Trump administration Nearly fired 10,000 of federal workers
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक निर्णयांनी देशाला आणि संपूर्ण जगला हादरवून टाकले आहे. अमेरिकेत दोन लिंगाना मान्यता देण्यापासून ते अवैध स्थलांतरितांना बाहेर काढण्यापर्यंत अनेक मोठ्या कार्यकारी आदेशांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा आणखी एक मोठी कारवाई करत अमेरिकेच्या अनेक संस्थांमधून नोकरवर्गात कपात केली आहे. त्यांच्या या निर्णयाने सरकारी कर्मचाऱ्यांवर मोठा आघात झाला आहे.
ट्रम्प यांनी आतापर्यंत 9, 500 हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसा, यामुळे सरकारी खर्च वाढत असून तो कमी करण्याच्या उद्देशाने या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे आणि भविष्यातही आणखी कर्मचाऱ्यांची कपात होण्याची शक्यता आहे.
एलॉन मस्क आणि ट्रम्प मैत्री
डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांची मैत्री कोणाला माहित नाही असे नाही. ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा शपथ घेताच ट्रम्प यांनी आपल्या प्रशासनात मस्क यांचा समावेश केला आणि त्यांना ‘डिपार्टमेंट ऑफ गवर्मेंट इफिशिएंसी’ या तात्पुरत्या विभागाचे प्रमुख बनवले. ‘डिपार्टमेंट ऑफ गवर्मेंट इफिशिएंसी’ विभाग अमेरिकेन सरकारचा अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सरकराी कामाकाजात अधिकाधिक कार्यक्षमता आणण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे. या विभागाने दिलेल्या सल्ल्यानुसार मोठ्या प्रमाणावर सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले जात आहे.
या विभागांमध्ये कपात
आतापर्यंत लष्करी, गृह सुरक्षा, उर्जा, वेटरन, कृषी, आरोग्य आणि मानव सेवा विभागांतील कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्यात आले आहे. त्याचबरोबर काही एजन्सी देखील बंद करण्यात आल्या आहेत, यामध्ये कंझ्युमर फायनान्शियल प्रोटेक्शन ब्युरोचाही समावेश आहे. कर गोळा करणाऱ्या एजन्सी आणि इंटरनल रिव्हेन्यू सर्विससुद्धा मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कमी करण्याच्या तयारीत आहेत.
का होत आहे मोठ्या प्रमाणात कपात
ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन केंद्र सरकार प्रचंड कर्जात आहे. गेल्या वर्षी 1.8 ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान जाले असून सरकारवर एकूण ३६ ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, अनेक विभागांमध्ये अनावश्यकपणे जास्त कर्मचारी आहेत आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे गरजेचे आहे.
३% कर्मचारी देत आहेत स्वेच्छेने राजीनामा
ट्रम्प यांनी शपथ घेतल्याच्या काही दिवसांतच 20 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवली होती. यामध्ये कर्मचाऱ्यांना स्वच्छेने राजीनामा दिल्यास 8 महिन्यांची वेतनभरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. काहींना याचा तीव्र विरोध केला मात्र, परत नोकरी टिकण्याची खात्री नसल्याने 75 हजारांहून अनेक कर्मचाऱ्यांनी स्वच्छेने राजीनामा दिला आहे. ही संख्या एकूण सरकारी कर्मचाऱ्यांच्या जवळपास 3% इतकी आहे. अमेरिकेत सध्या 23 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आहेत.