
मारुती सुझुकीच्या ‘फ्रॉन्क्स’ या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने तब्बल २ लाख गाड्यांच्या एकूण निर्यातीचा टप्पा ३८ महिन्यांपेक्षा कमी वेळात पार केला आहे. या कामगिरीसह ती भारतात निर्मित सर्वाधिक वेगाने हा टप्पा गाठणारी एसयूव्ही ठरली आहे. जून २०२३ मध्ये फ्रॉन्क्सची आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात सुरू झाली होती आणि आज जपानसह जगातील जवळपास ९० देशांमध्ये ही गाडी पाठवली जात आहे.
या सर्व गाड्यांचे उत्पादन मारुती सुझुकीच्या गुजरातमधील हंसालपूर प्लांटमध्ये केले जाते. फ्रॉन्क्सने पहिल्या १ लाख गाड्यांच्या निर्यातीचा टप्पा २५ महिन्यांत गाठला होता. मात्र, पुढील १ लाख गाड्यांची निर्यात अवघ्या १३ महिन्यांत झाली, ज्यामुळे दुसऱ्या टप्प्याचा कालावधी जवळपास निम्म्या भागावर आला आहे.
हंसलपूर येथील हा प्रकल्प मारुती सुझुकीच्या जागतिक पुरवठा साखळीचा महत्त्वाचा भाग आहे. येथून १२० हून अधिक देशांमध्ये कंपनीच्या १७ विविध मॉडेल्सची निर्यात केली जाते. या यशावर बोलताना मारुती सुझुकी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ हिसाशी ताकेउची म्हणाले, “मारुती सुझुकीने निर्यात केलेले प्रत्येक वाहन आमच्या कर्मचाऱ्यांचे कष्ट आणि अभिमान दर्शवते. आर्थिक वर्ष २०२४-२५ पासून फ्रॉन्क्स ही भारतातील पहिल्या क्रमांकाची निर्यात होणारी प्रवासी गाडी ठरली आहे.”
मारुती सुझुकीने सलग पाचव्या वर्षी भारतातील अव्वल प्रवासी वाहन निर्यातदार म्हणून आपले स्थान टिकवून ठेवले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतातील एकूण प्रवासी वाहन निर्यातीत मारुती सुझुकीचा वाटा ५५ टक्क्यांहून अधिक होता, ज्यामध्ये फ्रॉन्क्स, जिम्नी ५-डोअर, ई-व्हिटारा, डिझायर आणि बलेनो या मॉडेल्सचा मुख्य सहभाग होता.
मोठी बातमी! नवी मुंबईत वाहनांसाठी MH-43-CW ही नवीन नोंदणी मालिका सुरू
आंतरराष्ट्रीय बाजारासोबतच देशांतर्गत बाजारातही फ्रॉन्क्स उत्तम कामगिरी करत आहे. जुलै २०२६ मध्ये भारतात फ्रॉन्क्सच्या १९,४७३ युनिट्सची विक्री झाली असून, ती तिच्या सेगमेंटमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. ही विक्री गेल्या वर्षाच्या तुलनेत ५१.२८ टक्क्यांनी अधिक आहे.