Honda Elevate Facelift (फोटो सौजन्य- सोशलमीडिया) Honda Elevate Facelift (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
गाडी अजून आली जरी नसली तरी कंपनीने तिचं बुकिंग सुरु केलं आहे. 1 ऑक्टोबरपासून तुम्ही ही गाडी बुक करू शकता. तुमच्या जवळच्या होंडा शोरूममध्ये जाऊन फक्त 21,000 रुपये भरून तुम्ही नवी एलिव्हेट बुक करू शकता. कंपनीने अजून किंमत किंवा कोणत्या व्हेरिएंटमध्ये काय फीचर्स असतील हे सांगितलं नाही. ते सगळं 6 ऑक्टोबरच्या लॉन्चच्या दिवशीच कळेल. पण कंपनी म्हणतेय की नवी एलिव्हेट आधीपेक्षा जास्त आकर्षक असेल, जास्त फीचर्स असतील आणि आतून पण जास्त प्रीमियम वाटेल.
होंडाने नवीन एलिव्हेटचे काही फोटो आणि टीझर दाखवले आहेत. त्यावरून कळतंय की गाडीच्या पुढच्या भागात खूप बदल केले आहेत. पुढे नवी ग्रिल डिझाईन दिली आहे आणि नवीन LED लाईट्स आहेत ज्या रात्री एकदम भारी दिसतात. होंडाचा लोगो आधी ग्रिलवर होता, आता तो बॉनेटवर म्हणजे वरच्या बाजूला लावला आहे. त्यामुळे गाडी जास्त मोठी आणि प्रीमियम वाटते. मागच्या बाजूला पण आता कनेक्टेड LED लाईट बार दिला आहे, जो आजकाल सगळ्या महागड्या गाड्यांमध्ये असतो. बंपर आणि बाकीच्या गोष्टींमध्ये पण थोडेफार बदल केले आहेत.
बाहेरूनच नाही तर आतून पण गाडी पूर्णपणे बदलली आहे. टीझरमध्ये दिसतंय की आतमध्ये हलक्या रंगाचे सीट कव्हर दिले आहेत. डॅशबोर्डवर आणि दरवाज्यावर अँबियंट लाईटिंग दिली आहे, जी रात्री एकदम सुंदर दिसते. सगळ्यात मोठा बदल म्हणजे यात आता 360 डिग्री कॅमेरा येणार आहे. म्हणजे गाडी पार्क करताना चारही बाजू दिसतील. आणि पुढच्या सीटला व्हेंटिलेशन पण येणार आहे, म्हणजे उन्हाळ्यात सीट थंड राहील. हे दोन्ही फीचर्स आधीच्या एलिव्हेटमध्ये नव्हते.
याशिवाय आता 10.25 इंचाची मोठी टचस्क्रीन पण मिळणार आहे. पण हे सगळे फीचर्स सगळ्या व्हेरिएंटमध्ये असतील की फक्त टॉप मॉडेलमध्ये, हे अजून कंपनीने सांगितलं नाही.
इंजिनमध्ये कंपनी जास्त बदल करणार नाहीये. जुन्या एलिव्हेटमध्येच जे 1.5 लिटरचं पेट्रोल इंजिन होतं तेच यात पण राहील. हे इंजिन चांगलं आहे, मायलेज पण बरं देतं. यात 6 स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक असे दोन पर्याय मिळतील. म्हणजे या गाडीत मेन फोकस डिझाईन आणि फीचर्सवरच आहे.
नवी एलिव्हेट आली की तिची थेट स्पर्धा ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस, मारुती ग्रँड विटारा, टोयोटा हायरायडर, फोक्सवॅगन टायगुन, स्कोडा कुशाक आणि टाटा सिएरा सारख्या गाड्यांशी असेल. या सगळ्या गाड्या या सेगमेंटमध्ये खूप विकल्या जातात.
आता बघायचं आहे की होंडा या नव्या एलिव्हेटची किंमत किती ठेवते. जुन्या एलिव्हेटची किंमत 11 लाखापासून सुरु होते, तर नवी थोडी महाग असू शकते. सगळं काही 6 ऑक्टोबरला समजेलच.






