Tariffs threaten global recession fears of huge rise in inflation, unemployment
नवी दिल्ली: डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या मनमानी टॅरिफविरोधात चीनसारखे काही देश अमेरिकेविरुद्ध सूडाचे उपाय जाहीर करू शकतात, ज्यामुळे जगभरात व्यापार युद्ध सुरू होईल. यामुळे महागाईत लक्षणीय वाढ होईल, शिवाय मोठी आर्थिक मंदी येऊ शकते, असा इशारा सर्वच ब्रोकरेज फर्मनी दिला आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प खूपच आक्रमकपणे आपली धोरणे राबवताना दिसत आहेत. त्यांनी आपल्या देशातील आयात वस्तूंवर जेवढा कर लावला जातो, तितकाच कर त्या देशातून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जगभरात व्यापार तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. यामुळे अमेरिका आणि जागतिक अर्थव्यवस्था दोन्ही मंदीच्या दलदलीत अडकू शकतात, असे जागतिक व्यापार संस्थानी म्हटले आहे.
एचएसबीसीने एका संशोधन अहवालात म्हटले आहे की, टैरिफमुळे जागतिक व्यापार मंदावू शकतो. जागतिक निर्यात वाढ २०२४ मध्ये २.९ टक्के होती. ती २०२५-२६ मध्ये १.३ टक्क्यांपर्यंत घसरून १.६ टक्क्यांपर्यंत खाली पोहोचू शकते. याचे मुख्य कारण अमेरिकेतील मागणीत, म्हणजेच पर्यायाने आयातीतील घट आणि व्यापार धोरणांवरील अनिश्चिततेमुळे जागतिक गुंतवणुकीवर नकारात्मक परिणामामुळे ही घसरण झाल्याचे पाहायला मिळेल.
या टॅरिफचा महागाईवर परिणाम होईल. या वर्षी जगभरात महागाई दोन टक्क्यांनी वाढू शकते. वाढत्या महागाईमुळे केवळ मागणी आणि वापर कमी होणार नाही तर बेरोजगारी देखील वाढण्याची शक्यता आहे, असे ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गन यांनी सांगितले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पापुआ न्यू गिनीमध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशाराही जारी
बाजार तज्ञांच्या मते, वाढत्या जागतिक अनिश्चिततेमुळे शेअर बाजारातील गोंधळ वाढू शकतो. अपेक्षांपेक्षा जास्त असलेल्या शुल्कांमुळे नजीकच्या भविष्यात बाजार अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे, असे ॲक्सिस सिक्युरिटीजने म्हटले आहे.
अमेरिकेने भारतावर लादलेल्या २७ टक्के टॅरिफमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ०.५ टक्क्यांपर्यंत कमी कमी होऊ शकतो. यामुळे, जीडीपी वाढीचा दर ६ टक्क्यांपर्यंत घसरू शकतो. याशिवाय, चालू आर्थिक वर्षात अमेरिकेतील निर्यात २-३ टक्क्यांनी कमी होऊ शकते, असा अंदाज आहे.
भारतीय फार्मा क्षेत्रांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे. हे क्षेत्र भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्वाचे आहेत. यामुळे भारताला दिलासा मिळेल. दुसरीकडे चीन चीनकडून होणाऱ्या नुकसानाचा फायदा भारताला होऊ शकतो, कारण चिनी उत्पादनांवरील कर आणखी जास्त आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय चर्चा सुरू आहे. चीनला शह देण्यासाठी भारताला धरून ठेवणे अमेरिकेला तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे दोन्ही देशांत व्यापारविषयक बाबींमध्ये सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल, असा व्यापार तज्ञ तर्क काढत आहेत.
भारतीय शेअर बाजार शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही १ टक्क्यांहून अधिक घसरले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मोठ्या शुल्क आकारण्याच्या घोषणांमुळे व्यापार युद्ध आणि जागतिक मंदीची भीती व्यक्त करण्यात आली आहे. परिणामी, या जागतिक कमकुवत संकेतादरम्यान अमेरिकेसह आशियाई बाजारात हाहाकार उडाला. यामुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत.
बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक दोन्ही ३ टक्क्यांहून अधिक घसरले. सेन्सेक्स ९३० अंकांनी घसरून ७५,३६४ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ३४५ अंकांच्या घसरणीसह २२,९०४ पर्यंत खाली आला. यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे १० लाख कोटी रुपये बुडाले. निफ्टीवरील सर्व क्षेत्रीय निर्देशांकांत विक्रीचा जोर वाढल्याने ते लाल रंगात रंगले. मेटल, फार्मा आणि आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. निफ्टी फार्मा निर्देशांक ४.५ टक्के घसरला.