US Army to no longer allow transgender people in Military
वॉशिंग्टन: अमेरिकन लष्कराने डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या मार्गदर्शनाकाली मोठा निर्णय घेत ट्रान्सजेंडर व्यक्तींना सैन्यात भरती होण्यास बंदी घातली आहे. या अंतर्गत शनिवारी (15 फेब्रुवारी) अमेरिकन लष्कराने एक निवेदन जारी केले असून या निवेदनानुसार, ट्रान्सजेंडर व्यक्तींना आता सैन्यात प्रवेश मिळणार नाही, तसेच लिंग परिवर्तन प्रक्रियेची सुविधाही बंद करण्यात येईल. लष्कराच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा अमेरिकेत लिंग समानतेच्या वादाला तोंड फुटले आहे.
ट्रान्सजेंडर व्यक्तींना लष्करी प्रवेश बंद
अमेरिकन लष्कराने निवदेनात म्हटले आहे, “लिंग डिस्फोरिया असलेल्या व्यक्तींच्या सैन्यातील प्रवेशावर पूर्णपणे बंदी घातली जाईल. तसेच, सध्या सेवेतील कोणत्याही सैनिकासाठी लिंग परिवर्तनाशी संबंधित सर्व नियोजित व अनिर्धारित वैद्यकीय प्रक्रियेवर त्वरित परिणामकारक बंदी लागू केली आहे.” याशिवाय, लष्कराने असेही नमूद केले आहे आहे लिंग डिस्पोरेयाशी संबंधित सैनिकांसोबत आदराने वागले जाईल आणि त्यांच्या सेवेचा आदर केला जाईल, मात्र लिंग-पुष्टीकरण अुचार पुढील सुचनेपर्यंत थांबवल जातील.
The #USArmy will no longer allow transgender individuals to join the military and will stop performing or facilitating procedures associated with gender transition for service members.
Stay tuned for more details.
— U.S. Army (@USArmy) February 14, 2025
पहिल्या कार्यकाळातही ट्रम्प ट्रान्सजेंडर सैनिकांच्या विरोधात
ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळातही ट्रान्सजेंडर सैनिकांवर बंदी आणण्याचे आश्वासन दिले होते. २०१६ साली तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी ही बंदी उठवली होती, परंतु ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात पुन्हा हा निर्णय लागू करण्यावर भर दिला आहे.
मियामी, फ्लोरिडा येथे रिपब्लिकन रिट्रीट दरम्यान ट्रम्प यांनी ट्रान्सजेंडर सैनिकांवर बंदी घालण्याच्या आपल्या धोरणावर ठाम राहण्याचा संकल्प केला. त्यांनी जाहीरपणे सांगितले की, “आम्ही ट्रांसजेंडर विचारधारेला सैन्यातून पूर्णतः नष्ट करू. आमच्या लढाऊ सेनेला जगातील सर्वोत्तम आणि अत्यंत घातक बनवण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे.”
अमेरिकेत लिंग समानतेच्या मुद्द्यावर वाद
या निर्णयामुळे अमेरिकन सैन्याच्या धोरणांवर मोठा परिणाम होणार असून विविध गट आणि मानवाधिकार संघटनांनी या निर्णयावर कडाडून टीका केली आहे. ट्रान्सजेंडर सैनिकांना सैन्यात समान वागणूक मिळावी यासाठी लढा देणाऱ्या अनेक संघटनांनी हा निर्णय परत घेण्याची मागणी केली आहे. अमेरिकन सैन्याच्या या धोरणामुळे लिंग समानतेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा जगभरात चर्चेला तोंड फोडले आहे.
काही दिवसांपूर्वी देखील ट्रम्प यांनी ट्रान्सजेंडर खेळाडूंना महिलांच्या स्पर्धेत सहभागी होण्याच्या बंदी घालण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली होती. तसेच अमेरिकेत फक्त दोनच लिंगाना मान्यता मिळणार स्त्री आणि पुरुष असा आदेश त्यांनी शपथ घेताच जाहीर केला होता.