UK angers China Taiwan transit : जग एका बाजूला इस्रायल-इराण संघर्षामुळे अस्थिर झालं असताना, दुसरीकडे आशियात चीन आणि तैवानमधील तणाव पुन्हा एकदा धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे. गुरुवारी रात्रीपासून ते शुक्रवार सकाळपर्यंत चीनने एकूण ७४ लढाऊ विमाने तैवानच्या दिशेने पाठवली, यातील ६१ विमानांनी तैवान सामुद्रधुनीतील मध्यरेषा ओलांडली. ही अनौपचारिक सीमा तैवान आणि चीन यांच्यातील सुसंवादाचे प्रतीक मानली जाते.
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चीनने ही विमाने दोन टप्प्यांमध्ये पाठवली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या हवाई घुसखोरीमागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, सुरक्षा तज्ज्ञांचा अंदाज आहे की चीन ही कारवाई तैवानला घेरण्याची मनोवैज्ञानिक तयारी आणि सामरिक इशारा म्हणून करत आहे.
तैवानवर घेराबंदीचा मानसिक खेळ?
चीन तैवानला आपला प्रांत मानतो आणि वेळोवेळी लष्करी दबाव टाकून तैवानला जागतिक पातळीवर एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे. तज्ज्ञांच्या मते, तैवानच्या जनतेच्या आणि लष्कराच्या मनोबलावर परिणाम करण्यासाठी चीन सातत्याने अशी धडकी भरवणारी कारवाई करतो. यावेळी केवळ हवाई नव्हे, तर ६ चिनी नौदल जहाजेही तैवानच्या जलमर्यादेत पाहायला मिळाली, ज्यामुळे तैवानच्या सागरी सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : थायलंडमध्ये राजकीय खळबळ! काका आणि त्यांची खुर्ची धोक्यात, ‘17 मिनिटांच्या कॉल’मुळे पंतप्रधान अडचणीत
ब्रिटिश गस्ती जहाजामुळे वाढला तणाव?
या घटनेच्या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ब्रिटनच्या एचएमएस स्पे या रॉयल नेव्ही गस्ती जहाजाचा तैवान सामुद्रधुनीतून झालेला प्रवेश. एक दिवस आधीच हे जहाज या जलमार्गातून गेले आणि तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्याचे स्वागत करत म्हटले की, “तैवान सामुद्रधुनी हे आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र आहे, आणि त्याचा वापर मुक्तपणे करता येणे ही आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत अपेक्षित बाब आहे.” ब्रिटननेही आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, “ही कारवाई इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील मुक्त आणि खुले नौसैनिक मार्ग सुनिश्चित करण्यासाठी होती,” आणि कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्वावर घाला घालण्याचा उद्देश नव्हता.
चीनची तीव्र प्रतिक्रिया – सैनिकी कारवाईचा इशारा
ब्रिटिश युद्धनौकेच्या या हालचालीने चीन संतप्त झाला आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ईस्टर्न थिएटर कमांडने निवेदन जारी करत, एचएमएस स्पेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आल्याचे आणि आवश्यक ती सैनिकी प्रतिक्रिया देण्यात आल्याचे सांगितले. चीनने ब्रिटनवर आरोप केला की, त्यांच्या कारवाईमुळे तैवान सामुद्रधुनीतील स्थिरता आणि शांती धोक्यात आली आहे. तथापि, चीनने पाठवलेली ७४ लढाऊ विमाने आणि नौदलाची हालचाल नेमकी ब्रिटनच्या कारवाईला उत्तर म्हणून होती की आधीपासूनच आखलेली लष्करी योजना होती, हे अद्याप स्पष्ट नाही.
जागतिक दृष्टिकोनातून चिंता वाढतेय
तैवानच्या दिशेने लष्करी ताकद दाखवत चीनने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय समुदायाच्या चिंतेत भर टाकली आहे. अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांनी यापूर्वीही तैवानच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली आहे. युद्धाच्या छायेखाली असलेल्या जगात हा आणखी एक संभाव्य संघर्षाचा धागा बनू शकतो, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इराण-इस्रायल संघर्षात हुकूमशाहाची उडी! उत्तर कोरियाची तिखट प्रतिक्रिया, डोनाल्ड ट्रम्प यांचा संयम संपला
चीनचा इशारा की युद्धसदृश तयारी?
चीनकडून तैवानभोवती लष्करी हालचाली सतत वाढत आहेत. हे केवळ सामरिक इशारे नसून, तैवानला जागतिकदृष्ट्या वेगळे करण्याचा आणि आतून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे, असं अनेक विश्लेषक मानतात. ब्रिटनसारख्या देशांची उपस्थिती या तणावाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देत आहे. आता प्रश्न असा आहे की – चीनच्या पुढील पावलाने तैवानच्या स्वातंत्र्याला आणखी मोठा धोका निर्माण होईल का?