रशिया-युक्रेन युद्ध अद्याप सुरूच; रशियाने युक्रेनवर डागली 31 मिसाईल्स, 44 दिवसांत पहिला हल्ला

रशियाने तब्बल 44 दिवसांनंतर पहिल्यांदाच युक्रेनी राजधानीवर 31 बॅलेस्टिक तसेच क्रूझ मिसाईल्स डागली. वायुसेनाने मात्र हा हल्ला हाणून पाडला. परंतु, यात एका बालिकेसह अन्य 13 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

  किव्ह : रशियाने तब्बल 44 दिवसांनंतर पहिल्यांदाच युक्रेनी राजधानीवर 31 बॅलेस्टिक तसेच क्रूझ मिसाईल्स डागली. वायुसेनाने मात्र हा हल्ला हाणून पाडला. परंतु, यात एका बालिकेसह अन्य 13 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

  किव्ह प्रशासनाचे प्रमुख सेरही पोपको यांच्यानुसार, रशियाने गुरुवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास राजधानीवर दोन बॅलेस्टिक तसेच 29 क्रूझ मिसाईलद्वारे हल्ला चढवला. हल्ल्यानंतर आकाशात आगीचे लाल गोळे खाली कोसळत असल्याचे पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

  अनेकांनी मेट्रो रेल्वेच्या भूमिगत स्थानकात आश्रय घेतला. तसेच, आपत्कालीन सेवा विभागाकडून 80 लोकांना घरांतून सुरक्षित ठिकाणांवर पोहोचविण्यात आले. या घटनांत 13 जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी काहींना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

  आगही लागली

  मिसाईल डागल्याने तीन निवासी इमारतीत आग लागली. तर एक कार पूर्णतः जळाली. याशिवाय रस्त्यांत आणि एका लहान पार्कमध्ये काही खड्डे पडल्याचे दिसून आले. अनेक घरांच्या खिडक्यांचे काचही तुटले.

  दरम्यान, हा हल्ला मागील दिवसांतील सीमेजवळील रशियातील बेलगोरोड क्षेत्रावर युक्रेनकडून वारंवार करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यानंतर करण्यात आला आहे. दुसरीकडे रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी मागील बुधवारी या हल्ल्याचे संकेत दिले होते.