
दोन महासत्तांमध्ये १०० मिनिटांची "भव्य बैठक", ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्याबरोबर कोणते करार? वाचा सविस्तर
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग सहा वर्षांनंतर भेटले आणि दोन्ही महासत्तांमधील ही बैठक महत्त्वाची होती. संपूर्ण जगाचे या बैठकीकडे लक्ष लागून होते. जगातील दोन सर्वात शक्तिशाली देशांचे दोन्ही नेते शेवटचे २०१९ मध्ये भेटले होते. यानंतर कोरियातील बुसान विमानतळावर भेटले आणि त्यांची बैठक फक्त १०० मिनिट बैठक होती. बैठकीपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले की, चीनसोबत व्यापार करारावर स्वाक्षरी होऊ शकते.
यानंतर, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गुरुवारी (30 ऑक्टोबर) एक मोठी घोषणा केली, ज्यात म्हटले आहे की चीनमधून आयात केलेल्या वस्तूंवरील एकूण सरासरी कर ५७% वरून ४७% पर्यंत कमी करण्यात आला आहे. अमेरिकेने चीनवर अनेक वेळा कर लादले आहेत आणि रागाच्या भरात डोनाल्ड ट्रम्प यांनी हे कर जाहीर केले, ज्यामध्ये ट्रम्पच्या मागील कार्यकाळात लादलेला स्टीलवर १९% कर, एप्रिल २०२५ मध्ये १०% बेसलाइन कर, फेंटानिलशी संबंधित २०% कर आणि इतर कर यांचा समावेश आहे. अशाप्रकारे, अमेरिकेने चीनवर सरासरी ५५% कर लादला होता, जो ऑगस्ट २०२५ मध्ये ५७% पर्यंत वाढला. तथापि, दोन्ही नेत्यांमधील बैठकीनंतर, चीन आता सरासरी ४७% कर लादणार आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी बोलल्यानंतर, ट्रम्प यांनी घोषणा केली की चीनवर लादलेला फेंटानिलशी संबंधित कर २०% वरून १०% पर्यंत कमी करण्यात येत आहे. “तुम्हाला माहिती आहेच की, मी फेंटानिलमुळे चीनवर २०% कर लादला होता. हा एक महत्त्वाचा कर होता आणि आता तो १०% पर्यंत कमी केला आहे, जो तात्काळ लागू होईल. मला विश्वास आहे की शी जिनपिंग अमेरिकेत फेंटानिलमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी कठोर परिश्रम करतील.” ट्रम्पच्या कर कपातीच्या बदल्यात, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आता अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी करण्यास सहमत झाले आहेत, असं यावेळी ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेने चिनी, हाँगकाँग आणि मकाऊ वस्तूंवर लादलेले १०% फेंटानिल टॅरिफ आणि २४% परस्पर टॅरिफ एका वर्षासाठी स्थगित करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर, चीनने टॅरिफ नियंत्रणांवर सवलती देण्याचे संकेतही दिले आहेत. ट्रम्प आणि शी जिनपिंग सहा वर्षांत प्रथमच दक्षिण कोरियामध्ये समोरासमोर भेटले. बुसानमधील बैठकीत दोन्ही नेत्यांनी व्यापार, फेंटानिल नियंत्रण आणि दुर्मिळ पृथ्वी निर्यात यासारख्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली. चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, शी जिनपिंग यांनी ट्रम्प यांना सांगितले की, “चीन आणि अमेरिकेने प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सकारात्मक सहकार्याकडे वाटचाल करावी.” त्यांनी पुढे सांगितले की दोन्ही देशांच्या संघांनी “महत्त्वाच्या आर्थिक आणि व्यापार मुद्द्यांवर सखोल चर्चा केली आणि त्या सोडवण्यावर एकमत झाले.”
तसेच चीनने लवकरच दुर्मिळ पृथ्वी खनिजे आणि काही इतर वस्तूंची निर्यात पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. दक्षिण कोरियातील बुसान येथे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या ऐतिहासिक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने गुरुवारी सांगितले की बीजिंगने ९ ऑक्टोबर रोजी लागू केलेले निर्यात नियंत्रण एका वर्षासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या काळात चीन “या नियंत्रण धोरणांचा आढावा घेईल आणि नवीन परिस्थितीनुसार त्यात सुधारणा करेल.”