फोटो सौजन्य: @ToyotaRajesh (X.com)
भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार बेस्ट कार ऑफर करत असतात. मात्र, आजचा ग्राहक हा एखादी कार खरेदी करताना फक्त त्याच्या मायलेजकडेच लक्ष देत नाही तर सेफ्टी फीचर्सकडे सुद्धा लक्ष देतो. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत, अनेक कार उत्पादक कंपन्या आपल्या कारमध्ये उत्तम सेफ्टी फीचर्स समाविष्ट करत आहे. नुकतेच Toyota Glanza च्या सगळ्या व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग्स समाविष्ट केले आहे.
टोयोटा किर्लोस्कर मोटरने घोषणा केली आहे की ग्लॅन्झाच्या सर्व व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग्ज अपडेट करण्यात आल्या आहेत. याचा अर्थ आता त्यांच्या सर्व व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग्ज मिळतील. यासोबतच, कंपनीने ग्लॅन्झाची नवीन प्रेस्टिज एडिशन देखील लाँच केली आहे. या अपग्रेडनंतर, या प्रीमियम हॅचबॅकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.90 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
6 एअरबॅग्जसह सुसज्ज करण्यासोबतच, कंपनीने Glanza चे एक खास प्रेस्टिज एडिशन देखील लाँच केले आहे, ज्यामध्ये ॲक्सेसरीज पॅकेज आहे. हे पॅकेज फक्त 31 जुलै 2025 पर्यंत ऑफर केले जात आहे. यात प्रीमियम डोअर व्हॉयझर्स, क्रोम आणि ब्लॅक ॲक्सेंटसह बॉडी साइड मोल्डिंग, रिअर लॅम्प गार्निश, बाहेरील रिअर व्ह्यू मिरर आणि फेंडर्ससाठी क्रोम ट्रिम्स, रिअर स्किड प्लेट, इल्युमिनेटेड डोअर सिल्स आणि लोअर ग्रिल गार्निश ॲक्सेसरीज समाविष्ट आहेत.
टोयोटा ग्लांझा स्पोर्टिंग रेड, इन्स्टा ब्लू, एन्टिकिंग सिल्व्हर, गेमिंग ग्रे आणि कॅफे व्हाइट अशा ड्युअल-टोन आणि सिंगल-टोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात 9-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम, हेड-अप डिस्प्ले, 360-डिग्री कॅमेरा आणि 45 हून अधिक कनेक्टेड क्षमतांसह टोयोटा आय-कनेक्ट आहे. ही सर्व फीचर्स त्याच्या चार व्हेरिएंटमध्ये ई, एस, जी आणि व्ही मध्ये देण्यात आली आहेत.
टोयोटा ग्लांझामध्ये 1.2-लिटर के-सिरीज पेट्रोल इंजिन आहे, ज्यामध्ये सीएनजी पॉवरट्रेनचा पर्याय देखील आहे. त्याचे इंजिन 88 एचपी पॉवर आणि 113 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ते एमटी किंवा एएमटी ट्रान्समिशन पर्यायांसह देण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की ते ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 22.94 किमी प्रति लिटर आणि सीएनजी व्हेरिएंटमध्ये 30.61 किमी प्रति लिटर पर्यंत मायलेज देते.
भारतात, टोयोटा ग्लांझा 6.90 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) उपलब्ध आहे. ही प्रीमियम हॅचबॅक Tata Altroz, Hyundai i20,आणि Maruti Baleno सारख्या कारशी स्पर्धा करते.