पापुआ न्यू गिनीमध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशाराही जारी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पापुआ न्यू गिनीमध्ये शनिवारी (05 एप्रिल) 7.1 तीव्रतेच्या भूकंपाचे जोरदार झटके जाणवले. पापुआ न्यू गिनीमधील न्यू ब्रिटन प्रदेशाच्या किन्याऱ्यावर मोठा भूकंप झाला. ही माहिती युरोपियन-भमध्ये भूकंपशास्त्रीय क्रेंद्राने (EMSC) दिली. सध्या कोणत्याही प्रकारच्या जीवीत व वित्तहानीची माहिती समोर आलेली नाही. पंरतु भूकंपाच्या जोरदार झटक्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. तसेच त्सुनामीचा इशाराही जारी करण्यात आला आहे.
EMSC ने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची खोली सुमारे 49 किलोमीटर खोल होती. अमेरिकेच्या त्सुनामी चेतावणी केंद्राने त्सुनामीचा इशाराही दिला आहे. यापूर्वी शुक्रवारी (04 एप्रिल) संध्याकाळी पश्चिम नेपाळमध्ये तीन मिनिटांच्या अंतराने दोन भूकंपाचे तीव्र झटके जाणवले होते. यामुळे सध्या संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण पसरलेले आहे.
राष्ट्रीय भूकंपक्षेत्राच्या दिलेल्या माहितीनुसार, जाजरकोट जिल्ह्यातही शुक्रवारी (04 एप्रिल) रात्री 8:07 वाजता 5.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर 8:10 वाजता 5.5 तीव्रेतेचा दुसरा भूंकप झाला. मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही भूकंपाचे क्रेंद्रबिंदू काठमांडूपासून 525 किलोमीटर पश्चिमेला जाजरकोटच्या पणिक क्षेत्रात होते.
नेपाळसह भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गेल्या महिन्यांत म्यानमार आणि थायलंडमध्येही मोठा भूकंप झाला. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती. म्यानमारच्या लष्करी सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुले आतापर्यंत 3 हजार 85 लोकांचा बळी गेला आहे. या आपत्तीत सुमारे 4 हजार 715 लोक जखमी झाले असून अद्याप 341 लोक बेपत्ता आहेत.
या संकटाच्या पार्श्वभूमीवर म्यानमारच्या लष्करी सरकारने 22 एप्रिलपर्यंत तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली आहे, जेणेकरून बचाव कार्य अधिक प्रभावीपणे राबवता येईल. म्यानमारच्या संरक्षण सेवा कमांडर-इन-चीफच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, “भूकंपग्रस्तांप्रती सहानुभूती व्यक्त करण्यासाठी आणि मदत कार्याला गती देण्यासाठी हा युद्धविराम लागू केला जात आहे.” तसेच, देशात शांतता आणि स्थैर्य राखण्याचाही प्रयत्न करण्यात येणार आहे.
भूकंपामुळे बाधित भागांमध्ये रुग्णालये, आपत्कालीन निवारा केंद्रे आणि मदत छावण्या स्थापन केल्या जात आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी म्यानमारला मदत पुरवण्यासाठी पुढाकार घेतला असून, जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. म्यानमारच्या लष्करी प्रशासनाने देशभरातील स्वयंसेवी संस्था, मदत कार्यकर्ते आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला भूकंपग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले आहे. “आम्ही संकटाचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत,” असे लष्कराच्या वतीने सांगण्यात आले.