US tax attack on India 50% tariff will now cause serious damage to these sectors
US 50% tariff on Indian goods : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कर प्रहार केला आहे. भारतावरील अतिरिक्त २५% शुल्काची मुदत संपल्यानंतर आता एकूण ५०% कर आकारणी करण्यात आली आहे. हा निर्णय केवळ व्यापारापुरता मर्यादित नसून, तो भारतातील लाखो कामगारांच्या भवितव्याशी जोडलेला आहे. कारण या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारताच्या कापड, दागिने, फर्निचर, स्टील-अॅल्युमिनियम अशा महत्त्वाच्या निर्यात क्षेत्रांना बसणार आहे.
आतापर्यंत भारतीय वस्त्रांवर अमेरिकेत फक्त ९% कर आकारला जात होता. पण नवीन नियम लागू झाल्यानंतर हा कर ५९% पर्यंत झेपावला आहे. तयार कपड्यांवरील कर १३.९% वरून तब्बल ६३.९% वर गेला आहे. म्हणजेच, भारतात तयार होणाऱ्या कपड्यांची किंमत अमेरिकन बाजारपेठेत दुप्पटीने महाग होणार आहे. यामुळे व्हिएतनाम, बांगलादेश, कंबोडिया, पाकिस्तान आणि चीनसारखे स्पर्धक देश भारताच्या जागी अमेरिकन बाजारपेठेत स्थान मिळवतील, असा तज्ञांचा अंदाज आहे.
हे देखील वाचा : Garh Ganesh Temple Jaipur : जयपूरच्या ‘या’ मंदिरात पत्र लिहून मागितली जाती इच्छा, जाणून घ्या जगावेगळ्या प्रथेमागचं रहस्य
भारतातील कापड उद्योग हा पूर्णपणे कामगार-आधारित आहे. या क्षेत्रात सुमारे ४.५ कोटी लोक काम करतात. ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयामुळे यापैकी ५ ते ७% कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. तिरुपूर (तामिळनाडू), सुरत (गुजरात), लुधियाना (पंजाब) आणि मुंबई, ठाणे, नवी मुंबई (महाराष्ट्र) ही भारतातील प्रमुख कापड केंद्रे या निर्णयामुळे सर्वाधिक प्रभावित होणार आहेत.
“आम्ही दरवर्षी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात कापड निर्यात करतो. पण ५०% कर वाढीनंतर ती स्पर्धा करणे अशक्य आहे. कारखाने बंद होण्याचा धोका आहे,” असे तिरुपूरमधील एका उद्योजकाने सांगितले.
रत्ने, दागिने आणि कोळंबी (श्रिंप्स) हे भारताचे महत्त्वाचे निर्यात उत्पादने आहेत. आधीच कमी नफा असलेल्या या क्षेत्रांवर कर वाढीचा थेट परिणाम होणार आहे. भारताचा हिरे आणि सोन्याच्या दागिन्यांचा मोठा निर्यात बाजार अमेरिकेत आहे. पण कर वाढीनंतर ग्राहकांना हे उत्पादने अधिक महाग पडणार असल्याने मागणी कमी होण्याची शक्यता आहे.
पूर्वी भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या स्टील, ॲल्युमिनियम आणि तांब्यावर फक्त १.७% शुल्क होते. आता ते ५१.७% पर्यंत वाढवण्यात आले आहे. या क्षेत्रात तब्बल ५५ लाख लोक रोजगार करतात. जरी सर्वांना थेट फटका बसणार नसला तरी, अनेक कारखाने आणि लहान व्यापारी संकटात सापडतील, अशी शक्यता आहे.
हे देखील वाचा : श्री गणेश मंदिर, मॉरिशस : परदेशातही दरवळणारी भारतीय संस्कृतीची सुवासिक ज्योत
फर्निचर, गाद्या, बेडिंगसारख्या उत्पादनांवरही आता ५२.३% पर्यंत कर वाढला आहे. या क्षेत्राशी जवळपास ४८ लाख लोक जोडलेले आहेत. आधीच कमी मागणी असलेल्या या क्षेत्राला कर वाढीनंतर अमेरिकन बाजारातून जवळपास बाहेर पडावे लागेल, अशी चिंता व्यापाऱ्यांमध्ये आहे.
ट्रम्प प्रशासनाने भारत आणि ब्राझीलवर सर्वाधिक कर लादले आहेत. पण व्हिएतनाम, बांगलादेश, कंबोडिया, पाकिस्तान आणि अगदी चीनसारख्या देशांवर तुलनेने कमी शुल्क लावण्यात आले आहे. त्यामुळे हे देश अमेरिकेत भारतीय उत्पादनांची जागा पटकावू शकतात. भारतावरील ५०% कर वाढ ही केवळ व्यापारावरची वाढीव जबाबदारी नाही, तर लाखो कामगारांच्या उदरनिर्वाहावरचा थेट प्रहार आहे. अमेरिकन बाजारपेठेत भारताची स्पर्धात्मकता कमी होईल आणि परिणामी उत्पादन क्षेत्रातील नोकऱ्या गमावल्या जातील. जागतिक स्तरावर भारताला या संकटातून बाहेर पडण्यासाठी नवीन बाजारपेठांचा शोध घ्यावा लागेल आणि उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील.