
टाटा मोटर्स पॅसेंजर वेहिकल्सने जून २०२६ या महिन्यात आणि वित्त वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत विक्रीमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे. जून २०२६ मध्ये, कंपनीची एकूण प्रवासी वाहन विक्री (इलेक्ट्रिक वाहनांसह) वार्षिक आधारावर ६९% च्या घसघशीत वाढीसह ६३,०८३ युनिट्सवर पोहोचली, जी जून २०२१ मध्ये ३७,२३७ युनिट्स होती. मासिक स्तरावरील या उत्कृष्ट कामगिरीला प्रामुख्याने देशांतर्गत बाजारपेठेतील ६७% वाढीचा पाठिंबा मिळाला, जेथे एकूण ६२,०७६ वाहनांची विक्री झाली. याच सोबतीने कंपनीच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाने ५५४% ची ऐतिहासिक झेप घेत १,००७ युनिट्सची विक्री नोंदवली. इलेक्ट्रिक व्हेइकल सेगमेंटमध्येही जून २०२६ दरम्यान लक्षणीय गती पाहायला मिळाली; जिथे वार्षिक आधारावर १८३% ची प्रचंड वाढ होऊन एकूण १४,८०० ईव्हीची विक्री झाली.
जर पहिल्या तिमाहीच्या एकत्रित कामगिरीचा विचार केला, तर टाटा मोटर्सने एकूण १,८२,५७४ प्रवासी वाहनांची विक्री नोंदवली आहे. हे प्रमाण वित्त वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीतील १,२४,८०९ युनिट्सच्या तुलनेत ४६% ची मजबूत वार्षिक वाढ दर्शवते. या तिमाहीच्या एकूण विक्रीमध्ये देशांतर्गत बाजारपेठेतील १,८०,१६६ युनिट्स (४५% वाढ) आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील २,४०,८ युनिट्स (१४८% वाढ) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, कंपनीने या तिमाहीत इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या क्षेत्रातील आपले स्थान अधिक भक्कम केले आहे; देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील एकत्रित ईव्ही विक्री ११२% ने वाढून ३४,४६७ युनिट्सच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे, जी गेल्या वर्षी याच कालावधीत केवळ १६,२३१ युनिट्स होती.
टाटा मोटर्स पॅसेंजर वेहिकल्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ शैलेश चंद्रा या कामगिरीबद्दल बोलताना म्हणाले, “वित्त वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीची सुरुवात टाटा मोटर्स पॅसेंजर वेहिकल्ससाठी अत्यंत आश्वासक झाली आहे. आम्ही १,८२,५७४ कार आणि एसयूव्हीच्या विक्रीसह वार्षिक आधारावर ४६% ची वाढ नोंदवली आहे, जी ऑटोमोबाईल क्षेत्रातील सरासरी विकासदरापेक्षा अधिक आहे. ग्राहकांची सातत्यपूर्ण मागणी आणि आमच्या अलीकडील नवीन उत्पादनांचे यश यामुळे या कामगिरीला मोठी गती मिळाली. इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रातील आमचे अग्रस्थान या तिमाहीत अधिक मजबूत झाले असून, ईव्ही विक्री दुप्पट होऊन ११२% वार्षिक वाढीची नोंद झाली आहे. आमची किरकोळ विक्री कामगिरी देखील तितकीच उत्साहवर्धक होती; ‘वाहन’ पोर्टलवरील आमची नोंदणी वार्षिक आधारावर सुमारे ४०% ने वाढली आहे, जी उद्योग क्षेत्रातील सरासरी वाढीच्या जवळपास दुप्पट आहे.”
ते पुढे म्हणाले, “आम्ही या तिमाहीचा समारोप अत्यंत सकारात्मक नोंदणीसह केला आहे, जिथे केवळ जून महिन्यात ६३,०८३ कार आणि एसयूव्हीची विक्री होऊन ६९% ची मजबूत वार्षिक वाढ झाली आहे. ईव्ही सेगमेंटमध्ये आम्ही १४,८०० युनिट्ससह आतापर्यंतची सर्वोच्च मासिक विक्री साध्य केली आहे, ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ही विक्री जवळपास तिप्पट झाली आहे. घाऊक आणि किरकोळ दोन्ही माध्यमांमध्ये कायम राहिलेली ही गती आमच्या पोर्टफोलिओची वाढती ताकद आणि विविध सेगमेंटमधील ग्राहकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद अधोरेखित करते.”
Tata Sierra EV: टाटा सिएरा EV लाँचपूर्वीच वाढली उत्सुकता; समोर आले फीचर्स आणि रेंज
टियागो आणि पंचच्या नवीन आवृत्त्यांना ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून त्यांच्या सर्व प्रकारच्या पॉवरट्रेन (पेट्रोल/सीएनजी/ईव्ही) पर्यायांसाठी बुकिंगमध्ये वेगाने वाढ झाली आहे. हे आमच्या ‘मल्टी-पॉवरट्रेन धोरणा’च्या यशाची पुष्टी करते. आम्ही सर्व सेगमेंट्समध्ये ईव्हीचा स्वीकार करण्याबाबत वाढता उत्साह पाहत आहोत, आणि एंट्री-लेवल ईव्ही कॅटेगरीमधील ही मजबूत पकड दर्शवते की संपूर्ण भारतात इलेक्ट्रिक मोबिलिटी आता वेगाने मुख्य प्रवाहाचा भाग बनत आहे.
पुरवठा साखळीतील काही अडचणींमुळे या तिमाहीत सिएराच्या उत्पादन आणि वितरणावर काहीसा परिणाम झाला असला, तरी ग्राहकांची उत्सुकता आणि बुकिंगचा वेग अजूनही खूप मजबूत आहे. ठराविक विक्रेत्यांकडून मागणीनुसार उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक सुधारात्मक उपाययोजना सुरू आहेत, ज्यामुळे आम्हाला दुसऱ्या तिमाहीपासून वितरणाचा वेग उत्तरोत्तर वाढवणे शक्य होईल. भक्कम ऑर्डर बुक, आकर्षक उत्पादने आणि ग्राहकांची सातत्यपूर्ण मागणी यांच्या जोरावर, वर्षाच्या उर्वरित कालावधीतही आम्ही आमचा हाच विकासदर कायम ठेवू, याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे.