
लखनऊ आणि रायपूरमध्ये टाटा मोटर्सकडून ‘Re.Wi.Re’ वाहन स्क्रॅपिंग केंद्रांचे उद्घाटन
भारतामध्ये शाश्वत गतिशीलता आणि अर्थव्यवस्थेस चालना देण्याच्या आपल्या दृढ बांधिलकीला पुढे नेत, टाटा मोटर्सने आज लखनऊ (उत्तर प्रदेश) आणि रायपूर (छत्तीसगड) येथे दोन अत्याधुनिक Re.Wi.Re – Recycle With Respect नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग केंद्रांचे (Registered Vehicle Scrapping Facility – RVSF) उद्घाटन केले.
या केंद्रांचे उद्घाटन भारत सरकारचे माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते (व्हर्च्युअली) पार पडले. ही केंद्रे देशातील शेवटच्या टप्प्यातील वाहनांचे (End-of-Life Vehicles) सुरक्षित आणि जबाबदारीने विघटन करण्यासाठी डिझाइन केली गेली आहेत. येथे सर्व ब्रँडच्या दुचाकी, तीनचाकी, प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांचे स्क्रॅपिंग करता येईल.
उद्घाटनप्रसंगी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की लखनऊ आणि रायपूरमधील या प्रगत स्क्रॅपिंग सुविधांचे उद्घाटन करताना मला अत्यंत आनंद होत आहे. या सुविधा ‘नॅशनल व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी’ अंतर्गत एक महत्त्वाचे पाऊल आहेत. या उपक्रमांमुळे नागरिकांना अधिक इंधन-किफायतशीर, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वाहने निवडण्याची संधी मिळते. अनफिट वाहनांचे वैज्ञानिक पद्धतीने विघटन होणे आणि त्यातील महत्त्वाचे साहित्य पुनर्प्राप्त होणे ही काळाची गरज आहे. मी टाटा मोटर्सचे त्यांच्या देशव्यापी प्रयत्नांबद्दल अभिनंदन करतो.
Uber, Rapido आणि Ola टेन्शनमध्ये ! बंगळुरूनंतर महाराष्ट्रात सुद्धा Bike Taxi बॅन होणार?
रायपूर येथील RVSF चे संचालन रायपूर ग्रीन एनर्जी प्रा. लि.करणार असून या केंद्राची वार्षिक वाहन विघटन क्षमता सुमारे 25,000 वाहने आहे. लखनऊ येथील सुविधा मोटो स्क्रॅपलँड प्रा. लि. तर्फे संचालित केली जाईल आणि येथे 15000 वाहने दरवर्षी स्क्रॅप केली जातील.
या उपक्रमाबाबत टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ म्हणाले की शाश्वतता ही केवळ आमची बांधिलकी नाही तर गतिशीलतेच्या भविष्याची हमी आहे. आम्ही अर्थव्यवस्थेच्या तत्त्वांवर आधारित, जबाबदार आणि पर्यावरणपूरक उपायांसाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. देशभरातील आमच्या विस्तृत Re.Wi.Re नेटवर्कद्वारे आम्ही दरवर्षी सुमारे १.७५ लाख End-of-Life Vehicles चे सुरक्षित विघटन करू शकतो.
या नव्या विस्तारासह टाटा मोटर्सचे वाहन स्क्रॅपिंग केंद्रे आता जयपूर, भुवनेश्वर, सुरत, चंदीगड, दिल्ली NCR, पुणे, गुवाहाटी, रायपूर, लखनौ आणि कोलकाता येथे कार्यरत आहेत. प्रत्येक Re.Wi.Re सुविधा पूर्णपणे डिजिटलीकरण केलेली असून, सर्व प्रक्रिया पेपरलेस आहेत.
कमर्शियल वाहने, दुचाकी आणि तीनचाकींकरिता सेल-टाइप डिस्मँटलिंग, तर प्रवासी वाहनांसाठी लाइन-टाइप डिस्मँटलिंग सिस्टम उपलब्ध आहे. टायर्स, बॅटऱ्या, इंधन, तेल, द्रव आणि वायू यांसारख्या घटकांचे सुरक्षित विघटन करणारे विशेष स्टेशनही येथे उपलब्ध आहेत.
प्रत्येक वाहनासाठी विशिष्ट डॉक्युमेंटेशन आणि विघटन प्रक्रिया निश्चित केली जाते, ज्यायोगे भारत सरकारच्या वाहन स्क्रॅपिंग धोरणाचे पालन सुनिश्चित होते.
Re.Wi.Re उपक्रम टाटा मोटर्सच्या पर्यावरणपूरक उद्योग धोरणाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, वाहन उद्योगातील शाश्वततेच्या दिशेने उचललेले मोठे पाऊल आहे.