
Get the fastest Marathi news live updates, breaking news, and latest stories from Maharashtra, India
09 Jul 2026 09:30 AM (IST)
Vaibhav Suryavanshi vs Jofra Archer: आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर सध्या भारताचा अवघ्या १५ वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि इंग्लंडचा भेदक वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांच्यातील थरारक लढत क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेत आहे. आयपीएलमध्ये एकाच संघाकडून खेळणारे हे दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर आमनेसामने आले असून एकमेकांना जोरदार आव्हान देत आहेत. वैभवने सलग दुसऱ्या सामन्यात आर्चरच्या गोलंदाजीवर षटकार ठोकून सर्वांना चकित केले, तर अनुभवी आर्चरने ताशी १४५ किलोमीटर वेगाने शॉर्ट बॉल टाकत वैभवला बाद करून आपला हिशोब चुकता केला आहे.
वैभवची ही आक्रमक खेळी पाहून वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर देखील चांगलाच प्रभावित झाला आहे. मात्र, मालिकेत बरोबरी साधण्यासाठी आणि युवा फलंदाजाला रोखण्यासाठी आता आर्चरने आगामी चौथ्या सामन्यापूर्वी वैभवला थेट ओपन चॅलेंज दिले आहे. त्यामुळे या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात या दोन्ही खेळाडूंमधील 'ऑन-फिल्ड' लढत पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
09 Jul 2026 09:25 AM (IST)
Maharashtra Monsoon Update जून महिन्यात दडी मारून बसलेल्या मॉन्सूनने जुलैच्या सुरुवातीलाच राज्यात जोरदार बॅटिंग केली आहे. १ जुलैपासून सुरू झालेल्या धुव्वाधार पावसामुळे अवघ्या ६ दिवसांतच पूर्ण जून महिन्याची सरासरी भरून निघेल इतका पाऊस कोसळला आहे. सततच्या संततधारेमुळे अनेक भागांत पाणी साचले असून काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक भागांत गेले ५ दिवस पाण्याचा वेढा कायम आहे. मात्र, गेल्या काही दिवसांच्या हाहाकारानंतर आज राज्याच्या काही भागांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे.
पुणे आणि सातारा: पुण्यात काल काही भागांत पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरात अत्यंत सावधानतेचा इशारा दिला असून, या भागात 'अतिमुसळधार' पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
09 Jul 2026 09:15 AM (IST)
Marathwada Earthquake: महाराष्ट्रातील हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले भूकंपाचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. काल मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान या भागाला भूकंपाच्या लागोपाठ ३ ते ४ तीव्र धक्क्यांनी हादरवून सोडले.२ जुलै रोजी आलेल्या धक्क्यानंतर अवघ्या आठवड्याभरातच पुन्हा हा मोठा भूकंप आल्याने संपूर्ण मराठवाड्यात भीतीचे प्रचंड वातावरण आहे.नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) आणि स्थानिक भूकंपमापक केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीनंतर एकापाठोपाठ एक असे चार धक्के नोंदवले गेले. यामध्ये हिंगोली शहर, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ या तालुक्यांसह शेजारील परभणी आणि नांदेड जिल्ह्यांतही हे हादरे स्पष्टपणे जाणवले.
पहिला मुख्य धक्का (पहाटे १:३७ वाजता): या धक्क्याची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल इतकी मोठी होती. याचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे गावाच्या दक्षिणेकडे जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर होता.
दुसरा धक्का (पहाटे २:१५ वाजता): अवघ्या काही मिनिटांतच ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा धक्का बसला.
तिसरा धक्का (पहाटे २:१७ वाजता): लगेचच ३.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा तिसरा झटका जाणवला. या दोन्ही धक्क्यांचे केंद्र पांग्रा शिंदे गावाच्या पश्चिम-उत्तरेकडील काकडधाबा गावात होते.
चौथा धक्का (पहाटे ३:२३ वाजता): पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.
