनी असे संकेत दिले आहेत की, ते देश चालवण्यासाठी तत्पर आहेत, परंतु त्यांच्या नेतृत्वावर अजूनही संशय घेतला जात आहे.
अमेरिका-रशिया आणि इतर देशांवरील परिणाम
सीरियात विद्रोही गटांचे सत्तास्थापन झाल्यास हा बदल अमेरिका, रशिया, इराण तुर्की आणि इस्त्रायल या देशांच्या हितसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.दमास्कामधील सत्तापालटानंतर इस्त्रायलने गोलान हाइट्स या वादग्रस्त क्षेत्रात आपले सैन्य तैनात केले आहे. याशिवाय, रशियाने असद यांना आश्रय देऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमेरिका आणि रशियाच्या भू-राजकीय संघर्षाच्या छायेत, सीरियाचा पुन्हा विकास हा आव्हानात्मक ठरेल.
सीरियाचे भविष्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित
सत्तांतराच्या प्रक्रियेमुळे देशातील अस्थिरता अधिक वाढण्याची शक्यता आहे. नवीन नेतृत्व कसे असेल, कोणत्या गटांना सामील केले जाईल, आणि देशातील विविध गटांमध्ये एकता प्रस्थापित होईल का, सध्या याबाबत अनिश्चितता आहे. विद्रोही गटांचे नेते अबू मोहम्मद अल-जुलानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याचे राज्य संस्थांचे कार्य विद्रोही गटांच्या देखरेखीखाली चालू ठेवले जाईल. यामुळे सीरियाचे भविष्य काय असे यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
लोकांची भूमिका
असद सरकारच्या पतनानंतर लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून त्यांनी जुन्या “क्रांती ध्वजाचा” वापर केला, जो बशर अल-असद यांचे वडील हाफिज अल-असद यांच्या आधीच्या काळात वापरला जात होता. लोकांच्या या क्रांतीने देशातील आशा जागवल्या आहेत, मात्र या हालचालीतून स्थिर सरकार कधी आणि कसे स्थापन होईल, यावर अवलंबून आहे की, सीरियाचा भविष्यातील मार्ग कसा ठरेल.
सध्याच्या परिस्थितीत, सीरिया अनेक आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समस्यांचा सामना करत आहे. जागतिक शक्तींच्या हस्तक्षेपामुळे हा संघर्ष अधिक गुंतागुंतीचा होत असून, त्यावर मार्ग काढण्यासाठी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर सहकार्याची गरज आहे.