हिंदूवरील हल्ल्यामुळे बांगलादेश सरकार अडचणीत; 800 पानांचा दस्ताऐवज आंतरारष्ट्रीय न्यायालयात
ढाका: बांगलादेशात हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध समुदायावर झालेल्या हल्ल्यांमुळे बांगलादेश सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर, राजकीय वातावरण स्थिर होण्याऐवजी अधिकच तणावपूर्ण बनले आहे. या प्रकरणी शेख हसीना यांच्या पक्ष अवामी लीगने नेदरलँड्सस्थित आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात (ICC) अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस आणि इतर 61 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
अंतरिम सरकारवर चळवळीच्या नावाखाली हत्याकांड केल्याचा आरोप
अवामी लीगचे नेते आणि सिल्हेटचे माजी महापौर अन्वरझ्झमन चौधरी यांनी नुकतेच एका व्हिडिओ संदेशाद्वारे अंतरिम सरकार विरोधात आरोप केला की, 5 ते 8 ऑगस्ट दरम्यान बांगलादेशात विद्यार्थी चळवळीच्या नावाखाली अनेक हत्याकांड घडले, यामध्ये हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध समुदायातील नागरिकांवर हल्ले करण्यात आले. माजी महापौर अन्वरझ्झमन चौधरी यांनी दावा केला आहे की, अवामी लीगचे नेते, कार्यकर्ते, तसेच बांगलादेशी पोलिसांनाही या हिंसाचारात लक्ष्य करण्यात आले. याच्या समर्थनार्थ त्यांनी आयसीसीकडे सुमारे 800 पानांचे पुरावे सादर केले आहेत.
अंतरिम सरकार विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात 15 हजाराहून अधिक तक्रारी
मोहम्मद युनूस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांवर या प्रकरणात सहभागाचा आरोप लावण्यात आला आहे. अवामी लीगने या तक्रारीसह आंतरराष्ट्रीय न्यायालयात 15 हजाराहून अधिक तक्रारी दाखल करण्याची योजना आखली आहे. विशेषत: हिंसाचारग्रस्त महिलांच्या तक्रारींसाठी तयारी केली जात आहे. या मुद्द्यावर अवामी लीगकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर न्याय मिळवण्यासाठी मोठे पाऊल उचलले जात आहे.
अंतरिम सरकारने रॅली आयोजित करण्यास परवानगी नाकारली
दरम्यान, बांगलादेशच्या अंतरिम सरकारने शनिवारी (9 नोव्हेंबर) अवामी लीगला फॅसिस्ट म्हणून संबोधले आणि शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला प्रस्तावित रॅली आयोजित करण्यास परवानगी नाकारली आहे. मुख्य सल्लागार युनूस यांच्या सचिव शफीकुल आलम यांनी सांगितले की, सरकार कोणत्याही प्रकारचा हिंसाचार किंवा कायदा-सुव्यवस्थेचे उल्लंघन सहन करणार नाही. त्यांनी इशारा दिला की जो कोणी हसीना यांच्यासाठी रॅली आयोजित करण्याचा प्रयत्न करेल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. या पार्श्वभूमीवर, बांगलादेशातील अस्थिरता आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा मुद्दा बनली असून, त्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.
अवामी लीगच्या विद्यार्थी संघटनेवर घातली बंदी
काही काळापूर्वी अवामी लीगची विद्यार्थी शाखा ‘स्टुडंट लीग’वर अंतरिम सरकारने बंदी घातली होती. नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने एक राजपत्र जारी केले आणि 2009 च्या दहशतवादविरोधी कायद्याच्या तरतुदींनुसार संघटनेवर बंदी घातली. बांगलादेश स्टुडंट लीग सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कारवायांमध्ये गुंतलेली असल्याचे राजपत्रात म्हटले आहे.
हे देखील वाचा- इस्त्रायलचा लेबनॉनवर पुन्हा कहर; हवाई हल्ल्यात लहान मुलांसह 40 जणांचा मृत्यू