US President Donald Trump temporarily suspends financial aid to Pakistan
इस्लामाबाद: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतच अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यापैकी एक म्हणजे परदेशी देशांना मिळणारी मदत. त्यांच्या या निर्णयाने अनेक देश अडचणीत आले आहेत. खरंतरं अमेरिका गेल्या अनेक दशकांपासून सुमारे 180 देशांना मदत करत आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच जगभरातील देशांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे.
आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या या यादीत पाकिस्तानचे नाव सामील झाले आहे. एककीकडे पाकिस्तान आर्थिक संकटाशी झुंजत असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. ट्रम्प प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीवर तात्पुरती स्थगिती दिली आहे. यामुळे पाकिस्तानच्या अनेक उर्जा प्रकल्पांवर गंभीर परिणाम झाला आहे.
हे प्रकल्प झाले ठप्प
या निर्णयामुळे पाकिस्तानमधील युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (USAID) चे अनेक प्रकल्प ठप्प झाले आहे. यामध्ये सांस्कृतिक वारसा जतन आणि संरक्षणासाठी असलेला ॲम्बॅसडर्स फंड फॉर कल्चरल प्रिझर्वेशन (AFCP) हा प्रमुख प्रकल्पांना फटका बसला आहे. AFCP फंड ऐतिहासिक इमारती, पुरातत्त्वीय स्थळे, संग्रहालये आणि पारंपारिक सांस्कृतिक अभिव्यक्तींचे संरक्षण करण्यास मदत करतो.
पाकिस्तानला दिली जाणाऱ्या मदतीचे मूल्यमापन होणार
अमेरिकेच्या कराची येथील वाणिज्य दूतावासातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशानुसार, पाकिस्तानला दिली जाणारी परदेशी मदत पुन्हा मूल्यमापनासाठी थांबवण्यात आली आहे. या निर्णयामुळे ऊर्जा क्षेत्राशी संबंधित पाच प्रकल्पांवरही परिणाम झाला आहे. पॉवर सेक्टर इम्प्रूव्हमेंट ॲक्टिव्हिटी, पाकिस्तान प्रायव्हेट सेक्टर एनर्जी ॲक्टिव्हिटी, एनर्जी सेक्टर ॲडव्हायजरी सर्व्हिसेस प्रोजेक्ट, क्लीन एनर्जी लोन पोर्टफोलिओ गॅरंटी प्रोग्रॅम आणि पाकिस्तान क्लायमेट फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी.
आर्थिक वाढीशी संबंधित प्रकल्प ठप्प
आर्थिक वाढीशी संबंधित चार प्रकल्पांवरही परिणाम झाला आहे, यामध्ये सोशल प्रोटेक्शन ॲक्टिव्हिटी हा 2025 पर्यंत चालणारा एकमेव कार्यक्रम होता. ट्रम्प यांच्या या आदेशामुळे पाकिस्तानच्या आरोग्य, शेती, उपजीविका आणि अन्न सुरक्षा, पूर, हवामान आणि शिक्षणाशी संबंधित अनेक प्रकल्पांवरही परिणाम झाला आहे. लोकशाही, मानवी हक्क आणि प्रशासनाशी संबंधित निधीवरही ट्रम्प यांच्या आदेशाचा परिणाम झाला आहे.
या प्रक्लपांपैकी काही प्रकल्प कायमचे बंद होतील किंवा किमान लक्षणीय प्रमाणात कमी केले जातील अशी भिती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेने सध्या पाकिस्तानला किती वार्षिक मदत दिली आहे हे स्पष्ट नाही.तसेच पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अद्याप या विकासाची आणि मदत थांबवण्याच्या निर्णयाच्या परिणामांची पुष्टी केलेली नाही. सध्या पाकिस्तान आर्थिक संकटात असून देशाकडे फक्त 16 अब्ज डॉलर शिल्लक आहेत.