डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांचा धडाका सुरूच! आता नवीन नाण्यांचं उत्पादन केलं बंद, काय आहे कारण? (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
वॉशिंग्टन:अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुनरागमन झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठमोठ्या निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यांच्या अनेक निर्णयांनी जागतिक स्तरावर खळबळ उडवून दिली आहे. यातच आता त्यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेत आता एक सेंट किंमतीची नवीन चलनी नाणी तयार करण्यात येऊ नयेत असे आदेश त्यांनी ट्रेजरी विभागाला दिला आहे. सरकारी खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी की, ‘पेनी’ कॉईन्स म्हणजे एक सेंट किंमतीची नाणी बनवण्यासाठी येणारा खर्च हा दोन सेंट्सपेक्षा अधिक असल्याचे म्हटले. हा खर्च अगदीच अनावश्यक आहे. यामुळे सरकारचे मोठे नुकसान होत आहे. म्हणून आता नवीन पेनी कॉईन्स बनवणे थांबवण्यात येणार असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. एवढेच नव्हे, तर सरकारी खर्च कमी करण्यासाठी ट्रम्प फेडरल कर्मचाऱ्यांची संख्या देखील कमी करण्याचा विचार ट्रम्प करत आहेत. सरकारच्या अर्थसंकल्पातील एक पैसाही अनावश्यक गोष्टींवर खर्च होऊ नये, असे त्यांचे मत आहे.
कशामुळे वाढत आहे खर्च?
अमेरिकेतील पेनी कॉईन्स हे पूर्वीच्या काळी पूर्णपणे तांब्यापासून बनवले जात. मात्र 1943 साली, दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकी सरकारला शस्त्र बनवण्यासाठी तांब्याची गरज भासू लागली. त्यावर्षी ही नाणी स्टील आणि झिंक या धातूपासून बनवली जात होती. आज या नाण्यांमध्ये 97.5 टक्के झिंक धातू असतो, तर त्यावर तांब्याची कोटिंग केलेली असते. आधीच्या तुलनेत आता या नाण्यांचा आकारही अगदी लहान करण्यात आला आहे.
सध्या या नाण्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या धातूची किंमत ही या नाण्यांच्या चलनी किंमतीपेक्षा जास्त आहे. यामुळे कित्येक लोक बेकायदेशीररित्या ही नाणी वितळवून देशाबाहेर याची तस्करी करतात. म्हणूनच अमेरिकेला दरवर्षी अब्जावधी नाण्यांचे उत्पादन घ्यावे लागते. इंग्रजी वृत्तपत्राच्या 2024च्या आकडेवारीनुसार, सध्या अमेरिकेत सुमारे 240 अब्ज नाणी चलनात आहेत.
पर्यावरणावा धोका
2024 सालच्या यूएस मिंट रिपोर्टनुसार, एक नाणं बनवण्यासाठीची किंमत ही 3.69 सेंट्सपेक्षा जास्त आहे. ही आजची गोष्ट नाही, तर गेल्या 19 वर्षांपासून नाणी बनवणं हे खर्चिक काम झालं आहे. तसेच नाणी बनवण्यासाठी लागणाऱ्या धातूसाठी होणारे उत्खनन, त्यामुळे होणारे प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन पाहता नाणी बनवणं हे पर्यावरणासाठीही घातक असल्याचे कित्येक तज्ज्ञानी म्हटले आहे.
डिजिटल अमेरिका
ट्रम्प यांच्या या निर्णयाचा काय परिणाम होईल याबाबत तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरु आहे. काहींच्या मते हा निर्णय केवळ खर्च वाचवण्यासाठीच नाही, तर डिजिटल करन्सीला चालना देण्यासाठीही घेण्यात आला आहे. अर्थात, कॅशमध्ये व्यवहार करणाऱ्या लोकांना यामुळे अडचण निर्माण होईल असे म्हटले जात आहे. नॅशनल असोसिएशन ऑफ कन्व्हिनियन्स स्टोर्सच्या मते, पेनी कॉईन्स जर बंद झाले तर काऊंटरवर व्यवहारासाठी लागणारा बराच वेळ कमी होऊ शकतो.
दुसरीकडे, काही तज्ज्ञांच्या मते पेनी कॉईन्सचे उत्पादन बंद केल्यामुळे निकेल (5 सेंट्स) या नाण्याचे उत्पादन वाढवण्याची गरज भासू शकते. एका निकेलची चलनी किंमत ही 5 सेंट्स आहे. मात्र त्याला बनवण्यासाठी येणारा खर्च हा 13.8 सेंट्स आहे. यामुळे निकेलचं उत्पादन वाढलं तर, खर्चही वाढणार आहे. म्हणजेच खर्च वाचवण्यासाठी पेनी बंद करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनावर उलटू शकतो, असंही तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे आता पेनी बंद केल्यानंतर पुढे ट्रम्प काय करतात हे महत्त्वाचं ठरणार आहे.