Which country is buying Russian fighter jet Sukhoi Su 57
मॉस्को: रशियाचे पाचव्या पिढीच्या अत्याधुनिक लढाऊ विमान सुखोई SU-57 ला पहिला परदेशी ग्राहक मिळाला आहे. या विमानाच्या निर्यातीच्या पार्ट्सचे Su-57E चे उत्पादन सुरू करण्यात आले असून, 2025 च्या अखेरपर्यंत ग्राहक देशाला डिलिव्हरी दिली जाईल, अशी माहिती रोसोबोरोनएक्सपोर्ट या रशियाच्या सरकारी कंपनीने दिली आहे. या कंपनीकडे रशियाच्या सैन्य-औद्योगिक उपकरणांच्या निर्यातीची देखील जबाबदारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच Su-57 ने एरो इंडिया 2025 मध्ये भारतात अमेरिकन F-35 समोर शक्तिप्रदर्शन केले होते.
डिलिव्हरी लवकरच सुरू होणार
रशियाने 10 फेब्रुवारी 2025ला या विक्रीची घोषणा केली. या विक्रीला आंतरराष्ट्रीय बाजारात सुखोई Su-57 च्या विस्तारासाठी महत्त्वाचा टप्पा मानले जात आहे. रोसोबोरोनएक्सपोर्टचे प्रमुख अलेक्झांडर मिखेव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षीच्या अखेरीस लढाऊ विमानाची पहिली डिलिव्हरी करण्यात येईल. यामुळे या व्यवहाराने रशियाच्या संरक्षण क्षेत्रासाठी मोठ्या रणनीतिक आणि धोरणात्मक महत्त्व प्राप्त झाले आहे.
Su-57 ची क्षमता
2024 च्या नोव्हेंबर महिन्यात Su-57E च्या पहिल्या निर्यात करारावर स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती समोर आली होती. याशिवाय, त्याच महिन्यात चीनमधील झुहाई एअरशोमध्ये या विमानाने जागतिक बाजारात पदार्पण केले आणि आपली अत्याधुनिक स्टील्थ क्षमता, बहुपयोगी कार्यक्षमता, व उन्नत एविओनिक्स दाखवून दिले.
अल्जीरिया खरेदी करणार Su-57?
रोसोबोरोनेक्सपोर्टने या विमानाचा पहिला ग्राहकाचे नाव सध्या गोपनीय ठेवले आहे. कारण अनेकदा रशियाकडून लष्करी उपकरणे खरेदी करणाऱ्या देशांवर राजकीय, राजनैतिक आणि आर्थिक दबाव आणला जातो. मात्र, संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते अल्जेरिया हा सर्वात संभाव्य ग्राहक मानला जात आहे. कारण अल्जेरियाचे रशियाशी दीर्घकाळचे लष्करी संबंध आहेत. तसेच अल्जेरियाने यापूर्वी रशियाकडून Su-30, MiG-29 आणि S-400 यांसारख्या आधुनिक लढाऊ उपकरणांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे.
यामुळे Su-57 चा पहिला निर्यात सौदा अल्जेरियासोबत झाल्याची शक्यता अधिक आहे. अल्जेरियाने 2019-2020 च्या काळात Su-57 ची खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. काही अहवालांनुसार, 14 युनिट्ससाठी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असल्याचं म्हटलं जातं, परंतु रशिया किंवा अल्जीरियाने याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. अल्जीरियाचं सैन्य उत्तर आफ्रिकेमध्ये आपली रणनीतिक ताकद वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करतं, त्यामुळे त्यांच्यासाठी Su-57 हा योग्य पर्याय ठरतो.