
लष्कर-ए-तोयबाच्या पीओके शाखेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आमिर झिया यांनी भारताचा खुली धमकी दिली आहे., “आपला गो-पूजक शेजारी आज आपल्याला धमकावत आहे. ते इतके धाडसी झाले आहेत की ते पाकव्याप्त कश्मीर जिंकण्याची भाषा करत आहेत. पण आम्हीही या आमच्या लढाईपासून मागे हटणार नाही. आम्ही काश्मीर मुक्त करू आणि संपूर्ण भारतात विनाश घडवून आणू.” असं आमिर झियाने म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, गजवा-ए-हिंदसाठी सर्व दहशतवादी संघटनांना आता भारताविरुद्ध एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहनही केलं आहे.
अमीर झिया याने बांगलादेशात त्यांच्या दहशतवादी संघटनेच्या विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार करण्याचेही आवाहन केलं आहे. झिया याने अलीकडेच बांगलादेशात मारल्या गेलेल्या उस्मान हादीचे गौरव केले. बांगलादेशातील त्याच्या सहकाऱ्यांना रोखण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असे आमिर झियाने म्हटले आहे.
पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबाचा बहावलपूर प्रमुख सैफुल्लाह सैफ याचा एक खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सैफुल्लाह अमीर झिया याच्या उपस्थितीत भारताला धमकावताना दिसत आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या या व्हिडिओमध्ये त्याने ‘गजवा-ए-हिंद’बाबत भाष्य केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर भारतीय नेत्यांविरोधात प्रक्षोभक विधाने केली आहेत.
भारत सरकारने मे २०२५ मध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील पंजाब आणि पीओके (PoK) भागातील दहशतवादी तळांवर मोठी कारवाई केली होती. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या अनेक इमारती आणि तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. मात्र, या कारवाईच्या सात महिन्यांनंतर आता हे दहशतवादी गट पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती समोर येत आहे.
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, लश्कर आणि जैश या दोन्ही संघटनांनी आपल्या ऑपरेशनल कारवाया वाढवल्या असून पुन्हा एकदा दहशतवाद्यांची भरती सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला आहे.