14 नवीन रेल्वे स्टेशन्स, 1300 गावे रेल्वेने जोडली जाणार; 6456 कोटींच्या रेल्वे प्रकल्पांना केंद्राची मंजूरी
केंद्रातील मोदी सरकारने देशातील उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी आज अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. यामध्ये आज बुधवारी (ता.28) मंत्रिमंडळाने राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत 12 स्मार्ट शहरांना मंजुरी दिली आहे. ज्यासाठी 28,602 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. याशिवाय केंद्र सरकारने देशातील रेल्वेचे जाळे आणखी मजबूत करण्यासंदर्भात देखील महत्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे मालवाहतुकीला गती मिळत देशातील व्यापार वाढून, अर्थव्यवस्था आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे.
कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रिय कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रिय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी माहिती दिली आहे की, केंद्र सरकारने आज देशभरात 14 नवीन रेल्वे स्टेशन्स उभारण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या नवीन रेल्वे स्टेशन्समुळे देशातील तब्बल 1300 गावे रेल्वे मार्गाने जोडली जाणार आहेत. ज्यासाठी केंद्र सरकारने 6456 कोटींच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. अशी माहितीही मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार
रेल्वे मार्गांची क्षमता वाढवणे आणि नवीन रेल्वे मार्ग बांधणे. यामुळे मालवाहतुकीला गती मिळेल. देशातील पुरवठा साखळी मजबूत होईल. यामुळे देशाचा व्यापार वाढून अर्थव्यवस्था आणखी मजबूत होण्यास मदत होईल. याशिवाय नवीन रेल्वे लाईन टाकल्याने जे भाग अजूनही रेल्वेशी जोडली गेलेली नाहीत. त्यांना थेट देशभरातील रेल्वे मार्गांशी जोडले जाणार आहे. त्यामुळे देशातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. रेल्वेच्या सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांवर पायाभूत सुविधांचा विकास होऊन, देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. असेही त्यांनी म्हटले आहे.
माल वाहतुकीसाठी मोठा फायदा होणार
यामध्ये प्रामुख्याने ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये रेल्वेचे जाळे उभारले जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत 14 नवीन स्थानके बांधण्यात येणार आहेत. या राज्यातील अनेक क्षेत्रांना रेल्वेशी जोडले जाणार आहे. या नवीन मार्गांमुळे सुमारे 1,300 गावे आणि सुमारे 19 लाख लोकांना रेल्वेशी जोडण्याची संधी मिळणार आहे. या रेल्वे मार्गांमुळे देशातील कृषी उत्पादने, खते, कोळसा, लोखंड, पोलाद, सिमेंट, चुनखडी इत्यादी वस्तूंच्या वाहतुकीसाठी मोठा फायदा होणार आहे. असेही मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे.