काही काही शब्द आपल्या मनात घट्ट रुतून राहतात. असे नेमके कोणते शब्द रुतून बसतात हे तसे ठरवता येत नाहीत. ते रुतून बसण्याची कारणे आपण शोधतोदेखील पण तो वरवरचा प्रयत्न असतो आणि अगदी खोलात जाऊन प्रयत्न केला तरी आपण एखाद्या त्या शब्दाच्या प्रसंगापाशी थबकतो… शब्द मनात रुतून बसण्याच्या कारणापाशी आपण पोहोचतोच असे खात्रीलायकरित्या म्हणता येत नाही.
याचाच अर्थ एखादा शब्द आपल्या मनात रुतून बसण्यासाठी आणखीही काही कारणे आहेत हे नक्की. या शब्दांचे अर्थ, ते तसे शब्द ज्या कारणासाठी वापरले जातात ती कारणे, आपल्या आयुष्यात त्या शब्दांनी घडवलेली अनंत नाट्ये किंवा प्रसंग किंवा एखाद्या विशिष्ट माणसाने तो शब्द उच्चारणे हे सारेच आणि पुन्हा आपल्या मनाची त्या त्या वेळची स्थिती….. हे असे असंख्य घटक शब्द रुतून बसण्यासाठी महत्वाचे ठरतात.
माझ्या लहानपणी माझ्या मनात असे असंख्य शब्द रुतून बसले होते. आता त्यातील काही काळप्रवाहात वाहून गेले. पण काही शब्द आजही मनाच्या गाभाऱ्यात शांत पडून आहेत. त्यात कळस हा शब्द असाच खूप कालखंड पडून आहे. वडील आयुष्यभर भाड्याच्या घरात राहीले. भाड्याचे घर घेताना शक्य असल्यास एखाद्या मंदिराजवळ किंवा त्या मंदिराच्या मार्गावर मिळेल यासाठी ते प्रयत्नशील असत.
खूपदा त्यामुळे आमच्या भाड्याच्या घराच्या एखाद्या तरी खोलीतून असा कोणत्या ना कोणत्या मंदिराचा कळस नक्कीच दिसत असे. त्या कळसावरील भगवा ध्वज कधी बदलला जात असे व कोण माणसे इतके उंच चढून तो ध्वज कसा बदलतात हे माहीत होत नसे; मात्र सर्वसाधारणपणे गुढीपाडव्याला तथा श्रावण महिन्यात आणि दीपावलीच्या सणापूर्वी हे ध्वज बदलले माझ्या लक्षात येत असे.
हे ध्वज बदलताना किती माणसे कष्ट करत असतील आणि किती माणसे आपला जीव थोडासा तरी जाणीवपूर्वक धोक्यात घालून आणि किती तरी माणसे त्यांना जपण्यासाठी काळजी घेत असतील याची जाणीव तेव्हा मला नव्हती. पण एकदा ते कळसावरील ध्वज बदलण्याचे काम मला पाहता आले. त्या कळसावरील ध्वज बदलल्यानंतर लगेचच तो दृष्टीस पडलेला कळस व त्या शेजारी उभे राहिलेले तीन तरुण कार्यकर्ते आजही माझ्या नजरेसमोर आहेत. तो वाऱ्यावर डौलाने फडकणारा ध्वज ते नवे-कोरे रेशमीपण नजरेला सुखावणारे होते हे नक्की.
कळस बांधणे ही स्थापत्य कलेतील अत्यंत परीगणनशील आणि अत्यंत कष्टदायक बाब मानली जाते. कळस जितका जमिनीपासून उंच तितके त्यावर कलालकुसरीचे-शिल्पकलेचे अद्भुत काम मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येते. आपल्या देशातील मंदिरांचे, बौद्धविहारांचे वैभव आपल्यापर्यंत सहजरित्या आता कुठे पोहोचू लागले आहे. या इवल्याशा गोष्टींवरून आपल्या पूर्वजांचे ज्ञान आणि दूरदृष्टी अगदी पटकन आपल्या ध्यानी येते.
मुळात कळस पाहून आपण हात जोडण्याइतके आजच्या स्थितीला भावूक राहिलेलो नसलो तरी आजही आपल्याही नकळत आपले हात रोजच्या वाटेवरील मंदिराचा कळस पाहून जोडले जातात. कारण हेच आहे की कळस या शब्दातच मंदिराच्या आस्तित्वाची, ईश्वरीय सगुण मूर्तीची आणि आपल्या मनातील देवाविषयीच्या श्रद्धा या भावनेची सारी सखोल जाणीव दडलेली आहे. मुख्य म्हणजे ही जाणीव आपल्याला स्वतंत्रपणे किंवा मुद्दाम होऊन प्रकट करावी लागत नाही.
कळस या शब्दाच्या उच्चारात असलेली उंची ही त्या भक्तियुक्त अंत:करणातून खूप वेळा आलेली असते. कळस ही केवळ इमारतीच्या उंचीची खूण नसते तर ती आपल्या मनोगभाऱ्याच्या खोलीची खूण असते. जीवनाबद्दल असलेल्या एका श्रद्धायुक्त नम्र भावनेची ती एक प्रभावशील समज असते. ही समज मला कळस या शब्दातच असलेली समृद्धता मौनपणे सांगत असते.
तसेही म्हणा, कळसाशी संबंधित किती तरी शब्द तथा वाक्यप्रचार आपल्या दैनंदिन व्यवहारात कानी पडत असतात. प्रगतीच्या कळसावर चढणे, एखाद्या गोष्टीचा कळस गाठणे, कळसासारखे उंच असणे, कळसाला नमन करणे हे आणि असे कितीतरी वाक्यप्रचार आपल्याला कळसाच्या उंचीची जाणीव करून देत असतात. तरीही आपण कित्येकदा कळस हा शब्द दुसऱ्याला टोमणे मारण्याकरीता वापरतो किंवा उपहासाने बोलण्याकरिता वापरतो. हे आपण का करतो? एखाद्या शब्दामध्ये दडलेल्या भक्तीयुक्त भावनेची आपण अशी मोड करून भलतेच कसे काय बोलतो? हे का घडते? म्हणजे. कळस या शब्दास चिकटलेली ती ईश्वरीय अस्तित्वाची जाणीव तकलादू होऊन जाते की काय?
खरे तर आपल्या साऱ्या शब्दनिहाय लगडलेल्या भावना या स्थितिशील आणि गतीशील असतात. त्या प्रसंगपरत्वे तथा एखाद्या घटनेप्रमाणे बदलतात. अर्थात तरीही मूळ शब्दाचा गाभारा, मूळ शब्दाची उंची किंवा मूळ शब्दाचा भावार्थ जरादेखील बदलत नाही. कळस शब्दाचे असेच होते. मानवी जीवन आज वेगाने समृद्धीच्या कळसावर पोहोचत आहे पण त्याचबरोबर ते पार पायरीच्या दिशेने ही घसरत आहे.
कळस हा शब्द जेव्हा आपण उपहासाने किंवा टीकायुक्त भावनेने वापरतो तेव्हा हेच घडत असते. माणसाला कळसाच्या दिशेने जाताना खाली पायरीवरून पार घसरणार नाही ना याची जाणीव ठेवावी लागते. कळस या शब्दातील उंची आपल्या मनाच्या गाभाऱ्यात जर उभी राहिली तरच आपली खरी प्रगती होणार हे कळसच आपल्याला समजाऊन सांगत असतो.
अनुपम बेहरे
sphatik@gmail.com






