रशिया किंवा चीन नव्हे, 'या' देशाने दिले इराणला आण्विक तंत्रज्ञान; नाव जाणून बसेल धक्का
तेहरान: इराणचा आण्विक कार्यक्रम अनेक वर्षांपासून जागतिक स्तरावर चर्चेचा विषय बनलेला आहे. इस्त्रायल आणि अमेरिका यासह अनेक पाश्चिमात्य देशांचा दावा आहे की इराण गुप्तपणे आण्विक शस्त्रे तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनीही म्हटले आहे की, इराणमधील अस्थिर परिस्थितीमुळे इराण लवकरच आण्विक शस्त्र निर्माण करण्याचा निर्णय घेऊ शकतात. इस्त्रायलनेही इराणच्या आण्विक धोरणाला त्यांच्या अस्तित्वासाठी धोका मानले आहे.
इराणचा आण्विक प्रकल्प कसा सुरू झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, इराणचे आण्विक तंत्रज्ञान 1950 च्या दशकात सुरू झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे तंत्रज्ञान त्यांना रशिया किंवा चीनकडून नव्हे, तर अमेरिकेकडून मिळाले असल्याचे म्हटले जात आहे. शीतयुद्धाच्या काळात, अमेरिकेने ” ॲटम फॉर पीस” या प्रकल्पांतर्गत इराणला आण्विक तंत्रज्ञान दिले. 1957 मध्ये इराण आणि अमेरिकेमध्ये एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. ज्याद्वारे अमेरिकेने इराणला प्रशिक्षण, उपकरणे, आणि इंधन पुरवले. 1967 मध्ये, अमेरिकेने इराणला 5 मेगावाटचा संशोधन रिएक्टर प्रदान केला.
इतर देशांचा सहभाग
याशिवाय, फ्रान्सने 1974 मध्ये एका फ्रेंच यूरेनियम संवर्धन प्रकल्पात 1 अब्ज डॉलरचा गुंतवणूक केली होती. जर्मन कंपनी क्राफ्टवर्कने बुशहर येथे आण्विक ऊर्जा प्रकल्प उभारण्यात इराणला मदत केली. तसेच 1975 मध्ये एमआयटी (मासॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी)ने इराणी इंजीनियर्सला आण्विक शिक्षण देण्यासाठी इराणसोबत करार केला होता. मात्र, 1979 च्या इराणी क्रांतीनंतर हा करारा रद्द करण्यात आला.
इराणचा दावा काय?
इराणने नेहमीच आपल्या आण्विक प्रकल्पांना शांततामय उद्देश असल्याचे सांगितले आहे. 2024 मध्ये एका इराणी प्रवक्त्याने पुन्हा एकदा स्पष्ट केले होते की, इराणचा आण्विक प्रकल्प केवळ ऊर्जा निर्मिती आणि संशोधनासाठी आहे. परमाणु शस्त्रनिर्मितीला आमच्या राष्ट्रीय धोरणामध्ये कोणतेही स्थान नाही असे इराणच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले होत.
आजची स्थिती
इराणकडे सध्या अनेक यूरेनियम खाणी, संशोधन केंद्रे, आणि संवर्धन सुविधा आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, इराण जर आण्विक शस्त्रे बनवण्याचा निर्णय घेतला तर त्याला लवकरच आण्विक शस्त्र तयार करण्यासाठी लागणारे सर्व घटक उपलब्ध आहेत. मात्र, पाश्चिमात्य देश आणि आंतरराष्ट्रीय समुदाय यामुळे चिंतित असून, ते इराणवर सतत निर्बंध लादत आहेत. इराणच्या आण्विक प्रकल्पांचा पाया अमेरिकेने घातला, मात्र नंतरच्या काही घडामोडींमुळे हा मुद्दा अधिक संवेदनशील झाला आहे. आजही इराणचा आण्विक प्रकल्प शांततामय की युद्धसंबंधित, यावर जागतिक स्तरावर वाद सुरूच आहे.