
पाकिस्तानच्या लष्करी तळावर 'तालिबान'चा कब्जा; TTP ने Video ही केला जारी
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान, तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) च्या दहशतवाद्यांनी खैबर पख्तूनख्वामधील बाजौर जिल्ह्यातील सालारझाई भागात पाकिस्तानी लष्करी तळावर कब्जा केला आहे. 30 डिसेंबर 2024 रोजी सकाळी पाकिस्तानी लष्करी तळावर कब्जा केला, केल्याचा दावा TTP ने केला आहे. या भागात दहशतवादी कारवायांमध्ये सातत्याने वाढ होत असून एखाद्या देशाची लष्करी तळ दहशतवाद्यांनी ताब्यात घेणे ही मोठी घटना मानली जात आहे.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील ड्युरंड सीमेवरून टीटीपीच्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी लष्करी तळावर कब्जा केल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानी मीडियाने एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, काही काळापूर्वी हा लष्करी तळ रिकामा करण्यात आला होता आणि लष्कराचे जवान येथे तैनात नव्हते. पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ही प्रक्रिया केवळ बाजौरपुरती मर्यादित नव्हती, तर उत्तर आणि दक्षिण वझिरीस्तानमधील काही जुने लष्करी तळही रिकामे करण्यात आले आहेत आणि सैनिकांना नवीन तळांवर स्थानांतरित करण्यात आलं आहे. आज तकने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) अफगाणिस्तानमधील टीटीपी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानी लष्करासोबत युद्ध सुरू केले आहे. अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात पाकिस्तानी हवाई हल्ल्यात 46 जण ठार तर 6 जखमी झाले आहेत. एका वरिष्ठ पाकिस्तानी सुरक्षा सूत्राने सूचित केले की त्यांनी टीटीपी स्थानांवर हवाई हल्ले केले होते. मात्र, इस्लामाबादने हवाई हल्ला झाल्याचं नाकारलं आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीटीपीने एकामागून एक हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराचे अनेक सैनिक मारल्याचा दावा केला आहे.
Explainer : हिवाळ्यातच का वाढतो हवा प्रदूषणाचा धोका?; थंड हवेशी काय आहे संबंध? वाचा सविस्तर
टीटीपीच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी लष्कर आणि अफगाणिस्तानातील सत्ताधारी तालिबान सैन्य यांच्यात युद्धासारखी परिस्थितीही निर्माण झाली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्ताने सीमेवर शस्त्रे आणि सैन्यबळ तैनात केलं आहे. पाकिस्तानी लष्कराने एका निवेदनात म्हटलं आहे की, 13 टीटीपी दहशतवाद्यांना ठार केले आहे, तर उत्तर वझिरीस्तानमध्ये एका वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यासह अनेक सैनिक मारले गेले आहेत. या दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) म्हणजेच ज्याला पाकिस्तानी तालिबान म्हणून ओळखलं जातं. 2007 मध्ये बैतुल्ला मेहसूदने स्थापन केलेल्या विविध इस्लामिक सशस्त्र दहशतवादी गटांची ही एक संघटना आहे. अफगाण तालिबानची ही एक शाखा आहे. 2001-2021 च्या पाकिस्तान सरकारविरुद्धच्या युद्धात तालिबानने तहरीक-ए-तालिबानला मदत केली होती.
तथापि, पाकिस्तानी आणि अफगाण तालिबानच्या ऑपरेशन्स आणि कमांड स्ट्रक्चर्स भिन्न आहेत. टीटीपीचे नेतृत्व सध्या नूर वली मेहसूदडे आहे, ज्याने जाहीरपणे अफगाण तालिबान उर्फ ’इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान’शी निष्ठा जाहीर केली आहे. 2021 मध्ये अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली होती. टीटीपी प्रामुख्याने अफगाण-पाकिस्तान सीमेवर कार्यरत आहे परंतु पाकिस्तानच्या जवळजवळ सर्व प्रमुख भागांमध्ये हल्ले केले आहेत.