भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियात (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मॉस्को: भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे रशियाच्या अधिकृत दौऱ्यावर मॉस्कोला पोहोचले आहेत. या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारतीय नौदलामध्ये नवीन मल्टी-रोल स्टेल्थ गाइडेड मिसाईल फ्रिगेट ‘INS तुशील’चा समावेश करणे आणि भारत-रशिया यांच्यातील 21व्या आंतर-सरकारी लष्करी व तांत्रिक सहकार्य बैठकीत भाग घेणे आहे. मॉस्कोला रविवारी (8 डिसेंबर) रात्री उशिरा पोहोचल्यानंतर भारतीय राजदूत विनय कुमार आणि रशियाचे उपरक्षामंत्री अलेक्झांडर फोमिन यांनी त्यांचे स्वागत केले.
मॉस्कोमध्ये राजनाथ सिंह यांनी ‘Tomb of Unkown Soldier’ येथे भेट देऊन दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्या सोव्हिएत सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. ही श्रद्धांजली भारत आणि रशियामधील ऐतिहासिक व धोरणात्मक संबंधांचे प्रतीक आहे. याशिवाय, राजनाथ सिंह यांनी तेथील भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधून त्यांच्या अनुभवांचे कौतुक केले.
INS तुशीलच्या समारंभात सहभागी होणार
मिळालेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह INS तुशील या नवीनतम मल्टी-रोल स्टेल्थ गाइडेड मिसाईल फ्रिगेटच्या कमीशनिंग समारंभात सहभागी होणार आहेत. भारतीय नौदलासाठी हे जहाज महत्त्वाचे ठरेल, कारण यामुळे नौदलाची धोरणात्मक क्षमता अधिक वाढेल. या समारंभाच्या दरम्यान राजनाथ सिंह रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार असून, त्यांच्यासोबत लष्करी व तांत्रिक सहकार्याबाबत चर्चा करणार आहेत.
भारत-रशिया संबंधांना नवी उंची
दौऱ्यादरम्यान राजनाथ सिंह आणि रशियाचे उपपंतप्रधान आंद्रेई बेलोसोव 21व्या आंतर-सरकारी लष्करी तांत्रिक सहकार्य बैठकीचे सह-अध्यक्ष असतील. या बैठकीद्वारे दोन्ही देशांमधील विशेष आणि धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याचा प्रयत्न होईल. भारत आणि रशियाचे लष्करी संबंध गेल्या अनेक दशकांपासून मजबूत राहिले आहेत आणि हा दौरा या संबंधांना आणखी बळकटी देण्याचा प्रयत्न आहे.
राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियावर आपला उत्साह व्यक्त करताना या दौऱ्याचा उद्देश भारत-रशिया संरक्षण सहकार्य अधिक दृढ करणे असल्याचे नमूद केले आहे. या दौऱ्यामुळे भारत आणि रशियामधील द्विपक्षीय संबंध आणि लष्करी भागीदारी नव्या उंचीवर पोहोचेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
भारताला या शस्त्रांचा रशियाकडून पुरवठा थांबला
भारत हा अनेक दशकांपासून रशियाचा सर्वात मोठा संरक्षण उपकरणे आयात करणारा देश आहे. क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, रणगाडे, रायफल्स यांसारख्या अनेक प्रमुख शस्त्रांच्या खरेदीमुळे भारतीय सशस्त्र दलांची ताकद वाढली आहे. भारताला अनेक युद्ध जिंकण्यात रशियन शस्त्रास्त्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र युक्रेन युद्धानंतर परिस्थितीमध्ये मोठा बदल झाला आहे.
रशियाकडून सुखोई-30 एमकेआय फायटर जेट आणि टी-90 टँक यांसारख्या महत्त्वाच्या शस्त्रांचे सुटे भाग मिळवण्यात भारताला गंभीर समस्या येत आहेत. भारतीय लष्कराच्या मुख्य लढाऊ रणगाड्यांसाठी सुटे भागांच्या कमतरतेमुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला आहे. याशिवाय भारतीय हवाई दलासाठी महत्त्वाच्या असलेल्या या लढाऊ विमानांचे सुटे भागही वेळेवर उपलब्ध होत नाहीत.