US President flies in world's most high-tech aircraft known as Flying White House
वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा काही तासांतच पार पडेल. सध्या त्यांच्या शपथविधीची चर्चा जगभर सुरु आहे. जगभरातील अनेक दिग्गज व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. हा 2025च्या सुरुवातीचा अमेरिकेतील सर्वात मोठा सोहळा असणार आहे. पण तुम्हाला माहित आहे का अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प विशेष विमानाने प्रवास करतील. जगातील सर्वात अत्याधुनिक ‘एअरफोर्स वन’ हे विमान राष्ट्राध्यक्षांच्या प्रवासासाठी वापरे जाते. ‘एअरफोर्स वन’ हे सर्वात सुरक्षित विमान मानले जाते. ‘फ्लाइंग व्हाइट हाऊस’ किंवा ‘फ्लाइंग कॅसल’ म्हणून ओळखले जाणारे हे विमान त्याच्या विशेष वैशिष्ट्यांमुळे जगभर प्रसिद्ध आहे. डोनाल्ड ट्रम्प 2025 मध्ये अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर, त्यांच्या प्रवासासाठी या विमानाचा वापर होईल.
विमानाची खास वैशिष्ट्ये
हे ‘एअरफोर्स वन’ विमान अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या विमानामध्ये राष्ट्रध्यक्षांसाठी स्वतंत्र्य कार्यालय, कॉन्फरन्स रुम, बेडरुम आणि स्वयंपाकघर उपलब्ध आहे. हे विमानातील स्वयंपाकघर एकावेळी 100 जणांचे जेवण तयार करू शकते. विमानामध्ये स्थायी डॉक्टरसह वैद्यकीय सुविधा आहेत. यामध्ये ऑपरेटिंग रूमचाही समावेश आहे.
यामुळे विमान कोणत्याही आणीबाणीच्या स्थितीत काम करू शकते. सुरक्षेच्या दृष्टीने, ‘एअरफोर्स वन’ अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूटने सुसज्ज असून संभाव्य धोक्यांचा वेळीच शोध घेऊ शकते. विमानामध्ये उपग्रह फोन, फॅक्स मशीनसारख्या संवाद साधनांचा समावेश आहे. यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना जगातील कोणत्याही कोपऱ्यातून सुरक्षित संवाद साधणे शक्य होते. तसेच, हे विमान हवेत इंधन भरण्यास सक्षम आहे, यामुळे याची कार्यक्षमता उत्तम आहे.
इतिहास आणि विकास
एअरफोर्स वनचा इतिहास दुसऱ्या महायुद्धाच्या काळापासून सुरू झाला. प्रथम 1944 मध्ये VC-54 विमानला ‘सेक्रेड काऊ’ असे नाव देण्यात आले होते. हे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रूझवेल्ट यांच्यासाठी वापरण्यात आले. त्यानंतर अनेक राष्ट्राध्यक्षांनी विविध मॉडेल्स वापरली. 1962 मध्ये VC-137C हे आधुनिक विमान राष्ट्राध्यक्षांसाठी समर्पित करण्यात आले. या विमानाने अनेक ऐतिहासिक घटनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सध्या राष्ट्राध्यक्ष प्रवासासाठी VC-25A मॉडेल वापरले जाते. हे बोइंग 747-200B विमान आहे. याला ‘28000’ आणि ‘29000’ असे टेल नंबर देण्यात आले आहेत.
हे विमान राष्ट्राध्यक्षांना मोबाइल कमांड सेंटरसारखी सुविधा देते. याच्या तीन स्तरांवर 4,000 चौरस फूट जागा आणि कार्यालयीन सुविधा, विश्रांतीची जागा आणि वैयक्तिक सूट उपलब्ध आहे. एअरफोर्स वन केवळ विमान नसन राष्ट्राध्यक्षांच्या ओळखीचे प्रतीक आहे. अमेरिकन ध्वज आणि राष्ट्राध्यक्षांच्या मोहऱ्यासह हे विमान उड्डाण करत असल्याने याला जागतिक ओळख आहे. याचा समावेश अमेरिकन सांस्कृतिक इतिहासात एक महत्त्वाचा भाग म्हणून केला जातो.