09 Jul 2026 09:05 AM (IST)
FDA Suspended Rustom Ice Cream License: दक्षिण मुंबईतील चर्चगेट परिसरातील आईस्क्रीमप्रेमींचे अत्यंत लाडके आणि ऐतिहासिक ठिकाण असलेले प्रसिद्ध 'रुस्तम आईस्क्रीम' (Rustom Ice Cream) सध्या मोठ्या वादात सापडले आहे. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) या नामांकित आईस्क्रीम पार्लरचा परवाना तातडीने निलंबित करून दुकान बंद करण्याचे कडक आदेश दिले आहेत. एफडीएच्या या धडक कारवाईमुळे मुंबईतील खाद्यप्रेमींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट निर्देशानुसार सध्या संपूर्ण राज्यात 'सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र' ही विशेष मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत रुस्तम आईस्क्रीम पार्लरवर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने अचानक धाड टाकली होती.
09 Jul 2026 09:00 AM (IST)
Maharashtra IAS Officer Transfer : राज्याचे महत्त्वाचे अधिवेशन सुरू असतानाच, राज्य शासनाने प्रशासकीय पातळीवर अत्यंत मोठे फेरबदल केले आहेत. प्रशासकीय यंत्रणेला गती देण्यासाठी आणि विविध विभागांमध्ये नवचैतन्य आणण्यासाठी शासनाने बुधवारी (८ जुलै) रात्री आठ वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. अचानक झालेल्या या बदल्यांमुळे मंत्रालयातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या फेरबदलांमध्ये काही महत्त्वाच्या आणि महत्त्वपूर्ण विभागांचा समावेश आहे. वरिष्ठ आयएएस अधिकारी रुचेश जैवंशी यांची 'महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळा'च्या व्यवस्थापकीय संचालकपदी (MD) नियुक्ती करण्यात आली आहे. मागासवर्गीय समाजाच्या कल्याणकारी योजनांना गती देण्याची महत्त्वाची जबाबदारी आता त्यांच्यावर असणार आहे.
09 Jul 2026 08:45 AM (IST)
पुणे: मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा थेट परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)च्या उत्पन्नावर झाला आहे. शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार या चार दिवसांत पुणे एसटी विभागाच्या उत्पन्नात ३० ते ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. पुणे एसटी विभागाला दररोज साधारणतः २ कोटी १० ते २० लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र, मागील चार दिवसांपासून हे उत्पन्न घटून १ कोटी ५० लाखांवर आले आहे. म्हणजेच, दररोज ६० ते ७० लाखांनी पुणे एसटी विभागाचे उत्पन्न कमी झाले आहे.
09 Jul 2026 08:44 AM (IST)
यवतमाळ: यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शवागारातून धक्कादायक निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह शवागारातील फ्रीजरमध्ये ठेवण्यात आला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी शवविच्छेदनासाठी मृतदेह बाहेर काढला असता तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळला. या प्रकारामुळे मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारत तीव्र संताप व्यक्त केला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Parliament Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार टाकणार मोठा डाव?
New Delhi : संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकार दोन महत्त्वाचे अजेंडे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. यातील पहिला अजेंडा ‘महिला आरक्षण विधेयक’ मंजूर करणे, तर दुसरा परिसीमन प्रक्रिया लागू करणारा कायदा संमत करणे आहे. हा कायदा मंजूर झाल्यास देशातील लोकसभेच्या जागांची संख्या वाढून ८०० पेक्षा जास्त होईल. यासाठी सरकार ‘इंडिया’ आघाडीत फूट पाडण्याचीही तयारी करत असल्याचे समजते.
समाजवादी पक्ष आणि इतर काही पक्षांना महिला आरक्षण विधेयकाबाबत आक्षेप नाही. मात्र, त्यांचे म्हणणे आहे की, संसदेत महिलांच्या जागा वाढवण्याबाबत चर्चा केली जाते, तेव्हा त्या जागांवर आरक्षणाची नेमकी काय स्थिती असेल हेदेखील स्पष्ट करावे. सध्या लोकसभेच्या जागांमध्ये एससी आणि एसटींसाठी आरक्षणाची तरतूद आहे. समाजवादी पक्ष आणि इतर पक्षांची मागणी आहे की, महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या ३३ टक्के जागांमध्येही अंतर्गत आरक्षणाची तरतूद करण्यात यावी.