फोटो सौजन्य: iStock
Two wheeler new rules: भारतात मोठ्या प्रमाणात दुचाकींच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे. यासोबतच अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे. याच अपघातांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजना करत असतात. असाच एक महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय परिवहन मंत्रालयाने घेतला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
रस्ते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाकडून अजून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 जानेवारी 2026 पासून बाजारात येणाऱ्या प्रत्येक नवीन दुचाकींसाठी ABS (Anti-lock Braking System) सक्तीचे करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच यासोबतच नवीन दुचाकीसोबत दोन हेल्मेट असणे सक्तीचे केले आहे.
सध्या 125 सीसी इंजिन क्षमतेपर्यंतच्या दुचाकींना एबीएस (Anti-lock Braking System) अनिवार्य आहे. त्यामुळे सुमारे 40 टक्के दुचाक्यांमध्ये अद्याप ही सेफ्टी सिस्टम उपलब्ध नाही. मात्र, आता सर्व क्षमतेच्या इंजिनसाठी म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या दुचाकीसाठी ABS अनिवार्य करण्यात आले आहे.
भारतात नवीन Honda City Sport लाँच, स्पोर्टी लूकसह मिळणार दमदार परफॉर्मन्स
एबीएस हे वाहनांच्या ब्रेक सिस्टममधील एक महत्त्वाची सुरक्षा यंत्रणा आहे. यामध्ये अचानक ब्रेक लावल्यावर व्हील्स लॉक होण्यापासून रोखली जातात. जेव्हा व्हील्स लॉक होतात, तेव्हा वाहनाचे संतुलन बिघडते आणि चालकाचे नियंत्रण सुटते. ABS मुळे व्हील्स फिरत राहतात, त्यामुळे वाहनाचा तोल राखता जातो आणि रस्ता ओलसर वा घसरट असतानाही नियंत्रण ठेवता येते. यामुळे अपघाताची शक्यता लक्षणीयरित्या कमी होते.
अचानक ब्रेक दाबल्यास दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता असते. मात्र, ABS असल्यास हा धोका 35 ते 40 टक्क्यांनी कमी होतो, असं संशोधनातून दिसून आलं आहे. त्यामुळे एबीएस ही सिस्टम केवळ सुविधा नसून जीव वाचवणारी सुरक्षा यंत्रणा ठरते.
एबीएसप्रमाणेच केंद्र सरकारने नवीन दुचाकी खरेदी करताना दोन बीआयएस प्रमाणित हेल्मेट देणंही बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या फक्त एक हेल्मेट देणं अनिवार्य आहे. रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंपैकी 44 टक्के मृत्यू दुचाकीस्वारांचे असून, बहुतांश वेळा डोक्याला इजा झाल्याने मृत्यू होतो. हीच बाब लक्षात घेऊन सरकारने दोन हेल्मेट बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.