'Back To Plastic': शॉर्कला वाचवण्यासाठी जगभरामध्ये नो प्लॅस्टिकचा नारा; मात्र डोनाल्ड ट्रम्पचा यांचा वेगळाच तोरा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सध्या कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन जागतिक स्तरावर चर्चेचा विषय बनत आहेत. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या काही काळातच अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामुळे जागतिक स्तरावर वाद निर्माण झाला आहे. मग ते बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करणे असो किंवा परदेशी देशांवरी टॅरिफ असो नाहीतर जागतिक संघटनांनमधून माघर असो अशा अनेक निर्णयांनी ट्रम्प यांनी जगाला हादरुन टाकले आहे. आता पुन्हा एकदा अशाच एका निर्णयाने त्यांनी जगाला धक्का दिला आहे.
ट्रम्प यांनी प्लास्टिक स्ट्रॉवर लागू असलेले निर्बंध हटवले आहेत. त्यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करत म्हटले आहे की, अमेरिकन सरकारी संस्थांमध्ये पुन्हा प्लास्टिक स्ट्रॉ वापरण्यात येईल. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत “आता पेपर स्ट्रॉमुळे तुमच्या पेयाचा आनंद वाया जाणार नाही!” असे म्हटले आहे.
बायडेन प्रशासनाचा प्लास्टिकबंदीचा निर्णय उलटवला
माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी प्लास्टिक प्रदूषणाला संकट म्हणून संबोधले होते आणि 2035 पर्यंत सरकारी संस्थांमध्ये सिंगल-यूज प्लास्टिकवर पूर्णपण बंदी घालण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानुसार, प्लास्टिक स्ट्रॉ ऐवजी पेपर स्ट्रॉचा वापराचा आदेश बायडेन यांनी दिला होता. मात्र, ट्रम्प यांनी बायडेन यांचा हा निर्णय उलटवत म्हटले की, पेपर स्ट्रॉ जास्त वेळ टिकत नाही आणि ते वापरणे अवघड आहे.
यामुळे अमेरिकन सरकार आता प्लास्टिकच्या दिशेने पुन्हा वळणार आहे. ट्रम्प यांनी जारी केलेल्या कार्यकारी आदेशानुसार, सर्व संघीय एजन्सींनी पेपर स्ट्रॉ खरेदी करणे थांबवावे आणि सरकारी इमारतींमध्ये केवळ प्लास्टिक स्ट्रॉचाच वापर करण्यात यावा. हा आदेश तातडीने लागू करण्यात आला आहे.
पर्यावरण प्रेमींनी केली ट्रम्प यांच्या निर्णयावर टीका
ट्रम्प यांच्या या निर्णयावर पर्यावरण प्रेमींनी मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे. अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की प्लास्टिक स्ट्रॉ समुद्रातील प्रदूषण वाढवतात आणि जलीय जीवांसाठी मोठा धोका निर्माण करतात. अनेक अमेरिकन राज्ये आणि शहरे आधीच प्लास्टिक स्ट्रॉवर बंदी घालण्याच्या दिशेने पुढे जात आहेत.
ट्रम्प यांच्या निर्णयाचे राजकीय आणि सामाजिक परिणाम
ट्रम्प यांचा हा निर्णय पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, त्याचा मोठा राजकीय आणि सामाजिक परिणाम होणार आहे. एकीकडे उद्योगधंदे आणि व्यवसायिक या निर्णयाचे स्वागत करत आहेत, तर दुसरीकडे पर्यावरण कार्यकर्ते आणि बायडेन समर्थक या निर्णयाचा तीव्र विरोध करत आहेत. आता हा आदेश अमेरिकन जनतेला कितपत स्वीकारार्ह वाटतो आणि त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.