Why Indians are fascinated by America know the reason
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हातात घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षऱ्या केल्या. यानंतर आता ट्रम्प प्रशासन त्यांच्या आदेशांवर अमंलबजावणी करत असून लाखो बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून हद्दपार करण्यास सुरुवातच केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकप्रचारांदरम्यान अमेरिकेच्या जनतेला आश्वासन दिले होते की, ते सत्तेत आल्यानंतर बेकायदेशीर स्थलांतर संपवून टाकतील. यावर कारवाई सुरु झाली आहे.
मात्र, याचा सर्वात मोठा फटका भारतीयांना बसला आहेत. पण भारतीयांना अमेरिकेत का स्थायिक व्हायचे असते याबद्दल तुम्हाला माहित आहे? यासंबंधित एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून यामागचे धक्कादायक कारणंही समोर आले आहे. अमेरिकेत स्थायिक होणे हे अनेक भारतीयांचे स्वप्न आहे मात्र, आता हे स्वप्न साकार होणे अत्यंत अवघड आहे. बेकायदेशीरपणे इतर देशात स्थलांतर करणे हे जोखमीचे आणि अडणीचे आहे. कायदेशीररित्या स्थलांतरित होण्यासाठी वेळ आणि संसाधने लागतात. मात्र अलीकडच्या काही वर्षात अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतर वाढले असून सर्वाधिक लोक भारतीय आहेत.
स्थलांतर होण्यामागची कारणे
भारतीय लोक अमेरिकेत का स्थायिक होण्याचा प्रयत्न करतात, याची अनेक कारणे आहेत. अमेरिकेला “लॅंड ऑफ अपॉर्च्युनिटीज” म्हटले जाते यामुळे भारतीयांसाठी हे आकर्षणाचे केंद्र आहे. आर्थिकच नव्हे, तर चांगल्या शिक्षण, आरोग्य सेवा आणि सुरक्षित जीवनासाठीही भारतीय अमेरिकेत स्थायिक होण्याचा प्रयत्न करतात. अमेरिकेत भारतीय-अमेरिकन समुदाय उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर आहे. त्यांना सन्मान आणि सामाजिक स्थैर्यही मिळते. मात्र, ही स्वप्न साकार करणे प्रत्येकासाठी सोपे नाही.
अहवालानुसार, भारतात बेरोजगारी आणि मर्यादित आर्थिक संधीमुळे अनेक तरुण अमेरिकेकडे आकर्षित होतात. भारतातील ग्रॅज्युएट्स आणि पोस्टग्रॅज्युएट्समध्ये बेरोजगारीचा दर 12% पेक्षा अधिक असून, अमेरिकेत भारतीयांची सरासरी वार्षिक कमाई 60,000-65,000 डॉलर म्हणजे भारतीय रुपयांमध्ये 51-56 लाख रुपये इतकी असते, तर भारतीय-अमेरिकन कुटुंबांची सरासरी वार्षिक कमाई 1.45 लाख डॉलर म्हणजे 1.25 कोटी रुपये आहे.
बेकायदेशीर स्थलांतर
अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी नागरिक डंकी रूटचा अवलंब करतात. ही संख्या अत्यंत मोठी असून हा मार्ग खूप धोकादायक आहे. या डंकी रुटचा वापर करुन तस्करी आणि एजंट्सच्या सहाय्याने भारतातून मेक्सिको किंवा कॅनडाच्या मार्गाने अमेरिकेत प्रवेश केला जातो. यूएस कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शनच्या (USCBP)आकडेवारीनुसार, 2023-24 मध्ये 90,415 भारतीयांना अवैध प्रवेश करताना पकडण्यात आले होते. कोविड-19 नंतर या संख्येमध्ये मोठ्या झपाट्याने वाढ झाली आहे.
मात्र, अमेरिकेत स्थायिक होण्याची प्रक्रिया कठीण आणि वेळखाऊ आहे. अवैध मार्गांनी जाणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, तर कायदेशीर प्रक्रियेसाठी भरपूर वेळ, पैसा आणि प्रयत्नांची गरज असते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात अवैध स्थलांतरावर कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याचा प्रभाव भारतीय समुदायावर मोठ्या प्रमाणात झाला आहे.
भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु
सध्या परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले आहे. एकूण 18 हजार भारतीयांना परत आणण्यात येणार असून या लोकांकडे अमेरिकेचे नागरिकत्वही नाही आणि त्यासाठी लागणारी योग्य कागदेपत्रे देखील उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली आहे.
अमेरिकन ड्रीमची जादू अजूनही कायम आहे. परंतु सगळ्यांनाच हे स्वप्न साकारता येणे शक्य नाही. यशस्वी जीवन मिळते असे नाही. प्यू रिसर्चच्या अहवालानुसार, 23 लाख अशियाई अमेरिकन गरिबीत जीवन जगत आहेत. तरीही भारतीय-अमेरिकन समुदायाची परिस्थिती तुलनेने चांगली असल्याचे अहवालात सांगितण्यात आले आहे. उच्च उत्पन्न, सुरक्षितता आणि प्रगतीची संधी यामुळे भारतीयांचे अमेरिकेकडे आकर्षण आजही कायम आहे.