
Donald Trump Iran Statement Mohsen Rezaei US Iran Negotiations
अमेरिका आणि इराण (US-Iran Conflict) यांच्यातील राजनैतिक तणाव आणि लष्करी संघर्ष आता एका अत्यंत नाजूक व गंभीर वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराण चर्चेसाठी आतुर असल्याचा दावा केल्यानंतर, इराणने तो तात्काळ आणि ठामपणे फेटाळून लावला आहे. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रझाई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर पोस्ट करत अमेरिकेला इशारा दिला की, जोपर्यंत इराणने घातलेल्या सर्व अटी पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत अमेरिकेसोबत कसलीही वाटाघाटी होणार नाही. ट्रम्प हे सातत्याने आपली विधाने बदलून जगाची दिशाभूल करत आहेत, असेही रझाई यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
पश्चिम आशियातील युद्धाचे ढग अधिक गडद होत असताना दोन्ही देशांमधील हा शब्दच्छल आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचा विषय ठरत आहे. ट्रम्प यांनी सोमवारी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक वक्तव्य केले होते, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, “आर्थिक व लष्करीदृष्ट्या कमजोर झालेला इराण लवकरात लवकर आणि कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेसोबत करार करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे. आता अमेरिका त्यांच्याशी पुन्हा चर्चा करणार की नाही, याचा निर्णय मी घेईन. मात्र, आम्ही या कल्पनेचा विचार करण्यास तयार आहोत.” ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर मध्यपूर्वेत चर्चेच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या, मात्र रझाई यांच्या प्रतिक्रियेने या चर्चांवर पूर्णविराम लावला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याचा समाचार घेताना इराणचे सुरक्षा प्रमुख मोहसेन रझाई यांनी अमेरिकेच्या धोरणांवर तीव्र टीका केली. ते म्हणाले, “अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या दररोज बदलणाऱ्या वक्तव्यांमुळे कुणीही दिशाभूल करून घेऊ नये. कधी ट्रम्प म्हणतात की इराणशी कोणतीही वाटाघाटी होणार नाही, तर दुसऱ्याच दिवशी ते म्हणतात की आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. यावरून अमेरिकेची अस्थिर मानसिकता दिसून येते. आंतरराष्ट्रीय तेल व्यापार आणि सागरी मार्गांमधील हितसंबंध आता मोठ्या प्रमाणावर बदलले आहेत. अमेरिकेने आधी जे नुकसान केले आहे, ते भरून काढल्याशिवाय आणि आमच्या मुख्य अटी मानल्याशिवाय वाटाघाटींच्या मेजावर बसणे शक्य नाही.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Saudi Pipeline Shutdown : 90 मिनिटांत खेळ खल्लास! सौदीने केली मुख्य तेल पाइपलाइन बंद; आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड 107 डॉलर पार
रझाई यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेत सांगितले की, नंतर होणारे नुकसान नियंत्रणात आणण्याच्या अमेरिका किंवा पाश्चात्य देशांच्या प्रयत्नांमुळे आता बिघडलेली परिस्थिती सुधारणार नाही. इराण आपल्या सार्वभौमत्वाशी आणि राष्ट्रीय सुरेशी कोणतीही तडजोड करणार नाही, हाच तेहरानचा अंतिम आणि अंतिम निर्णय असेल.
या सर्व राजकीय नाट्यामागे १८ जून रोजी झालेला एक महत्त्वपूर्ण करार कारणीभूत आहे. शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यपूर्वेतील संघर्ष कमी करण्यासाठी एका सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी झाली होती. या करारात लेबनॉनसह इतर प्रांतांमधील लष्करी तणाव कमी करणे आणि ६० दिवसांच्या आत दोन्ही देशांनी वाटाघाटी करून एका अंतिम करारावर पोहोचणे बंधनकारक करण्यात आले होते.
#Iran’s SNSC Secretary Mohsen Rezaei said on X that negotiations are off the table until Iran’s conditions are met, warning that changing US positions on talks and the strategic importance of oil and straits will not alter what lies ahead.#USWar pic.twitter.com/WCQW7KTpoD — IranPress (@IranPress_eng) September 15, 2026
credit – social media and Twitter
या ६० दिवसांच्या कराराची मुदत १७ ऑगस्ट रोजीच पूर्ण झाली आहे. मात्र, या कालावधीत ठोस तोडगा न निघाल्याने आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच ठेवल्यामुळे आता हा करार पूर्णपणे गुंडाळला गेल्याचे चित्र आहे. मुदत संपल्यानंतर प्रदेशातील लष्करी कारवायांमध्ये मोठी वाढ झाली असून, पुन्हा एकदा थेट युद्धाचा धोका निर्माण झाला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : AI Risks : ‘येत्या 5 वर्षांत एआय मानवांसाठी ठरेल अत्यंत घातक…’; गुगलच्या वरिष्ठ संशोधकाचा गंभीर इशारा देऊन राजीनामा
एकीकडे राजनैतिक पातळीवर शब्दांचे युद्ध सुरू असताना, दुसरीकडे प्रत्यक्षात लष्करी हल्ले तीव्र झाले आहेत. सोमवारी रात्री इराणच्या दक्षिण किनारपट्टीवर एक धक्कादायक घटना घडली, जिथे दोन इराणी मासेमारी बोटींना लक्ष्य करून थेट ड्रोन हल्ले करण्यात आले. हे हल्ले दक्षिणेकडील कारागान या महत्त्वाच्या बंदर शहराच्या किनारपट्टीजवळ आणि लारक बेटाजवळ झाले आहेत. या हल्ल्यांमागे अमेरिकन किंवा त्यांच्या मित्रराष्ट्रांचे ड्रोन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
होर्मोझगान प्रांताचे राजकीय आणि सुरक्षा व्यवहार उपराज्यपाल अहमद नफिसी यांनी या घटनेला अधिकृत दुजोरा दिला आहे. नफिसी यांनी सांगितले की, या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बोटींचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक स्थानिक मच्छीमार समुद्रात बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता मच्छीमारांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना वाचवण्यासाठी आपत्कालीन शोध आणि बचाव मोहीम (Search and Rescue Operation) राबवली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच हल्ल्याचे नेमके स्वरूप आणि हानीचा आकडा समोर येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे इराणच्या किनारपट्टी भागात प्रचंड तणाव आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.