US Plane Crash Fourth plane crash in 10 days in America; Major accident at Scottsdale Airport
वॉशिंग्टन: अमेरिकेतील विमान अपघातांचे सत्र सुरुच आहे. सोमवारी अमेरिकेतील अरिझोना येथे स्कॉट्सडेल विमानतळावर आणखी एक अपघात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्कॉट्सडेल विमानतळावर दोन खासगी जेट विमानांची धडक झाली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून चारजण जखमी झाले आहेचत फेडरल अडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार, एक खाजगी विमान धावपट्टीवरुन घसरले आणि दुसऱ्या विमानाला जाऊन आदळले. हा गेल्या 10 दिवसांतील चौथा अपघात आहे.
अपघातानंतर प्रशासनाने तात्काळ चौकशी सुरू केली असून, विमानतळावरील सर्व उड्डाणे काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना अमेरिकन वेळेनुसार दुपारी 2:45 च्या सुमारास घडली. यावेळी एक लीयजेट 35A विमान टेक्सासमधून येत होते. यावेळी स्कॉट्सडेलच्या विमानतळावर लॅंडिग करत असताना रनवेच्या बाहेर गेले आणि रॅम्पवर उभ्या असलेल्या गल्फस्ट्रीम 200 या बिझनेस डेटला धडकले.
अमेरिकेत 10 दिवसांत चौथा विमान अपघात
अलीकडच्या काही काळात अमेरिकेत अनेक विमान अपघात झाले आहे. यामध्ये 29 जानेवारीला वॉशिंग्टन DC मध्ये झालेल्या मोठ्या विमान अपघातात 67 जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय फिलोडेल्फियामध्येही विमान अपघात झाला होता. काही दिवसांपूर्वी अलास्कामध्ये देखील एक विमान अपघात झाला होता, यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला. हे विमान अलास्काच्या नोम शहराकडे जात असताना अचानक गायब झाले. शोध मोहिमेदरम्यान विमानाचा मलबा समुद्रातील बर्फावर सापडला. आज गेल्या 10 दिवसांत अमेरिकेत हा चौथा विमान अपघात आहे.
अलास्कातील विमान अपघातात 10 जणांचा मृत्यू
बेरिंग एअर या एअरलाइन्सचे सिंगल-इंजन टर्बोप्रॉप विमान अलास्काच्या उनालक्लीट शहरातून 9 प्रवाशांना घेऊन उड्डाण करत होते. मात्र, काही वेळातच या विमानाचा संपर्क तुटला. शोध मोहीम राबवल्यानंतर, समुद्रातील बर्फावर विमानाचा मलबा आढळला. बचाव पथकाने विमानाच्या अवशेषांची पाहणी केली असता, विमानातील सर्व 10 जण मृत असल्याचे स्पष्ट झाले.
मोटले क्रूच्या सोशल मीडिया पोस्टमुळे गोंधळ
आजच्या अपघातानंतर प्रसिद्ध रॉक बँड मोटले क्रू यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली. या पोस्टमध्ये मृत पायलटचा उल्लेख करण्यात आला होता, तसेच जखमींपैकी एक बँड सदस्य विन्स नील याची मैत्रीण आणि तिचा मित्र असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, काही वेळातच ही पोस्ट डिलीट करण्यात आली. त्यानंतर बँडने दुसरी पोस्ट केली पण यात कोणत्याही जखमींची ओळख उघड करण्यात आली नाही. या घटनांमुळे अमेरिकेतील विमान सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.