दुशानबे: अलीकडच्या काळात जादू-टोणा, तंत्र-मंत्र करणाऱ्या लोकांची संख्या वाढत असून असे लोक लोकांच्या अंधश्रद्धांचा गैरफायदा घेतात आणि त्यांना फसवतात. मध्य आशियातील ताजिकिस्तानमध्ये अशा प्रकारच्या जादूटोणा, भविष्यवाणी आणि पारंपरिक तंत्र-मंत्र करुन उपचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. या प्रथांना बेकायदेशीर ठरवून सरकारने याला देशाच्या परंपरा आणि इस्लामिक मूल्यांच्या विरोधात म्हटले आहे.
इतक्या लोकांवर कारवाई
ताजिकिस्तानचे अध्यक्ष इमोमाली रखमोन यांनी स्पष्टपणे जाहीर केले की अशा प्रथांमुळे फसवणूक, अयोग्य धार्मिक शिक्षण, आणि अंधश्रद्धांना चालना मिळते. मिळालेल्या माहितीनुसार, ताजिकिस्तानच्या सरकराने आत्तापर्यंत 1500 हून अधिक जादूटोणा करणाऱ्या लोकांना अटक केली आहे. याशिवाय,5000 पेक्षा अधिक प्रार्थना आणि मंत्राच्या आधारे उपचार करण्याचा दावा करणारे मुल्ला किंवा मौलवी देखील कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत.
शिक्षेची तरतूद
या प्रकरणांत दोषी आढळलेल्या व्यक्तींना दोन वर्षांचा तुरुंगवास आणि 13,300 डॉलर दंड आकारण्यात येऊ शकतो असे सरकारने म्हटले आहे. हा दंड एका सामान्य ताजिक नागरिकाच्या सहा वर्षांच्या पगाराएवढा आहे.
भितीने लपून कार्य सुरु
सरकारी कारवाईनंतर तंत्र-मंत्र, जादूटोणा लोक करणारे आता गुप्तपणे आपले काम करत असल्याची माहिती ताजिकिस्तानच्या सरकरला मिळाली असून त्यांचा शोध सुरु आहे. ताजिकिस्तानचे अध्यक्ष इमोमाली रखमोन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकांनी घरात ग्राहकांना बोलावणे थांबवले असून, काही जण स्वतः ग्राहकांच्या घरी जात आहेत. अध्यक्षांनी सांगितले की, एका ज्योतिषी महिलेने मान्य केले असून, ती आता लोकांनी घरी बोलावत नाही. त्याऐवजी त्यांच्याकडे जाते असे म्हटले आहे. हे सरकारच्या दबावामुळे लोकांनी आपली कार्यपद्धती बदलली आहे, पण ही प्रथ पूर्णतः संपुष्टात आलेली नाही.
सामाजिक असमानता आणि उत्तम आरोग्य सेवांचा अभाव
ताजिकिस्तानातील तंत्र-मंत्र आकर्षण अंधश्रद्धेपुरते मर्यादित नाही. हे आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीशी जोडलेले आहे. पारंपरिक वैद्यकीय उपचार महाग असल्यामुळे गरीब लोक स्वस्त उपायांसाठी ज्योतिषांकडे वळतात. एका महिला नागरिकेने म्हटले की, “पारंपरिक वैद्यकीय उपचार खूप महाग आहेत, त्यामुळे जादूटोणाचे उपायच स्वस्त वाटतात.” समाजशास्त्रज्ञ मेहरिगुल अबलेझोवा यांच्यानुसार, सामाजिक असमानता आणि उत्तम आरोग्य सेवांच्या अभावामुळे लोक अशा प्रथांकडे वळत आहेत.
विशेषज्ञांचे म्हणण्यानुसार, फक्त दडपशाही करुन या प्रथा संपुष्टात येणार नाहीत. देशातील सर्व नागरिकांनी समान आरोग्यसेवा आणि सामाजिक कल्याण योजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे. यामुळे ते अशा वैकल्पिक मार्गांचा आधार घेणार नाहीत. यामुळे अशा प्रथा संपवायच्या असतील तर सरकारने लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर भर द्यायला हवा.