
Tennessee death penalty Christa Pike execution update
अमेरिकेतील टेनेसी राज्यातून (Tennessee Death Penalty) एक अत्यंत अस्वस्थ करणारी आणि कायदेशीर इतिहास हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. एका हत्येच्या आरोपाखाली गेल्या ३० वर्षांपासून तुरुंगात मृत्युदंडाची वाट पाहणाऱ्या क्रिस्टा पाईक (Christa Pike) नावाच्या महिलेला देण्यात आलेली फाशीची प्रक्रिया अखेर अपयशी ठरली आहे. तुरुंग प्रशासनाने तिला दोन प्राणघातक इंजेक्शन्स दिली, तरीही ती मरण पावली नाही. या धक्कादायक घटनेनंतर तिची शिक्षा तात्पुरती स्थगित करण्यात आली असून सध्या तिच्यावर रुग्णालयात तातडीचे वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या अधिकृत वृत्तानुसार, ५० वर्षीय क्रिस्टा पाईक हिला १९९६ मध्ये आपल्या एका वर्गमित्राची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवून मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. प्रदीर्घ कायदेशीर लढाई आणि अनेक याचिका फेटाळल्यानंतर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तिच्या मृत्युदंडावर अंतिम शिक्कामोर्तब केले होते. त्यानुसार टेनेसीतील रिव्हरबेंड मॅक्सिमम सिक्युरिटी इन्स्टिट्यूशनमध्ये तिच्या फाशीची प्रक्रिया सुरू झाली. तिला विषारी रसायनांचे पहिले आणि त्यानंतर दुसरे प्राणघातक इंजेक्शन देण्यात आले. मात्र, डॉक्टरांना आणि उपस्थित अधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा दोन डोस दिल्यानंतरही तिच्या हृदयाची धडधड चालूच राहिली आणि ती केवळ बेशुद्ध होऊन घोरू लागली.
क्रिस्टा पाईकचा मृत्यू न होता ती केवळ गाढ झोपेत गेल्याचे आणि तिचे हृदय धडधडत असल्याचे लक्षात येताच, तिच्या कायदेशीर टीमने तातडीने न्यायालयात धाव घेऊन या प्रक्रियेला आव्हान दिले. वकिलांनी असा युक्तिवाद केला की, ही प्रक्रिया अत्यंत क्रूर आणि अयशस्वी ठरली आहे, ज्यामुळे कैद्याला अमानुष वेदना सहन कराव्या लागत आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तुरुंग प्रशासनाने तात्काळ फाशीची प्रक्रिया थांबवली आणि पाईकला रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात दाखल केले, जिथे तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mecca : आत्मघाती हल्लेखोराचा मक्का येथील भव्य मशिदीवर हल्ला; VIDEO सोशल मीडियावर VIRAL; सौदी सरकारने उघड केले सत्य
हे प्रकरण केवळ एका हत्येच्या शिक्षेपुरते मर्यादित नसून यामागे १९९५ मधील एक भीषण गुन्हेगारी इतिहास आहे. क्रिस्टा पाईक जेव्हा अवघ्या १८ वर्षांची होती, तेव्हा तिने तिचा तत्कालीन प्रियकर टेड्रिल शिप याच्यासोबत मिळून एका जॉब ट्रेनिंग कॅम्पमध्ये १९ वर्षीय कोलीन स्लेमर हिची निघृण हत्या केली होती. या गुन्ह्याच्या तीव्रतेमुळे १९९६ मध्ये अवघ्या २० व्या वर्षी तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, ज्यामुळे ती अमेरिकेतील सर्वात तरुण फाशीची शिक्षा मिळालेल्या महिलांपैकी एक ठरली होती.
टेनेसी राज्याच्या इतिहासामध्ये या घटनेला अत्यंत महत्त्व आहे. कारण, या राज्यात शेवटच्या वेळी एका महिलेला १८१९ साली (२०७ वर्षांपूर्वी) फाशी देण्यात आली होती. त्यानंतर आजपर्यंत कोणत्याही महिला कैद्याला प्राणघातक इंजेक्शन किंवा फाशी देऊन मृत्युदंड देण्यात आलेला नाही. जर क्रिस्टा पाईकचा या प्रक्रियेत मृत्यू झाला असता, तर ती २०७ वर्षांत टेनेसीमध्ये मृत्युदंड मिळवणारी पहिली महिला ठरली असती.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Modi : ‘भारताला तुमचा अभिमान आहे’ पंतप्रधान मोदींचा कॅप्टन स्मित माच्छर यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद; प्रकृतीची केली विचारपूस
आता या अयशस्वी प्रक्रियेनंतर अमेरिकेत मृत्युदंडाच्या पद्धतींवर पुन्हा एकदा जोरदार वाद पेटला आहे. टेनेसीच्या राज्यपालांनी या घटनेची गंभीर दखल घेत राज्यातील सर्व मृत्युदंडाच्या प्रक्रिया काही काळासाठी स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकन कायद्यानुसार एखाद्या कैद्याला पुन्हा मृत्युदंड दिला जाऊ शकतो का, अथवा अमानुष त्रासामुळे तिच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर होईल का, याबाबत आता सोशल मीडियापासून ते न्यायालयापर्यंत तीव्र चर्चा रंगली आहे.