फोटो सौजन्य: iStock
भारतात २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू झालेला नवा GST 2.0 कार बाजारासाठी एका भेटवस्तूपेक्षा कमी नाही. छोट्या गाड्यांवरील GST २८% वरून थेट १८% पर्यंत कमी करण्यात आल्यामुळे ग्राहकांमध्ये मोठा उत्साह आहे. नवरात्री आणि फेस्टिव्हल सीझनच्या सुरुवातीमुळे कंपन्यांना विक्रमी बुकिंग आणि विक्री मिळत आहे. देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाला केवळ २२ सप्टेंबर रोजी ८०,००० पेक्षा जास्त ग्राहकांनी चौकशी केली, तर कंपनीने २५,००० पेक्षा जास्त गाड्यांची डिलिव्हरी केली आहे. येत्या काही दिवसांत हा आकडा ३०,००० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
मारुतीचे मार्केटिंग आणि सेल्सचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी पार्थो बॅनर्जी यांनी सांगितले की, छोट्या गाड्यांना सर्वात जास्त मागणी असून बुकिंगमध्ये जवळपास ५०% वाढ झाली आहे. अनेक मॉडेल्सची मागणी इतकी जास्त आहे की, त्यांचा स्टॉक संपण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मारुतीने १८ सप्टेंबरपासूनच GST दरातील कपातीचा फायदा ग्राहकांना देण्यासोबतच अतिरिक्त दरातही कपात केली होती. याच कारणामुळे कंपनीला आतापर्यंत ७५,००० बुकिंग मिळाल्या आहेत, म्हणजे दररोज सरासरी १५,००० बुकिंग मिळत आहेत. डिलरशिपवर ग्राहकांची गर्दी इतकी जास्त आहे की, त्यांना रात्री उशिरापर्यंत उघडे राहावे लागले.
मारुतीप्रमाणेच ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने (HMIL) देखील पहिल्याच दिवशी मोठा विक्रम केला. कंपनीने ११,००० डीलर बिलिंग्स नोंदवल्या, जो गेल्या ५ वर्षांतील त्यांचा एका दिवसातील सर्वात मोठा विक्रम आहे. ह्युंदाईचे COO तरुण गर्ग म्हणाले की, GST २.० आणि नवरात्रीच्या सुरुवातीमुळे बाजारात एक जबरदस्त उत्साह निर्माण झाला आहे.
Maruti Fronx की Hyundai Venue, आजपासून कोणती कार झाली जास्त स्वस्त?
टाटा मोटर्सनेही या संधीचा फायदा घेतला. GST २.० लागू झाल्याच्या पहिल्या दिवशीच कंपनीने १०,००० गाड्यांची डिलिव्हरी दिली. यासोबतच २५,००० पेक्षा जास्त ग्राहकांनी चौकशी केली. यावरून हे स्पष्ट होते की, नव्या करप्रणालीने ग्राहकांना खरेदीसाठी प्रोत्साहित केले आहे.